Type Here to Get Search Results !

नवरात्रीचे नवरंग अन गावाकडचं मायचं लुगडं



नवरात्रोत्संवात नऊ दिवसाच्या नऊ रंगांच्या साड्या,पातळ नेसण्याचा ट्रेंड चालू आहे. या याला ट्रेंडच म्हणावं लागेल,कारण याला शास्त्राचा आधार कुठेच नाही.केवळ ही एक व्यापाऱ्याच्या कल्पनेतून उदयास आलेली कल्पना आहे. हल्ली या महिला त्याला बळी पडत आहे."दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहिये" या पद्धतीने या सर्व गोष्टी घडताहेत.हल्ली परिस्थिती खूप बदलली आहे.आनंद आहे. बदलायलाच हवी.कारण काळ झपाट्याने बदलतोय. त्याअनुषंगाने वैचारिक पातळी बदलायलाही हवी.मात्र तुम्ही कोणत्या दिशेने चालले आहात.याचे भान हवे.फॅशन,ट्रेंड या भरकटलेल्या वाटेवर निघालात तर अशा विनाशाच्या जंगलात जाऊन अडकणार की तिथून बाहेर निघणे शक्य होणार नाही.

 बदलत्या काळानुसार,कपड्यांची उपलब्धता त्याला अनुसरून ही वेगवेगळी ट्रेण्ड,फॅशन चालू झाली आहे मात्र,एवढे असूनही फॅशनच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणे चालू आहे.याला कुठली प्रगती म्हणावी? कधीकाळी लज्जारक्षणासाठी वस्त्र नव्हती तर मानवाने झाडाची पाने वापरून लज्जारक्षण केले.कालांतराने कापड निर्मिती व्हायला लागली.मात्र लोकसंख्येच्या तुलनेत आणि विकासाबरोबर इतर गोष्टींची अनुउपलब्धता यामुळे कपड्यांची निर्मिती फारशी नव्हती.वाढती महागाई, अपुरी दळणवळणाची साधने त्यामुळे खेडे-पाडे,वाड्या वास्त्यांपर्यंत कारखान्यातून तयार झालेला कपडा गोर-गरिबापर्यंत पोहचत नव्हता. त्यामुळे मागील पंधरा ते वीस वर्षाअगोदरच्या काळात ग्रामीण भागामध्ये बिकट परिस्थिती होती.गावाकडच्या माय-माऊल्या लुगड्याला दांड घालून नेसत असत.

  लुगड्याला दांड म्हणजे काय याविषयी काहींना प्रश्न पडले असेल? कदाचित!जिल्ह्यानुसार,विभागानुसार नावे वेगवेगळे असू शकतात. मात्र सर्व खेड्या पाड्यातील गोर-गरीब माय-माऊली व बहिणींनी नक्कीच हे जीवन अनुभवलं असेल.विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये "दांड" याला म्हणायचे की,जुन्या फाटलेल्या दोन लुगडयांना शिवून नेसन्यालायक एक लुगड बनवणे.गावाकडे माय लुगडं नेसायची.पूर्वी अगदी तरुण वयापासून लुगडेच नेसण्याची पद्धत होती.त्यावेळेस नवीन कापडं फक्त सणावारालाच भेटत असत.तेही दसऱ्याला घेतले तर दिवाळीला भेटत नसत,कारण दसरा दिवाळीमध्ये अंतर ते किती दिवसाचं..! साधारण एका महिन्याचं.जे कुठेतरी एका वर्षातून सणाला भेटते ते दसरा-दिवाळी या दोन्ही सणाला कसे भेटणार,भेटलं तर रक्षा बंधनाला भावाकडून असं वर्षातून एखाद-दोन नवीन लुगडं भेटायचं.गावाकडील कामाचं स्वरूप हे रांगड!वावरात जाय.दगड,माती,ढेकळात काम कर.हे असं काम असायचं कीं, कपडे वापरा-वापरातून लवकर जीर्ण व्हायची.अन हो! आताच्या काळातल्या सारख नव्हतं."डे"ला वेगळा आणि "नाईट"ला वेगळा ड्रेस,पार्टीवेअर,फॅशनेबल वगैरे असलं काहीच नव्हतं. सकाळी घातले तर दिवसभरही तेच आणि रात्री तेच, म्हणून ते कापडं तरी काय करणार बिचारे..! वापरून वापरून वितळून जायायचे.त्याला ठिगळ लावावं लागायचं. बरं! गंमत अशी व्हायची की, लुगडं पिवळ्या,लाल,निळ्या, रंगाचं त्यामुळे दुसऱ्या ठिगळाने ते लगेच उमटून दिसायचं. पण त्याची लाज नव्हती.त्यातून लज्जारक्षण व्हायचं हे महत्वाचं होतं.ठिगळही जास्त झाले तर माय त्या फाटलेल्या जुन्या लुगड्याला जपून ठेवायची आणि अजून एखादं जुनं घरात पडलेलं लुगडं असलं की, त्या लुगड्यातील चांगला भाग कैचीने कापून घ्यायची अन अजून एका जुन्यातील चांगला भाग न वितळलेला भाग कापून घ्यायची.त्या दोन जुन्या लुगड्यातील वितळलेल्या खराब भाग वगळून त्यातील चांगल्या-चांगल्या भागातील दोन तुकड्यांपासून एक लुगडं शिवून त्यापासून सहावारी किंवा नऊवारी लुगड बनवायची.हे महिलांची उंचीनुसार असायचं.साधारण सहावारी असल्यास अठरा फुट अन नववारी असल्यास सत्तावीस ते आठ्ठावीस फूट असे. तेवढ टेपनं माप घेऊन बनवायची.त्याला मध्ये सरळ एकारेषेत शिवायची हाच तो दांड...! मग ते दोन लुगडे वेगवेगळे रंगाचे का असोनात. हरकत नव्हते परंतु,आनंद व्हायचा की,कसंतरी एक लुगडं वापरायला भेटलं.वर्षभरातून एखाद्या नवीन लुगडं भेटायचं त्याबरोबर हे वापरायला भेटायचं.

 दोन जुन्या लुगड्यांपासून त्यातील जुना भाग वगळून दोन्हीच्या मधे शिवून नेसण्यासाठी एक नवीन लुगडं बनवणं. हे आमच्या खेड्यापाड्यातील गोर-गरीब जीवनशैलीचे दर्शन होतं.जरी दोन लुगडे कापून बनवलेलं एक लुगडं वेगळ्या रंगाचं जरी असले तरी माय-माऊल्या आनंदाने नेसत असत.त्यांच्यासाठी जणूकाहि हे दांड भरलेलं हे नवीनच लुगडं होतं आणि तेच पुढील येणाऱ्या सणापर्यंत वापरत असत.केवळ लज्ज्यरक्षणासाठी...!तेच दांडाचं लुगडं नवरात्रीतही नेसायची.तेव्हा नव्हती ही हल्लीसारखी फॅशन,ट्रेंड..! नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या वेगवेगळ्या रंगांच्या साड्या वगैरे.जिथे एक रंगाचं लुगडं धड नव्हतं तेथे नवरात्रीला वेगवेगळ्या नऊ रंगांच्या साड्या,पातळ कुठून नेसणार?मग तेव्हा नवरात्रौत्सव साजरा झाला नाही का?देवी आईची मनोभावी प्रार्थना केली नाही का? नक्कीच झालेत अन तेही अगदी आनंदात...!स्वतः देवी आईने नऊ दिवस महिषासुरासारख्या राक्षसाचा वध करण्यासाठी घनघोर युद्ध केले. मधुकैटभ,चंड-मुंड,दुर्गम या राक्षसांचा वध केला.युद्धप्रसंगी देवीआईची साडी रक्ताने माखली असेल.नऊ दिवस तिची साडी,पातळ हे दृष्टांचा विनाश करून रक्तवर्णीय झाले असेल.मग ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या,नवरंगांच्या साड्यांचा ट्रेंड आला कुठून?कशासाठी हा अट्टहास? मान्य आहे, महिलांनी नटायला हवं.थटायला हव.नक्कीच छान शृंगार करा. सजा धजा.हे स्त्रीचे सौभाग्याचे लक्षण आहे परंतु,हे असले नवीन पिढीसाठी पायंडे पाडू नका. नवरात्री उत्सव आणि हे देवी आईचं रूप शक्तीचं प्रतिक आहे.तुम्ही स्वतः खंबीर उभे राहून संकटाशी सामना करायला शिका.आत्मनिर्भर व्हा! ह्या नवरात्रीच्या नऊ रंगांच्या साड्या,पातळ नेसून त्याला व्यापारी वळण लावून नका.फॅशन म्हणून सण उत्सव साजरे करू नका.अजूनही खेड्या-पाड्यात,वाडे-वस्तीवर लेकरं बाळं आया-बहिणींना पूर्ण अंगभर कपडे नाही.तरी आनंदाने जगताहेत.पूर्वीच्या काळात लुगड्याला दांड मारून नेसणारी माय-बहिण नवरंगाच्या साड्या नसूनही सुरक्षित होती.आनंदी होती.सुखी होती. काळानुसार आत्मनिर्भर व्हा.अध्यात्माबरोबर विज्ञानवादी दुष्टीकोण लक्षात ठेवून सण उत्सव साजरे करा.नवरात्रीच्या ह्या नवरंगांना शास्त्रोक्त किंवा धार्मिक महत्व नाही. गेल्या काही वर्षांपासून नवरात्रीत विविध रंग घालण्याची प्रथा सुरु झाली आहे.हे लक्षात असू द्या.

सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...!

श्री विनोद शेनफड जाधव

मासरूळ ता जि बुलडाणा

Post a Comment

0 Comments