Type Here to Get Search Results !

रानात पेटली केशरी होळी,पळसफुलांनी घेतला अग्नीमय बहर



प्रतिनिधी महागांव विवेक  नरवाडे दवंडी वार्तापत्र 

महागांव तालुका परिसरात सध्या रानावनात एक वेगळीच धग पेटलेली दिसत आहे. होळीच्या आगमनाची चाहूल लागताच डोंगरकड्या, शेतमाळ, ओसाड टेकड्या केशरी-तांबड्या रंगाने उजळून निघाल्या आहेत. पानगळ झालेल्या झाडांवर अचानक फुललेली पळसाची फुले पाहिली की जणू आकाशातील ज्वाळाच जमिनीवर उतरल्या आहेत, असा भास होतो. म्हणूनच या वृक्षाला “अग्नीवृक्ष” असेही म्हटले जाते.


Butea monosperma असे शास्त्रीय नाव असलेला पळस ग्रामीण भागात “टेसू”, ढाक, किंजळ” या नावांनी ओळखला जातो. पाने पूर्ण गळून गेल्यानंतरही फांद्यांवर फुलांचा अग्नीमय साज चढलेला दिसतो. जणू कोरड्या रानात निसर्गाने स्वतःच होळी पेटवली आहे, असे दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे.


पूर्वी गावाकडे होळीच्या आधी पळसफुले गोळा करून त्यांचा नैसर्गिक रंग तयार करण्याची पद्धत होती. फुले पाण्यात भिजवून तयार केलेला केशरी रंग त्वचेला अपाय न करणारा आणि आरोग्यदायी मानला जायचा. रासायनिक रंगांचा वापर वाढल्यानंतर ही परंपरा कमी झाली असली तरी काही ठिकाणी अजूनही नैसर्गिक रंगांची जपणूक केली जाते.

ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांनी ‘जंगलाचं देणं’ या पुस्तकात पळसाचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, पळस फुलला की रान उजळून निघते; जणू निसर्गाने स्वतःच्या हाताने होळी पेटवली आहे.

 

ओसाड वाटणाऱ्या झाडालाही पुन्हा बहर येतो, ही आशेची शिकवण पळस देतो.

पळसाच्या फुलांचा आकार पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. मधुरसाने भरलेली ही फुले मधमाश्या, फुलपाखरे आणि विविध पक्ष्यांना आकर्षित करतात. त्यामुळे पळस हा फक्त शोभेचा वृक्ष नाही, तर जैवविविधतेसाठी महत्त्वाचा आधार आहे. त्याच्या पानांच्या पत्रावळ्या बनवल्या जातात, तर गोंद औषधी गुणांसाठी वापरला जातो.


सध्या होळी जवळ येत असताना गावागावात शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ या फुलांचा बहर पाहण्यासाठी रानात फेरफटका मारताना दिसतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला निसर्गाने उधळलेली ही केशरी आरास प्रत्येकाच्या मनात उत्साह निर्माण करते.

पळसाचा हा ज्वालामय साज जणू एक संदेश देतो 

जुने गळून पडू दे, नव्या फुलांनी जीवन उजळू दे.

रानातील ही केशरी होळी ग्रामीण जीवनात नवचैतन्याची उब निर्माण करत आहे.


Post a Comment

0 Comments