Type Here to Get Search Results !

उरूणचा समावेश न करणाऱ्यांना , जनता माफ करणार नाही आ. जयंतराव पाटील



 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्राचारार्थ कोपरा सभा


ईश्वरपूर / प्रतिनिधी

उरूण ईश्वरपूरचे स्वप्न साकार होण्याऐवजी, शहराचे नाव फक्त इस्लामपूरचे ईश्वरपूर असे बदलले गेले, मात्र उरूणचा त्यात समावेश झाला नाही. “उरूणला वगळण्याचे पाप करणाऱ्यांना उरूणसह शहरातील जनता माफ करणार नाही,” असा घणाघात माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी प्रचारसभेत केला.

काळा मारुती चौक, गणेश मंडई, बुरुड गल्ली, आंबेडकर नगर व उरूणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी कोपरा सभा घेतल्या. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. अरुणादेवी पाटील, पै. भगवान पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, प्रा. शामराव पाटील, मुनीर पटवेकर, माजी नगरसेवक एल. एन. शहा, खंडेराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, “माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी भरीव निधी दिला. ताकारी, वाघवाडी, कामेरी, बहे रस्त्यांचे काँक्रीटीकरण; शहरात प्रथमच फ्री वायफाय; अशा अनेक सुविधा आणल्या. पण गेल्या नऊ वर्षांत नवीन काही झाले नाही. आमचा एक गडी तिकडे गेला हेच एकमेव घडले.”माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील म्हणाल्या की, आ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराने अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले. “विरोधकांनी शहरासाठी नेमके काय केले?” असा सवाल त्यांनी केला.

शहाजी पाटील यांनी माजी नगराध्यक्षांवर दलित प्रभागात विद्यार्थ्यांची मते घालण्याचा आरोप केला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मतदार भाजप आणि जातीयवादी पक्षांना मतदान करणार नाही,” असेही ते म्हणाले.एल. एन. शहा म्हणाले, “या शहराचा सर्वांगीण विकास फक्त आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालीच शक्य आहे. व्यापार-उद्योग वाढवण्याचा माझा विशेष प्रयत्न राहील.”

महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात म्हणाल्या, “मागील निवडणुकीत थोडक्यात विजय हुकला, तरी मी कार्यरत राहिले. यावेळी नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी.”

सभेत आनंदराव मलगुंडे, पै. भगवान पाटील, खंडेराव जाधव, शाकीर तांबोळी, अँड. आर.आर. पाटील, गणेश शेवाळे, शंकरराव चव्हाण, संदीप माने यांनीही भाषण केले. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना (उबाठा) मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.

 चौकट...

शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीचे आजार वाढत  आहेत. “वाहतूक कोंडी, अस्वच्छता, अडचणी यांचा भडका उडाला आहे. आम्ही सत्तेत आलो तर सर्वांना विश्वासात घेऊन यावर मार्ग काढू,” असे आ. जयंतराव पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments