Type Here to Get Search Results !

दवंडी-एक पारंपारिक लोककला



    दवंडी हा खेड्या भागातील एखाद्या गोष्टीबद्दल ग्रामस्थांना आवाहन, सूचना, माहिती,पोहचवण्याचा एक लोककलेतील पारंपरिक प्रकार आहे.गावातील लोकांना एखाद्या गोष्टीविषयी सुचित करायचे असेल, जागृत करावयाचे असेल किंवा एखाद्याला त्यांच्या वस्तूंची, मालाची जाहिरात करायचे असेल तर दवंडी पिटवून कळवल्या जायचे.पुरातन काळातही या दवंडी प्रकार वापरला जायचा कारण त्यावेळी वीज, रेडिओ, दूरदर्शन,स्पीकर सारखी प्रसार माध्यमे व इतर जाहिरातीचे प्रकार नव्हते. स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्ष हा दवंडी प्रकार चालू होता आणि आजही काहीशा प्रमाणात अजूनही खेडोपाडी चालूच आहे. विसाव्या शतकातील पन्नास साठच्या दशकात जन्मलेली पिढी काही अंश निरक्षर आहे.सत्तराव्या दशकानंतर नंतर शिक्षणाचे प्रमाण वाढले मात्र अजूनही काही वयोवृद्ध, साठी व सत्तारितील निरक्षर आहेत किंवा तिसरी चौथी शिकलेली आहेत त्यांच्याकडे आताच्या या काळातील तरुणांसारखे जलद गतीने माहिती पसरवण्याचे माध्यम म्हणजे भ्रमणध्वनी नाही.मात्र त्यांना ही दवंडीत अतिशय प्रिय वाटते. शेतीच्या वस्तूंची,मालाची जाहिरात करायचे असेल तर,ते दवंडी पिटवूनच सांगण्याचा आग्रह धरतात. अन हो ! दवंडी साठी वाजवलेला हलगीचा (दफड्याचा) आवाज आणि दवंडी पिठवणाऱ्या व्यक्तीचा लयदार आवाज अजूनही कानाला मंजूळ वाटतो. असा हा मंजुळ आवाज ऐकण्यासाठी कान टवकारतात.

       पूर्वी दवंडी ही गावातील ग्रामपंचायतच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी,एखादा साथीचा आजार बळावला असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी किंवा काही कारणास्तव ग्रामपंचायत द्वारे चालणारा पाणीपुरवठा खंडित झाला तर त्याची दुरुस्ती होईपर्यंत, एक-दोन दिवस नळाला पाणी येणार नाही अशा स्वरूपाच्या सूचना व माहिती देण्यासाठी वापरल्या जायची. ग्रामपंचायतीची ग्रामसभेसाठी नागरिकांना बोलवण्यासाठी दवंडी पिटवल्या जायची.जेणेकरून गावातील नागरिकांना त्या संदर्भात माहिती होईल. शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी एखादी बियाणे कंपनीची गाडी जाहिरातीसाठी आली तर शेतकऱ्यांना जमवून मार्गदर्शन करण्यासाठी दवंडी पिटल्या जायची. हलगी वादक, दफडे वाला ढूम ढुम ढुम ढुंम असा चौका-चौकात वाजवून, "ऐका हो ऐका, आज मारुती मंदिराच्या पारा जवळ शेती -बियाणे व पिक काळजी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी संध्याकाळी सहा वाजता कंपनी वाले येणार आहे हो !"अशी दवंडी देऊन तो पुढील गल्लीत जायचा. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हलगी वाजवल्यानंतर सर्वजण हातातली काम सोडून, थांब! रे थोडं थांब! म्हणून,एकमेकांना इशारा करून सर्व शांत होऊन ऐकायचे. दवंडी पूर्ण सांगून झाली की, कुजबूज व्हायची. कोणाला कमी ऐकायला ऐकायला आली असेल,समजली नसेल किंवा घरात ऐकायला आली नसेल तर एकमेकांना विचारायचे. मग, एक दुसऱ्याला सांगायचा. अहो,अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक आहे. तेव्हा त्याचं समाधान व्हायचं. संध्याकाळचा चहा उरकला कि,महिला वर्ग स्वयंपाकात कार्यरत असायच्या अन पुरुष मंडळी मूल,नातवंड घेऊन मंदिराकडे दर्शनाच्या निमित्ताने जायची व ते दवंडीतील सूचनेनुसार कार्यक्रमाला उपस्थित राहुन हजेरी लावायचे.

     दवंडी ही फक्त सूचनेसाठीच नव्हती तर,एखाद्याने एखादं दुकान टाकलं असेल तर त्याच्या दुकानात नवीन काय उपलब्ध असणार आहे किंवा एखाद्याची जिरवण्यासाठी,लोकांना आकर्षित करण्यासाठी संबंधित वस्तू किमतीपेक्षा दोन रुपयांनी वस्तू स्वस्त भेटेल.ही अशीही दवंडी असायची.मग काय ! आपल्या फायद्यासाठी लोकांची दुकानावर गर्दीच गर्दी...! काय म्हणाव याला,एकमेकांचे जिरवणे कि,ग्राहकांना आकर्षित करणं म्हणावं कि व्यवसायाचा फंडा ! काहीही असो ! पण लोकांचा फायदा व्हायचा अन दवंडी ऐकायची मज्जा यायची.अश्या दवंडीवर मात्र जास्त कुजबुज अन मतं मतांतरे चालायची. गावात आठवड्याचा बाजार असल्यामुळे आठवड्यातून एखादाच खरेदीला वाव होता. मात्र,लग्न सराई मध्ये आंदन साठी भांडे घेण्यासाठी बाजाराच्या वाराच्या इतर दिवशी गावात भांड्याचे दुकान थाटले तर,दुकान मालक हलगी वाल्याच्या हस्ते, "आज शाळेच्या कंपाऊंड जवळ भांड्याचे दुकान आले आहे हो!" अशी दवंडी पिटवायला सांगायचे.मग बायका-माणसं लग्ना साठी आंदनाच्या खरेदी साठी जायचे.

          पूर्वी घरोघरी दूरदर्शन नव्हते.अख्या गावामध्ये फक्त पाच ते सात घरीच दूरदर्शन होते.त्यातही मराठी चित्रपट फक्त दर रविवारी दुपारी चारला अन हिंदी चित्रपट शुक्रवार रात्री साडेनऊ व शनिवारी रात्री दहा वाजता असायचा आणि तेही ब्लॅक अँड व्हाईट वर...! म्हणून काही चित्रपट शौकींनांना चित्रपट बघायला जायचे असेल तर गावापासून पाच ते सहा किमी अंतरावर सिनेमा थिएटर (पिक्चरची टॉकीझ) होती तिथे जायचे.जेव्हा महिलांनाही बघतील असे चित्रपट असायचे जसे कि, माहेरची साडी वगैरे तेव्हा आजूबाजुच्या खेड्यावर सिनेमा थिएटर वाले तेव्हा, सायंकाळी पाच-सहाला हलगी वाल्याचा हस्ते गावभर दवंडी पिटवायचे. "ऐका हो ऐका,आज पारध किंवा धाड जिथे असेल तिथे, रात्री नऊ ते बारा "माहेरची साडी" चित्रपट आहे हो " मग काय पुरुषांबरोबर बायकाही भाजी-भाकरीचा स्वयंपाक उरकून चित्रपटाला जायची तयारी करायच्या.वाहनांची सुविधा नसल्यामुळे पायी जावून पुरुष, महिला, लेकरं बाळ चित्रपट बघून रात्री पायीच चित्रपटांविषयी गप्पा मारत-मारत घरी यायचे. कधी अंधाऱ्या रात्री तर, कधी चांदण्या रात्रीचा हा पायी प्रवास कितीतरी आगळा वेगळा अनुभव अन आनंद देऊन जायचा. खरंच किती विशेष दिवस होते न ते दिवस! त्या दिवसांची आठवण आली कधी रडायला तर कधी खळखळून हसायला येतं.

    माझ्या गावातीलही दवंडी अशीच ! गावातील वाजंत्रीवाले हलगीवाले त्यांच्या ठरलेल्या सालानुसार दवंडी द्यायचे. म्हणजे भाऊबंदकी मध्ये त्यांचं ठरलेलं असायाचं.आजही आहे. विशेष असे कि,आज कुटुंबातील प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे.व्हाट्स ऍप ग्रुप आहेत,वर्गमित्रांचा, गावाच्या ग्रामपंचायत योजना व विकासासंदर्भातील,काही धार्मिक आहे. माहिती क्षणात लोकांपर्यंत पोहचवता येते,परंतु ही दवंडीची पारंपारिक प्रथा अजून कायम आहे. कारण त्यातील जिव्हाळा,ओढ आनंद इतर माध्यमामध्ये नाही.गावातील बहुतांश कुटुंब हे शेतकरी वर्गातील असल्यामुळे दिवसा शेतात राबतात व साधारण दिवे लागणीच्या वेळी गुरांचा चारापाणी करून,दूध वगैरे काढून सायंकाळपर्यंत घरी येतात.किराणा दुकानदाराने सांगितलेली त्यांच्या व्यवसायाची विशेष जाहिरात असेल, ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना केलेल्या सूचना,आवाहन,असो अध्यात्मिक कार्यक्रमासंदर्भातील असो अथवा मनोरंजनाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती असो.माझ्या गावातील सर्व अबाल वृद्धांना हे माहीती व्हावं. या मोबाईलच्या जाहिरात किंवा सूचनेपेक्षा संध्याकाळी दिलेल्या हलकीच्या (दफड्याच्या) वाजवण्यातून दिलेली हाक अन "ऐका हो ऐका" अश्या दवंडीची कान आतुरतेने वाट पाहतात.अन त्या हलगीवाल्याच्या लयबद्ध आवाजातील दवंडी कानाला हवीहवीशी वाटते.

     या मोबाईलच्या दुनियेत क्षणभरात माहिती इकडून तिकडे पसरते.परंतु जो दवंडी ऐकण्यातला आनंद आहे तो काही वेगळाच आहे. त्या निमित्ताने मोबाईल मध्ये गुंतलेले हात दवंडी ऐकण्यासाठी कान टवकारतात. हे खूप! भलेही दवंडी पिटवणाऱ्याचा व्हिडिओ घेऊन ग्रुप वर टाकतात.ती व्हिडीओ तील दवंडी परत ऐकतात, परंतु हलगीचा आवाज,दवंडी सांगणाऱ्याचा आवाजातील गोडवा, साधे-भोळेपणा,निखळ आनंद,ओढ निर्माण करणारा व तेवढाच रसपूर्ण आहे. दवंडीची परंपरा अजूनही माझ्या गावात कायम आहे व ही हजारो वर्षाची लोककलाच आहे. ती जतन करण्याचे कार्य आताची ही पिढी करतेय. याचा अभिमान वाटतो.

श्री विनोद शेनफड जाधव 
मासरूळ जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments