Type Here to Get Search Results !

गावाकडील आठवणीतील दिवाळी



भारतीय संस्कृतीतील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा प्रमुख सण आहे.साधारण हा सण पाच ते सहा दिवसांचा असतो. दिवाळसणाची चाहूल ही वसुबारसपासून लागते.हा सण अश्विन महिन्यातील वद्य द्वादशीला साजरा केला जातो. याला गोवत्स द्वादशीसुद्धा म्हणतात.या दिवशी वसुबारस अर्थात गाय व तिच्या वासराची पूजा केल्या जाते.दिवाळसणातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी.हा सण नेपाळ व भारतात साजरा केला जातो.हिंदू परंपरेनुसार धन्वंतरी देवता आरोग्याची देवता म्हणून ओळखल्या जाते. सर्वांचे आरोग्य निरोगी राहो यासाठी या देवतेचे पूजन केल्या जाते.निरोगी शरीर व मनाच्या प्रसंन्नतेसाठी प्रार्थना केली जाते.त्यानंतर तिसरा दिवस हा नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते.हा सण वाईटांवर चांगल्यांचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.चौथा दिवस हा लक्ष्मी-कुबेराच्या पूजनाचा असतो. या दिवशी लक्ष्मी कुबेर या देवतेचे पूजन केले जाते.धन हे लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जाते.अर्थात पैसा केवळ हे गरज भागवण्याचे साधन असले, तरी घरात सुख-समृद्धी नांदो.यासाठी लक्ष्मी-कुबेराचे पूजन केले जाते. दिवाळी सणातील पाचवा दिवस हा दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो.यातील दीपावली पाडवा पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक आहे, तर बलिप्रतिपदा हा शेतकरी राजांच्या उदार व समर्पण भावाचे प्रतीक आहे. दिवाळी सणातील अंतिम दिवशी भाऊबीज हा सण साजरा केल्या जातो. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते. त्याच्या सुखा- समाधानासाठी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. या सर्व पाच ते सहा दिवसांच्या सणांच्या आनंदमय वातावरणामुळे चहूकडे प्रसन्नता असते.

 या दिवाळी सणाला संपूर्ण महाराष्ट्राबरोबर भारतातील शाळा- महाविद्यालयांना सुट्ट्या असतात.जिल्ह्यानुरूप साधारण दहा ते पंधरा दिवसांच्या या सुट्ट्यांमध्ये मुले खूप धमाल करतात. मात्र गावाकडे आमच्या काळात काही अंशी वेगळी परिस्थिती होती.प्रथम सत्र परीक्षा झाली की,आम्ही मुलं शेतात कामाला जायचो. हा काळ म्हणजे शेतकऱ्यांच्या सुगीचा काळ म्हणून ओळखला जातो. या काळात सोयाबीन, मका काढणीवर येतात तर झाडावर पिकलेल्या लाल मिरच्या तोडण्याची वेळ असतें. त्याचबरोबर कापूस वेचणीचीही वेळ असते.खरीप पिक घेऊन शेतकरी राजा हा रब्बी पिक पेरणीच्या तयारीला लागलेला असतो. तर या काळात शेतकरी हे शेतीच्या कामात गुंतलेले असायचे. खरिपातील हंगाम घेऊन रब्बीच्या तयारीला लागलेले असायचे. दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या असायच्या. आमच्याकडे स्वतःची शेती नव्हती.आम्ही भावंडे गल्लीतील मित्रमंडळीसोबत दुसऱ्याच्या शेतात किलो प्रमाणे मिरच्या तोडायला व कापूस वेचला जायचो.

 गावाकडील शाळेला दिवाळीला मस्तपैकी पंधरा दिवस सुट्ट्या असायच्या व आमच्या मनाच्या त्यात पाच दिवसअश्या एकूण साधारण वीस दिवसाच्या सुट्ट्या पकडून शाळेला दांडी असायची. सुट्ट्या लागल्याबरोबर दुसऱ्या दिवशी कुणी शेतकऱ्यांने बोलवल्यास शेतात मिरच्या तोडायला व कापूस वेचायला कामावर येण्यास "हो" म्हणायचो. कारण या कामातून मिळालेल्या पैशातून आम्ही पोरं फटाके, शाळेच्या वस्तू वगैरे घ्यायचो. मला तर लहानपणापासून शालेय वस्तूंचीच आवड होती.त्यामध्ये विशेषतः छान पेन, चित्रकलेची वही, रंग कामाचे साहित्य, एखादे-दोन छान-छान गोष्टीचे पुस्तके यासाठी हा सर्व खर्च करायचो. कारण मला लहानपणापासून चित्रकला, पुस्तक वाचनाबरोबर शाळेसंबंधी वस्तू खरेदी करण्याची खूप हौस होती. अजूनही आहेच. त्यामध्ये विशेषतः डायरी, पेन पुस्तक रंगकामासाठी साहित्य या गोष्टी मला अजूनही खरेदी करायला आवडतात.

 दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सकाळी लवकर उठायचो. ऑक्टोबर- नोव्हेंबरचा काळ असल्यामुळे काही अंशी थंडीची चाहूल लागलेली असायची. त्यातही आई-बाबा आम्हाला सकाळी पाच ते सहा वाजताच झोपेतून उठवायचे.आंघोळ केली की झोप उडवायची.मात्र थंडी जाणवल्यास बाहेर शेकोटी पेटवायचो. शेकोटीतून उब घ्यायचो. तोपर्यंत आई स्वयंपाक बनवायची.आई वावरात नेण्यासाठी पालवामध्ये भाकरी बांधून द्यायची.एक टोपलं घेऊन मिरच्या तोडण्यासाठी वावरात निघायचो.कापूस वेचायला गेलो तर मात्र,आईच्या जुन्या लुगड्याचा कापड घेऊन जायचो,कारण कापूस वेचण्यासाठी त्याची ओटी बनवावी लागायची.सकाळी-सकाळी सुंदर सूर्यप्रकाशात आम्ही पोरं पंढरीला निघणाऱ्या वारी प्रमाणे पांद-रस्त्याने वावरात जायचो. जातांना मौज-मस्ती करत जायचो. रस्त्याने एखादी विहीर लागली की, लगेच एक डुबकी मारायचो.तशाच ओल्या अंगाने कुडकुडत निघायचो. हवेने आणि सूर्यप्रकाशाने अंगावरील कपडे कधी सुकून जायचे हे कळतही नव्हते. खरंच! किती हा रांगडेपणा...! आता आठवण आली तर डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबत नाही. या आठवणींच्या साठवणीचं भलं मोठं गाठोड उकलायला लागलो की,गावाकडील जगलेले सुवर्णक्षण एकामागून बाहेर पडतात व मन आठवणीत रमून जातं. वावरात पोहोचले की, आंब्याच्या किंवा निंबाच्या झाडाला चटणी,भाजी भाकरी टांगून द्यायचो. कारण खाली ठेवली तर कुत्रे येऊन खाऊन टाकायचे.काम करून थकल्यामुळे अश्यावेळेस कडाडून भूक लागल्यावर पंचायत व्हायची.म्हणून तशी काळजी घ्यावी लागे. वावरातील एक तास म्हणजे एक सरळरेषेत लावलेली मिरचीच्याकिंवा कपाशीच्या झाडांची रांग. तर अश्या दोन रांगा एका-एकाने घेऊन मिरची तोडायला किंवा कापूस वेचायला सुरुवात करायचो. त्या दोनतासाला"वखर"म्हणायचे. दिवसभरातून साधारण आम्हां चौदा ते पंधरा वयोगटातील मुलांकडून साधारण तीस ते पस्तीस किलोपर्यंत मिर्च्या तोडून व्हायच्या.संध्याकाळी शेतमालक तोडलेल्या मिरच्यांची पोतडी वजन काट्याला टांगून वजन करायचे. कागदावर नाव लिहून नोंद ठेवायचे. साधारण एक रुपया किलो प्रमाणे प्रमाणे तोडायची मजुरीअसायची. म्हणजेच तीस ते पस्तीस रुपये रोज त्या काळात आम्ही शेतात काम करून कमवायचो.

  दिवाळीच्या या पंधरा ते वीस दिवसाच्या सुट्ट्यांमध्ये जवळपास दहा ते बारा दिवस कामाला गेल्यावर साधारण साडेचारशे ते पाचशे रुपये कमवायचो.चारसे ते पाचशे रुपये म्हणजे आमच्यासाठी खूप होते. एका आठवड्याचे किंवा साधारण दोन आठवड्याचे हे बाजाराच्या दिवशी जमा झालेले पैसे आम्ही मुलं एका डब्यात ठेवायचो.दिवाळी जवळ आली की, आवडीच्या वस्तू खरेदी करायचो. खेड्यातील हे जीवन म्हणजे गोरगरीब लोकांच्या जीवन जगण्याच्या कसोटीतील क्षणांचा चित्रपट असतो.अनेक अडचणी असूनही आनंदाने कसे जगावे? खेड्यातील माणूस यातील एक कलाकार म्हणून महत्त्वाची भूमिका निभावत असतो. जरी त्याची नोंद नसली तरी,मात्र ज्याने हे क्षण अनुभवले तो त्या कथेतील नक्कीच हिरो असतो. विशेषतः गावाकडील माझा शेतकरी राजा. हा दिवाळसणासारख्या या प्रमुख सणांमध्ये सुद्धा शेतात राब-राब राबत असतो. केवळ सर्वांच्या मुखी घास यावा. यासाठी तो सदैव झटत असतो. येणाऱ्या अस्मानी,सुलतानी संकटांचा सामना करत.तो खंबीर उभा असतो.एखाद्या पर्वतासारखा.ऊन, वारा पाऊस सर्व काही सुख-दुःख सहन करत जगत असतो.

 दिवाळसणातील वसुबारसच्या पहिल्या दिवसापासून लागलेली चाहूल ते भाऊबीज या दरम्यान शाळेला लागलेल्या पंधरा ते वीस दिवसाच्या सुट्ट्यात वावरात जाऊन जमवलेल्या पैशातून आवडीच्या वस्तू खरेदी करायचो.काहीजण घरातील गरजेच्या वस्तूसाठी हातभार लावायचे.बाबा आमच्यासाठी कपडेलत्ते घ्यायचे.आई गोडधोड असे फराळाचं बनवायची. त्यामध्ये चकली, चिवडा,शेव बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू शंकरपाळे,करंजी वगैरे असे पदार्थ असायचे.मित्रमंडळी एकमेकांना फराळाला बोलवायचे.यातून गाठीभेटी व्हायच्या. परिस्तिथी लक्षात घेऊन काही वडिलधारे मंडळीनी नवीन कपडे खरेदी केले नाही तरी त्यांना स्वच्छ धुऊन प्रेस मारून घालायचे.मात्र कधी त्याचे दुःख मानले नाही. मर्यादित गरजा होत्या.मात्र त्यातही जगण्यात खूप आनंद होता. गावाकडील लोकांचं जगणं व जश्या आहे तश्या परिस्थितीत आनंद मानून सण साजरे करण्यात खूप मोठे गूढ आणि समर्पण सुद्धा होते.

गावाकडील लोक सुखी,समाधानी व आनंदी आहेत.त्यांना डिजिटल लाईफ अजून माहीत नाही.अन जे झगमगाटात जगतात.डिजिटल होऊ पाहतात त्यांना एकमेकांना स्टोरी, स्टेट्स ठेऊन दाखवाव लागतंय कि,आम्ही आनंदी आहोत. विशेष म्हणजे काहिजण तर, या पण भ्रमात असतात स्टोरी, स्टेट्स न टाकणारे सुखात नसावेत.पण सत्य असं असतं की, ते लोक दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात त्या वास्तविक क्षणात त्यांचं सुख साजरं करत असतात.त्यांना या दिखावेपणाच्या मायावी जगाची अनुभूती आधीच आलेली असते.अशी ही गावाकडील साजरी होणारी ही दिवाळी खरंच!सुवर्णक्षणाचा साठा आहे.गावाकडील लोकांचा सण समारंभ साजरा करण्यात साधेपणा असला तरी मात्र रूढी,परंपरेला व संस्कृतीला धरून सण साजरे होतात.त्याचप्रमाणे निखळ प्रेम,आनंद,प्रसन्नता दिसून येते.अश्या या गावाकडील दिवाळीच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.

श्री. विनोद शेनफड जाधव 

मासरूळ ता जि बुलडाणा 



Post a Comment

0 Comments