प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
महागांव : भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महागांव शहरातील महिला लोकप्रतिनिधींचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक व विकासात्मक कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नितीन भाऊ भुतडा यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना आणि सामाजिक कार्य अधिक बळकट होत असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात महागांव नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. रंजना दीपक आडे, पाणीपुरवठा सभापती सुरेश पाटील नरवाडे आरोग्य सभापती डाखोरे ताई, नगरसेविका सौ. करूणाताई नारायण शिरबिडे तसेच नगरसेविका जयश्री इंगोले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
स्थानिक पातळीवर विकासकामे राबविणे, नागरिकांच्या समस्या सोडविणे तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे या माध्यमातून महिला लोकप्रतिनिधींनी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महागांव शहराध्यक्ष निलेश विश्वासराव नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नितीन भाऊ भुतडा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम होत असून कार्यकर्त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले. तसेच समाजकारणात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधी विविध विकासकामांमध्ये पुढाकार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नितीन भाऊ भुतडा यांच्या कार्याचा गौरव करताना ते जनतेशी जुळलेले नेतृत्व असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देणारे आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे नेते म्हणून त्यांची ओळख असल्याचेही वक्त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबविले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यातून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक स्तरावर कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करून समाजकारणाला बळ देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नितीन भाऊ भुतडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली परिसराचा विकास अधिक वेगाने व्हावा आणि समाजकारणाची परंपरा अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments