Type Here to Get Search Results !

रुळा"नुबंध...!



 बुलडाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये रेल्वेमार्ग नाही.त्यामध्ये आमच्या बुलडाणा तालुक्याचीही तीच गत.रेल्वे प्रवासासाठी जायचे असल्यास गावापासून मलकापूर,शेगाव,नांदुरा येथे जावे लागायचे.अथवा मराठवाड्यातील जालना येथे जावे लागे.महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत रेल्वे प्रवासाचा योग आलाच नाही.फार तर तालुक्याच्या ठिकाणापर्यंत शैक्षणिक कामा निमित्त जाण्याचा योग यायचा.माझा रेल्वे प्रवासाचा पहिला प्रसंग आला,तो डीएडचा मित्र शेख शब्बीरसोबत...! त्याला बारावीत उत्कृष्ट गुण मिळाले होते.त्यावेळेस "आझाद कॅम्पस" पुणे या संस्थेने त्या वर्षी अर्थात 2007 ला अल्पसंख्याक आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली होती.त्याचे मुख्यालय पुणे येथेआहे. म्हणून पुणेला जाण्यासाठी स्वस्त प्रवास जर कुठला तर तो म्हणजे रेल्वेप्रवास म्हणून त्या रकमेचा चेक आणण्यासाठी मी त्याच्यासोबत मलकापूर स्टेशन वरून महाराष्ट्र एक्सप्रेस या ट्रेनने गेलो होतो आणि तोही विना आरक्षित अर्थात जनरल बोगीत. जनरल बोगीमधील प्रवास म्हणजे कमालीची गर्दी.अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती. त्यात थंडीचे दिवस.असा लांबचा आणि रेल्वेचा प्रवासकरण्याची पहिलीच वेळ. प्रवासात सोबत काय घ्यावे याचीही पूर्ण कल्पना नव्हती. एक बॅग घेऊन थोडंफार चिवडा,चटणी भाकर बांधून प्रवासास निघालो.एकाच बॅगेत दोघांचे सामान भरले.थंडी पासून संरक्षण म्हणून दोघांसाठी एकच श्वाल सोबत होती.मलकापूर भुसावळ जळगांव पाचोरा नांदगाव पर्यंत फारशी थंडी नव्हती. मनमाड नंतर मात्र थंडी जाणवायला लागली.कसातरीथंडीत कुडकडत प्रवास करत सकाळी पाच वाजता पुणे स्टेशनला उतरलो.विचारपूस करत-करत साधारण सात ते आठ किलोमीटर स्टेशन ते आझाद कॅम्पस चा प्रवास पायीच केला.शिष्यवृत्तीच्या चेकचे काम आटोपून पुण्यातील महत्त्वाचे व ऐतिहासिक वस्तूपैकी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर,शनिवारवाडा,लाल महाल बघितला आणि परत महाराष्ट्र एक्सप्रेसनेच रात्री साधारण अकरा वाजता गावाकडे येण्यास निघालो.सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मलकापूरला पोहोचलो.असा हा सन 2008 मधील हा रेल्वेचा हा पहिला प्रवास..!

 महाविद्यालयीन व व्यावसायिक शिक्षण पूर्ण झाल्यावर,काही दिवस खाजगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर भारतीय डाक विभागामध्ये नोकरींसाठी अर्ज केला.त्यातील पोस्ट ऑफिसची दुसरी शाखा अर्थात रेल डाक सेवा "एल" विभाग येथे छटाई सहाय्यक या पदावर रुजू झालो.भुसावळ म्हणजे रेल्वेचे माहेरघर अन पहिली ड्युटी रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या मेल ऑफिस मध्ये होती.पुन्हा रेल्वेशी नाळ जुळली ती तब्बल पण तीन ते साडेतीन वर्षानंतर. ड्युटीच्या निमित्ताने रेल्वे रुळाची नाळ जुळली ते कायमचीच.आमच्या कार्यालयातील ड्युटीच्या प्रकारातील एक प्रकार एक ड्युटीचा प्रकार म्हणजे "सेक्टनची ड्युटी".थोडक्यात असे की,आमच्या विभागाचे नाव रेल डाक सेवा "एल"विभाग. तर हा "एल" म्हणजे आमच्या विभागाची ओळख म्हणून ठेवलेले नाव.या "एल"च्या पुढे जसे कि,एल-29,एल-35,एल-19,एल-12 एल-27,एल-6 एल असे हे सेक्शनची नावे.ढोबळमनाने सांगायचे झाल्यास भुसावळ पासून रेल्वेत ड्युटी करत पुणे, मुंबई,सुरतला जाणे.त्याच ट्रेनने परत भुसावळला येणे.ड्युटीचे स्वरूप काय तर,मागील सेक्शनचे अर्थात नागपूर,भोपाल,ग्वालियर,जबलपूर येथील कर्मचाऱ्यांकडून चार्ज घेऊन भारतीय डाक विभागाच्या बंद बॅग,टपाल बॅग रेल्वे प्लॅटफॉर्म वरील आमच्याच कार्यालयात उतरवणे.जसे कि,जळगाव आर एम एस,चाळीसगाव टीएमओ,मनमाड टी एम ओ,नाशिक आर एम एस,कल्याण आर एम एस व अंतिम स्टेशन अर्थात मुंबईला संपूर्ण टपाल बॅग उतरवून विश्रांतीसाठी रेस्ट हाऊसला जाणे.त्याच ट्रेनने परत टपाल बॅग उतरवणे,चढवणे ही क्रिया परत भुसावळ पर्यंत येणे. तसेच पुणे,सुरत ची त्याच प्रकारच्या ड्युटीचे स्वरूप दिसून येते. यासाठी 40 सीटर स्पेशल अथवा 90 सीटरची बोगीज रेल्वे बोर्डाकडून रेल डाक सेवेसाठी भाडेतत्त्वावर पुरवण्यात आलेल्या आहे.त्याला कार्यालयीन भाषेत मेलव्हॅन म्हणतात.या बोगीमध्ये साधारण तीन किंवा चार कर्मचारी कार्यरत असतात.साध्या भाषेत दोन बाबू व दोन शिपाई.सिंगल हॅन्ड सेक्शन ड्युटीसाठी एक बाबू व दोन शिपाई असे तीन कर्मचारी बुक केलेले असतात.आमच्या कार्यालयातील भाषेत मेल एजंट अर्थात छटाई सहाय्यक किंवा मेलगार्ड व व्हीपी-1,व्हीपी-2 म्हणजेच एमटीएस कर्मचारी यांचा समावेश असतो.सारांश रूपाने ट्रेनमध्ये भुसावळ ते पुणे,भुसावळ ते मुंबई व परत भुसावळ अर्थात मुख्यालयात परत यावे लागते.ही सर्व साधारण सेक्शनच्या ड्युटीची ढोबळ मनाने संकल्पना..!

 काही कार्यालय हे रेल्वे प्लॅटफॉर्मवर आहेत त्यांना आर एम एस म्हणून ओळखल्या जाते.जे रेल्वे प्लॅटफॉर्म पासून काही अंतरावर पोस्ट ऑफिसच्या इमारतीमध्ये असल्यास सॉर्टिंग ऑफिस म्हणून ओळखल्या जाते.भुसावळचे कार्यालय प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे "भुसावळ आर एम एस" अशी ओळख आहे.तर माझाही रेल्वेशी या सेक्शनच्या ड्युटी निमित्ताने संबंध आलाच.अर्थात रेल्वे रुळाशी नाळ जुळली.मुंबई लाईनच्या ड्युटीचे सेक्शनच्या सेटप्रमाणे चार सेट आहेत.महिन्यातून साधारण सात ते आठ ड्युटी येतात.म्हणजेच चारच्या पटीत ड्युटीचे नियोजन केल्यास व एका ड्युटीचा म्हणजेच रेल्वे प्रवासाच्या किलोमीटरचा हिशोब केल्यास भुसावळ ते मुंबई,भुसावळ ते पुणे,भुसावळ ते सुरत जाणे व येणे असा साडेआठशे ते नऊशे किलोमीटरचा प्रवास होतो.एका महिन्याच्या सात ते आठ ड्युटींचा हिशोब केल्यास जवळपास मुंबईचा महिन्याभराचा सहा हजार ऐकशे साठ किलोमीटरचा प्रवास होतो.महिना ऐकतीसचा असल्यास कधी-कधी आठ ड्युटी झाली तर सात हजार चाळीस किलोमीटर एवढा प्रवास होतो.पुणे लाईन चा अर्थात भुसावळ ते पुणे व पुणे ते भुसावळ या सेक्शन च्या ड्युटीचा महिन्याभराचा सात हजार आठसे बहात्तर किलोमीटरचा प्रवास होतो.आणि वेळेचा हिशोब केल्यास भुसावळ ते पुणे,मुंबई व सुरत या ड्युटीचा महिन्याभरातील एकूण तासापैकी अडीचशे ते पावणेतीनशे तास घराबाहेर राहावे लागते त्याचप्रमाणे महिन्याभरात चौदा ते पंधरा दिवस कर्मचारी घराबाहेर ड्युटीवर कार्यरत असतात.

 आमच्या ड्युटीप्रमाणेच इतर रेल्वे कर्मचाऱ्यांचीसुद्धा याच प्रमाणे कामाची रुपरेषा ठरलेली असते.त्यांचाही असाच रेल्वे रुळासी संपर्क येतो.प्रथम श्रेणी अधिकारी,द्वितीय श्रेणीअधिकाऱ्यांपेक्षा तृतीय श्रेणी कामगार व चतुर्थश्रेणी कामगार यांचा ड्युटी निमित्त रेल्वे रुळाशी जास्त संबंध येतो.कितीतरी काळ हे कर्तव्य बजावण्यासाठी घरा घराबाहेर असतात.रेल्वे प्रवास हा चोवीस तास चालू असतो.त्यामुळे कर्मचाऱ्यांची ड्युटीही चोवीस ताशी घड्याळा प्रमाणे चालते.शिफ्टनुसार किंवा सेटनुसार चालणारी ड्युटी जसे की, सकाळी सात ते तीन,सायंकाळी पाच ते रात्री बारा,अथवा संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा पर्यंत असे ड्युटीचे स्वरूप असते.त्याचप्रमाणे ट्रेनवरील ड्युटीही त्याच प्रकारची असते.रात्री-अपरात्री अर्थात मुख्यालयाला ट्रेन जेव्हा येईल तेव्हा जसे कि,पंजाब मेल रात्री साडेअकरा असो अथवा हावडा मेल (व्हाया प्रयागराज) सकाळी चारला येवोअथवा गोवा एक्सप्रेस सकाळी साडेआठला व नऊला येवो ड्युटीला हजर राहावे लागते.यासाठी सर्व कर्मचारी जीवाचा आटापिटा करतात.कार्यालयात हजर होतात.सही मारतात व ड्युटीसाठी निघतात.

 अशाप्रकारे सर्व रेल्वे विभागातील कार्यरत कर्मचारी हे जीवन जगण्यासाठी,टिचभर पोटासाठी, कौटुंबिक गरजा,लेकरं बाळांचे शिक्षण,विवाह अर्थात सांसाराचा गाडा ओढण्यासाठी धडपड करत असतात.रात्री अपरात्री कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज असतात.ज्याच्या त्याच्या विभागानुसार जसे की पार्सल,रेल डाक सेवा,प्रवाशांचे तिकीट बुक करण्यापासून तर रेल्वे सुरक्षेसाठी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अथवा ट्रॅकमन रेल्वे प्लॅटफॉर्मवर, रुळावर अथवा ट्रेनमध्ये डोळ्यात तेल घालून कार्य करत असतात.देशसेवे बरोबर राष्ट्र विकासास हातभार लावत असतात.अशी ही सेवा भारतीय डाक विभागाची जरी दुसरी शाखा असली तरी रेल या शब्दामुळे व रेल डाक सेवेतील सेक्शन ड्युटीच्या निमित्ताने रेल्वेप्रवास,प्लॅटफॉर्म व रुळाशी संबंध जुळून आला.अर्थात रेल्वेशी"रुळा"नुबंधाच्या जुळवून आल्या गाठी...!

समस्त रेलकामगारांना समर्पित..!

श्री विनोद शेनफड जाधव 
मासरूळ जि. बुलडाणा 

Post a Comment

0 Comments