Type Here to Get Search Results !

सुरेश पाटील नरवाडे यांच्या मागणीला आमदार वानखेडे यांचा जोरदार पाठिंबा; महागाव नगरपंचायत इमारतीसाठी १० कोटींचा प्रस्ताव शासनदरबारी




प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे  दवंडी वार्तापत्र 

महागांव :महागांव नगरपंचायतीच्या वाढत्या प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र व सुसज्ज कार्यालयीन इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून या मागणीला आता राजकीय स्तरावरही बळ मिळाले आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी नगर उपाध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे यांनी सातत्याने लावून धरलेल्या मागणीची दखल घेत उमरखेड–महागाव मतदारसंघाचे आमदार इंजि. किसनराव वानखेडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून १० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

महागाव नगरपंचायत स्थापन होऊन जवळपास दहा वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी आजही स्वतंत्र प्रशासकीय इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे. सध्याची कार्यालयीन व्यवस्था अपुऱ्या जागेत चालत असल्यामुळे नागरिकांना विविध नागरी सेवा मिळविताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाढती लोकसंख्या, शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि प्रशासनावर वाढलेला ताण या पार्श्वभूमीवर सध्याची व्यवस्था अपुरी पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.

या परिस्थितीत सुरेश पाटील नरवाडे यांनी नगरपंचायतीसाठी स्वतंत्र इमारतीची गरज अधोरेखित करत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या मागणीला आमदार वानखेडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा मुद्दा थेट शासनदरबारी मांडला आहे. नियोजन विभागामार्फत विशेष तरतूद करून १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

पत्रामध्ये महागाव शहराचे व्यापारी, सामाजिक आणि प्रशासकीय महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, तसेच प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आधुनिक सुविधा असलेली प्रशासकीय इमारत उभारल्यास शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

सध्याच्या घडीला नगरपंचायतीसमोर असलेले कामकाजाचे वाढते स्वरूप आणि मर्यादित पायाभूत सुविधा यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे प्रस्तावित इमारत ही केवळ एक बांधकाम नसून शहराच्या भविष्यातील नियोजनाचा पाया ठरणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

दरम्यान, या मागणीवर शासन सकारात्मक भूमिका घेईल का, आणि महागाव नगरपंचायतीच्या स्वप्नातील प्रशासकीय इमारतीला कधी प्रत्यक्षात मूर्त रूप मिळेल, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकणाऱ्या या प्रस्तावामुळे महागांवच्या नागरी व्यवस्थेला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments