Type Here to Get Search Results !

कोटमगाव रेल्वे पुलाला ट्रकची धडक; उंची रोधकामुळे बस - ट्रॅक्टर वाहतूक ठप्प

 



प्रतिनिधी  :-  गणेश ठाकरे,लासलगाव

लासलगाव - पिंपळगाव (ब) मार्गावरील कोटमगाव येथील रेल्वे पुलाला दोन दिवसांपूर्वी एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने पुलाच्या स्लॅबचे नुकसान झाले आहे. स्लॅबमधून खडी खाली पडू लागल्याने रेल्वे वाहतुकीला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी ‘हाईट गेज’ (उंची रोधक) बसविण्याचे काम सुरू केले; मात्र या निर्णयामुळे परिसरातील रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

        हाईट गेज लावल्यानंतर पुलाखालून जाणाऱ्या बस सेवा बंद पडल्या असून, सध्या सुरू असलेल्या शाळा - महाविद्यालयांच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा विक्रीसाठी येणारे ट्रॅक्टरही याच मार्गाचा वापर करतात. उंची कमी झाल्यास ट्रॅक्टरची वाहतूक थांबून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर जगताप यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. बस व ट्रॅक्टर वाहतूक बंद राहिल्यास विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे हाल होणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. अनेक वर्षांपासून हा मार्ग सर्वांसाठी सोयीचा असून अचानक घेतलेल्या निर्णयामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी नवीन पूल बांधून तयार आहे; परंतु महावितरणच्या विद्युत तारा व केबल्स आवश्यक उंचीवर नसल्याने नवीन पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून जुन्या पुलाचा वापर सुरू ठेवणे अपरिहार्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मा. गिरीष महाजन आणि छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून महावितरणकडे पाठपुरावा सुरू आहे. विद्युत तारा हलविण्याचे काम पूर्ण होताच सर्व वाहतूक नवीन पुलावरून वळवण्यात येईल. तोपर्यंत किमान दोन आठवडे रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे व पुलाची उंची कमी करू नये.--ज्ञानेश्वर (डी.के) जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य

Post a Comment

0 Comments