महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘नॉर्थईस्ट कम्युनिटी कनेक्ट’ हा महत्त्वाकांक्षी व समाजाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. उत्तर-पूर्व भारतातील राज्यांमधून शिक्षण, रोजगार व व्यवसायासाठी पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधणे, त्यांचा विश्वास संपादन करणे तसेच सुरक्षिततेबाबत त्यांना अधिक जागरूक करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये उत्तर-पूर्व भारतातील सुमारे ७८ नागरिकांनी सहभाग घेत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विविध संस्कृतींचा संगम साधत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला.
ध्वजारोहणानंतर आयोजित बैठकीत उत्तर-पूर्व भारतातील नागरिक, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय), विशेष शाखेचे अधिकारी तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बैठकीदरम्यान उत्तर-पूर्व नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या, सामाजिक अडचणी, सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न, निवास व्यवस्था, रोजगारस्थळी उद्भवणाऱ्या अडचणी तसेच पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्याबाबत खुलेपणाने मते मांडली.
पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सविस्तरपणे ऐकून घेतल्या असून, त्यावर तातडीने तसेच दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. उत्तर-पूर्व भारतातील नागरिकांशी नियमित संपर्क राखण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे समन्वयाने निराकरण करण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्तरावर विशेष शाखेतील पोलीस उप-आयुक्त यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीदरम्यान उपस्थितांना डायल ११२, महिला व नागरिकांसाठी उपलब्ध असलेले विविध हेल्पलाईन क्रमांक, तसेच पोलीस विभागाच्या मोबाईल अॅप्सबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत कशी मिळवावी, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया काय आहे, याबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली.
हा ‘नॉर्थईस्ट कम्युनिटी कनेक्ट’ उपक्रम केवळ पोलीस आयुक्तालयापुरता मर्यादित न राहता सांगवी, निगडी, चिंचवड, दापोडी, संत तुकाराम नगर, एमआयडीसी भोसरी, वाकड, रावेत आदी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातही राबविण्यात आला. संबंधित ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात उत्तर-पूर्व भारतातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. पोलीस व नागरिक यांच्यातील आपुलकीचा व विश्वासाचा संवाद या माध्यमातून अधिक दृढ झाला.
एकूणच ‘नॉर्थईस्ट कम्युनिटी कनेक्ट’ हा उपक्रम पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला असून, यामुळे उत्तर-पूर्व राज्यांतील विद्यार्थी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना, पोलीस प्रशासनाविषयी विश्वास तसेच समाजातील आपलेपणाची जाणीव अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होणार आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments