Type Here to Get Search Results !

जागतिक शौचालय दिनानिमित्त “स्वच्छता आणि प्रतिष्ठेसाठी सामूहिक जबाबदारी” सप्ताह उपक्रमाचा समारोप



*भोर - प्रतिनिधी नरेंद्र यादव* 

पुणे महानगरपालिकेच्या मुळा–मुठा प्रदूषण नियंत्रण (PARMM) प्रकल्पातील जनजागृती आणि लोकसहभाग (PAPP) घटकांतर्गत शेल्टर असोसिएट्स आणि इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या स्वच्छता जागरूकता साप्ताहिक उपक्रमाचा समारोप आज पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोलेरोड येथे उत्साहात पार पाडला.

जागतिक शौचालय दिन – १९ नोव्हेंबर २०२५ निमित्त १७ ते २२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान झोन २ मधील क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय व कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये सार्वजनिक शौचालयांची पाहणी, स्वच्छता, किरकोळ दुरुस्ती तसेच उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता केलेल्या जागांवर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी रांगोळी, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून स्वच्छतेचे प्रभावी संदेश दिले. हा सप्ताह स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण करणारा ठरला.

कार्यक्रमाचे उद्घाटन नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेणाऱ्या “सेल्फी पॉईंट” चे उद्घाटन करून त्यात फोटो काढून झाले. नागरिकांच्या स्वच्छतेच्या सवयींमध्ये चांगले बदल व्हावेत यासाठी एक पथनाट्य सादर केले. तसेच, विद्यार्थ्यांनी बनविलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारीत पर्यावरणपूरक मॉडेल्स, परम प्रकल्पांतर्गत जनजागृती आणि लोकसहभाग (PAPP) च्या माध्यमातून तयार केलेली विविध साधने आणि पर्यावरणपूरक मासिकपाळी साधनांचे प्रदर्शन कार्यक्रमाच्या वेळी लावलेले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आलेल्या नागरिकांशी पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संवाद साधता आला. या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेच्या मलनिःसारण विभागाचे मुख्य अभियंता आणि परम प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक जगदीश खानोरे यांनी बोलताना शहरातील प्रदूषण कमी करण्याची गरज सांगून जल प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांच्या वर्तणुकीतील बदलावर अधिक भर दिला. शेल्टर असोसिएट्सच्या सहाय्यक कार्यकारी संचालक धनश्री गुरव यांनी परम प्रकल्पातील जनजागृती आणि लोकसहभाग (PAPP) अंतर्गत शहरात आजवर झालेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेच्या मल:निस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, कैलास कारळे, कनिष्ठ अभियंता भूषण सोनवणे, परम प्रकल्पामध्ये सल्लागार असलेल्या NJS चे प्रतिनिधी सुयोग साळुंखे व सुरज कुमार, डॉ. राजेंद्र प्रसाद इंग्लिश मीडियम स्कूल बोपोडीचे मुख्याध्यापक श्रीकांत ठाकूर, आरती गमरे व विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी घेतला तसेच नागरिक ही कार्यक्रमाला उपस्थित होते. शिवाय सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने व शिवाजीनगर घोले रोडचे आरोग्य निरीक्षक महेश जाधव हे ही उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विजेते विद्यार्थी, स्वच्छता आणि PMC Care app वापरणारे नागरीक, महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेल्टर असोसिएट्सच्या प्रकल्प व्यवस्थापक डॉ. नीलिमा गावडे यांनी केले. 

या उपक्रमाचे नियोजन पुणे शहराच्या झोन दोनचे परिमंडळ उपायुक्त संतोष वारुळे व शेल्टर असोसिएट्स आणि इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन यांच्या सहकार्याने करण्यात आले. हा उपक्रम पुणे महानगरपालिका मल:निस्सारण विभाग व NJS संलग्न संस्थांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

Post a Comment

0 Comments