*प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी
विडूळ (ता. उमरखेड, ): उमा महेश्वर संस्थान, विडूळ येथे आयोजित 'शिवनाम सप्ताहातील प्रबोधन माला' कार्यक्रमात प्रा. मिलिंद कांबळे यांनी “माय हेच सर्वोच्च देऊळ आणि तीर्थक्षेत्र” या विषयावर अत्यंत हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक व्याख्यान देत उपस्थितांना भावनिक केले.
“माया मायेपुढे फिके समंदे देऊळ-राऊळ, तिच्या पायांच्या भेगात माझे अजिंठा-वेरूळ” या सुस्वर ओळींनी आपल्या भाषणाची सुरुवात करत त्यांनी आईच्या महानत्वाचे प्रभावी वर्णन केले. आई हीच खरी जीवनातील देवता असून तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने तिचा सन्मान आणि आदर करावा, असे त्यांनी आवाहन केले.
या प्रबोधन मालेच्या पहिल्या पुष्पात ‘स्त्री मातृत्व चळवळ’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी आई प्रतिकूल परिस्थितीत कुटुंब कसे सांभाळते, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून घराला कसे पुढे नेते आणि मुलांमध्ये संस्कारांची जपणूक कशी करते, याचे जिवंत उदाहरणांसह सविस्तर विवेचन केले.
शिवनाम सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक आणि वैचारिक प्रबोधनाचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध नामांकित कीर्तनकार आणि दिग्गज व्याख्याते यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमा महेश्वर संस्थान शिवनाम सप्ताह समिती, वीरशैव सेवा मंडळ, मन्मथ ज्योत यात्रा मंडळ आणि शिक्षण दृष्टी केंद्र, विडूळ यांच्या सर्वच सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments