महाराष्ट्रातूनच नाही तर,संपूर्ण जगभरातून साधारण एक महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता. सुखदुःखाचा सामना करत,ऊन-वारा पावसाच्या धारा सहन करत विठू नामाचा गजरात तल्लीन होऊन पवित्र भूमी पंढरपूरला पोहोचला.तेथे माय चंद्रभागेमध्ये स्नान केले व कटेवर कर ठेवून उभ्या असलेल्या पांडुरंगाचे गेले कित्येक दिवसापासून दर्शनाची ओढ मनात ठेवून,विठूरायाचे दर्शन घेतले व मन प्रसन्न झाले.जगद्गुरू संत तुकोबाराय सुद्धा विठुरायाच्या दर्शनाचे वर्णन करतांना त्यांच्या अभंगात म्हणतात,"तुझ पाहता समोरी |दृष्टी न फिरे माघारी || वरील अभंगाच्या पहिल्या चरणात आदरणीय संत तुकोबाराय म्हणतात, हे विठुराया! तुझे दर्शन झाले. मन अगदी प्रसन्न झाले. तुझे हे गोड गोजरे रूप प्रत्येकांना भक्तीच्या मोहात टाकणारे आहे.तुझ्या या साजऱ्या रूपाच्या दर्शनानंतर दुसरिकडे मन वळतच नाही.हे मन तुला सोडून माघारी जाण्यास नाही म्हणते.केवळ आणि केवळ तुला बघावेसे वाटत तसेच कित्येक दिवसापासून पायी वारी करत येणाऱ्या वारकऱ्यांच्या मनाचीही तीच अवस्था होताना दिसून येते.तोही पायी वारी चालत येऊन केवळ विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेला असतो. त्याचेही परत घराकडे जाण्यास मन धजावत नाही.अभंगाच्या द्वितीय चरणात तुकोबाराय म्हणतात, " माझे चित्त तुझ्या पाया | मिठी पडीली पंढरीराया ||2|| जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात,हे विठुराया!तुझ्या दर्शनाने माझे मन तृप्त झाले आहे.माझे मन तुझ्या चरणाची लीन झाले आहे. तन मन धन मी तुझ्या चरणावर वाहिले आहे.मला बाकी काहीच नको. ही भक्तीची मिठी तुझ्या चरणांशी मारली आहे.तू तर आम्हा लेकरांना हृदयाशी कवटळणारा आहेस.ही प्रेमाने अन भक्ती भावाने मारलेली मिठी कधीच सुटणारी नाहीये. ती आता जन्मोजन्मीसाठी घट्ट होऊन बसली आहे.
तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणात म्हणतात,"नवे सरिता निराळे | लवण मेळवितां जळे ||3|| जगद्गुरु संत तुकोबाराय वरील अभंगात म्हणतात, माझा जीव तुझ्या चरणी अर्पण केला आहे. ज्याप्रमाणे नदी दरी खोऱ्यातून वाहत येऊन समुद्रात विलीन होऊन जाते.ती समुद्रमय होऊन जाते.तशी माझी अवस्था झाली आहे.नदी समुद्राला मिळाली की, समुद्र तिला वेगळा करू शकेल काय?विठुराया! तू मला तुझ्यापासून वेगळा करू नको.पाण्यामध्ये मीठ टाकले तर त्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाते व ते संपूर्ण जलमय होऊन जाते, तशीच माझी अवस्था झाली आहे.मी पूर्णतः"विठ्ठलमय" झालो आहे.तुकोबा अभंगाच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे बळी | जीव दिला पायातळी ||4|| संत तुकोबाराय अभंगाच्या अंतिम चरणात म्हणतात, हे विठुराया! तुझ्या चरणासी मी एकरूप होऊन कायमचा तुझा झाल्यामुळे, मी स्वतःच तुझ्या चरणाखाली बळी दिला आहे.अशी जड अंतकरणाने तुकोबाची विठुरायाच्या भेटीनंतर अवस्था झाली आहे. विठुराया पासून विलग होण्याचे किंचित ही मन मानायला तयार नाही. त्याचप्रमाणे वारकरी हा वारीमध्ये पूर्णपणे विठूरायाचा सेवेकरी झालेला असतो.विठ्ठलाच्या भक्ती रसात न्हावून निघतो व विठूरायाच्या दिव्य दर्शनाने संसाराचेही भान विसरून जातो.लेकरं बायका पोरं याचे भानच राहत नाही.तो पूर्णतः विठ्ठलमय होतो. जड अंतःकरणाने विठूरायासोबत हितगुज साधतांना म्हणतो, हे विठुराया! किती रे! ही तुझ्या किमया न्यारी. तुझ्या दर्शनासाठी निघालो.भक्ती रसात न्हावून निघालो. पायी वारीत सुखदुःखात तू सदैव पाठीशी उभा राहिला.तुला आम्हां लेकरांची चिंता आहे. तू माझाच नाही तर, समस्त जगाचा पिता आहे. विठूराया! या संसाराच्या माया-मोहा मध्ये अडकलेलो आहे. घरी बायकॊ लेकरं-बाळ व मायबाप आहे.व काळी जमीन माऊली..!या जमीन मायमाऊली मध्ये घाम गाळून, अन्न पिकवून जगाला पोटानं पोटभर खाऊ घालण्यासाठीचं हे अत्यंत पवित्र कार्यकरायचं आहे.विठुराया! तू माझ्या अंतकरणात आहेच.हा संपूर्ण देह तुझा आहे.पण तुझ्या कडून एक आज्ञा हवी आहे,"जातो माघारी पंढरीनाथा | तुझे दर्शन झाले आता ||"हे विठुराया ! तुला सोडून जाण्यास मन धजत नाही मात्र, आता माघारी जावे लागेल.अन हो! विठुराया, मी घरी पोहोचल्यावरही तुझाच धावा करत राहील.शेतात जाऊन कष्ट मेहनत करेल. डोलणाऱ्या पिकातही तुलाच शोधीन. संत सावताजी महाराज तेच म्हणतात, कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी || म्हणून विठुराया तुझ्या लेकराला आता माघारी जाण्यास आज्ञा द्यावी.तुझे मन भरून दर्शन घेतले.मन तृप्त झाले. वारकरी बांधव अशीच पंढरीहुन माघारी परतण्याची विठूरायाकडून परवानगी घेऊन,परतीच्या वाटेवर निघाले असता,हृदयात मात्र वारीच्या व इतर वारकऱ्यांसोबतच्या आठवणी तथा विठुरायाची मूर्ती कोरून ठेवलेली असते.कन्या सासुरासासी जाये | मागे परतोनी पाहे || तीच अवस्था समस्त वारकऱ्यांची होते व प्रत्येक वारकरी जड अंतकरणाने व भरल्या डोळ्याने माघारी निघतात.
राम कृष्ण हरी...!
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments