Type Here to Get Search Results !

सौ. रंजना दीपक आडे अध्यक्षपदी विराजमान, काँग्रेसचे ‘पानिपत’, नितीनजी भूतडा ठरले महागांवचे ‘किंगमेकर’



प्रतिनिधी महागांव दवंडी वार्तापत्र विवेक नरवाडे

महागांव : नगरपंचायतीच्या राजकारणात अखेर सत्तांतराचा मोठा स्फोट झाला असून भारतीय जनता पक्षा ने काँग्रेसचा बालेकिल्ला भेदत सत्ता काबीज केली आहे. अध्यक्षपदी सौ. रंजना दीपक आडे यांची बहुमताने निवड होताच सभागृहात आणि बाहेर एकच जल्लोष उसळला. महागावच्या राजकारणात हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

नगरपंचायत सभागृहात विभागीय अधिकारी उमरखेड येथील सखाराम मुळे यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात सौ. रंजना दीपक आडे यांना तब्बल १२ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. काँग्रेसच्या उमेदवार सौ. रूपाली संतोष कोल्हेकर यांना केवळ ५ मतांवर समाधान मानावे लागले. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, एकमेकांना मिठ्या मारत विजयाचा जल्लोष केला.

महागांवात काँग्रेसची मजबूत पकड असल्याचे चित्र होते. मात्र अंतर्गत मतभेद, नाराजी आणि नेतृत्वातील विसंवाद यामुळे काँग्रेसची घसरगुंडी सुरू होती. त्याचा अचूक अंदाज घेत भाजपने शांतपणे मोर्चेबांधणी केली. निर्णायक क्षणी काही सदस्यांनी भूमिका बदलताच राजकीय समीकरणे पूर्णपणे उलटली. त्यामुळे स्थानिक पातळीवर या पराभवाला “काँग्रेसचे पानिपत” असे संबोधले जात आहे.

या संपूर्ण घडामोडीत भारतीय जनता पक्ष यवतमाळ वाशिम जिल्हा समन्वय क नितीन भूतडा यांची रणनीती निर्णायक ठरल्याची चर्चा रंगली आहे. पडद्यामागून सूक्ष्म नियोजन करत त्यांनी भाजपची ताकद एकवटली आणि सत्ता हस्तगत केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांना “महागांवचे किंगमेकर” अशी उपाधी दिली जात आहे.

सभागृहात मतदान सुरू असताना वातावरण तणावपूर्ण होते. प्रत्येक मत मोलाचे ठरत असल्याने दोन्ही गटांकडून शेवटपर्यंत जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र निकाल लागताच स्पष्ट झाले की, भाजपने केवळ बहुमत मिळवले नाही तर काँग्रेसचा आत्मविश्वासही डळमळीत केला आहे.

अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर सौ. रंजना दीपक आडे यांनी विकासाला प्राधान्य देण्याचा शब्द दिला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाशव्यवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांवर भर देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “राजकारण बाजूला ठेवून महागांवच्या प्रगतीसाठी काम करू,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.

दरम्यान, काँग्रेसमध्ये मात्र आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. मजबूत गड मानल्या जाणाऱ्या महागांवात सत्ता गमावल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. येणाऱ्या काळात पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महागांव नगरपंचायतीतील या सत्तांतरामुळे तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. भाजपच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असला तरी नागरिकांच्या अपेक्षा आता नव्या नेतृत्वाकडे लागल्या आहेत. विकासाच्या आघाडीवर ठोस कामगिरी झाली तरच हा विजय खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल, अन्यथा जनतेला कौल पुन्हा बदलायला वेळ लागणार नाही, हेही तितकेच खरे.

Post a Comment

0 Comments