प्रतिनिधी. / गणेश ठाकरे लासलगाव :-
निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील शिरवाडे, वाकद, कोळगाव, कानळद परिसरात आज दुपारी सुमारे सव्वाचार वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वारे, पावसासह गारपीट झाली. या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या गहू, द्राक्ष व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दुपारपर्यंत वातावरण स्वच्छ असताना अचानक ढग दाटून आले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. यासोबत झालेल्या गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांवर मोठा परिणाम झाला. विशेषतः द्राक्ष बागांमधील घडांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले असून उन्हाळी कांद्याच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून, अनेकांनी हे संकट २००९ साली आलेल्या गारपिटीच्या आपत्तीशी तुलना केली आहे. त्या वेळीही या भागाला शंभर टक्के फटका बसला होता आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. आधीच वाढते उत्पादन खर्च, अनिश्चित बाजारभाव आणि हवामानातील लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडले असताना या नव्या संकटाने त्यांची चिंता अधिक वाढवली आहे. अनेक शेतकऱ्यांचे हंगामावर अवलंबून असलेले उत्पन्न धोक्यात आले आहे. म्हणूनच शासनाने याची दखल घेऊन नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी तसेच पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments