Type Here to Get Search Results !

महागाव नगरपंचायतीत सत्तांतरानंतर अध्यक्षपदावर भाजपची मोर्चेबांधणी काँग्रेसला मोठा धक्का




प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे

महागाव नगरपंचायतीतील काँग्रेसची सत्ता उलथवून लावल्यानंतर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर आता अध्यक्षपदासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू असून अखेर अध्यक्ष भाजपचाच होणार, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर यांना अविश्वास ठरावामुळे पदावरून पायउतार व्हावे लागले. काँग्रेसच्या तीन तसेच ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकाने मित्रपक्षाच्या अध्यक्षांविरुद्ध मतदान केल्याने सत्तेचे गणित एका क्षणात बदलले. काँग्रेसकडील अध्यक्षपद डळमळीत झाल्यानंतर भाजपने संधी साधत आपली मोर्चेबांधणी अधिक मजबूत केली.

नगरपंचायतीचा कार्यकाळ अवघ्या आठ ते नऊ महिन्यांवर आला असतानाही सत्तेसाठी मोठी राजकीय चुरस सुरू आहे. भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी प्रभावी राजकीय रणनीती आखत अविश्वास ठराव पारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. चार नगरसेवकांचे समर्थन मिळाल्यानंतर काँग्रेसची सत्ता अल्पमतात गेली.

दरम्यान, ठाकरे गटाचे नगरसेवक प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांच्या कथित अपहरणाच्या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले. या प्रकरणानंतर अविश्वास ठरावाच्या हालचालींना अधिक वेग मिळाला. काँग्रेसने अध्यक्षपद वाचवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केल्याचे सांगितले जात असले तरी अखेर ते निष्फळ ठरले.

आता अध्यक्षपदासाठी भाजपच्या नगरसेविका रंजना आडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या बंडखोर नगरसेविका जयश्री नरवाडे यांच्याही नावाची चर्चा असली तरी सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

शहरात सध्या एकच चर्चा रंगली आहे महागाव नगरपंचायतीचा पुढील अध्यक्ष भाजपचाच असणार का? उपलब्ध संख्याबळ आणि बदललेली राजकीय परिस्थिती पाहता भाजपची बाजू मजबूत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अध्यक्षपदावर भाजपची मोहर उमटण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे


आगामी काही दिवसांत अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय होणार असून त्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. महागावच्या राजकारणात सध्या भाजप आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


Post a Comment

0 Comments