Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधान; मराठा सेवा संघाकडून जाहीर निषेध



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी  विवेक नरवाडे महागांव प्रतिनिधी

प्रसिद्ध कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीबाबत केलेल्या एका विधानाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. या विधानात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केल्याचा आरोप करत मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष बाळू पाटील नरवाडे यांनी बागेश्वर बाबांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

नेमके प्रकरण काय?

एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबांनी शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की: "छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते. त्यांना जेव्हा वाटले की आता आपण थकलोय, तेव्हा ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट स्वामींच्या चरणी ठेवला आणि सांगितले की, 'आता मला पुढे लढायचे नाही, मला विश्राम हवा आहे, तुम्हीच हेराज्य सांभाळा'."

त्यांच्या कथनानुसार, यावर समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना शिष्य म्हणून विचारले की शिष्याचे कर्तव्य काय? तेव्हा महाराजांनी 'गुरुची आज्ञा पाळणे' असे उत्तर दिले. त्यानंतर स्वामींनी तो मुकुट पुन्हा महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि 'हे राज्य माझे आहे पण तू ते माझ्या आज्ञेने चालवायचे' असे सांगितले.

आक्षेपाचा मुद्दा: "शिवराय कधीच थकले नाहीत"

बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यावर शिवप्रेमी आणि इतिहासकारांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मराठा सेवा संघाचे बाळू पाटील नरवाडे यांनी म्हटले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज कधीच युद्ध करून थकले नव्हते किंवा त्यांनी कधीच हतबल होऊन राज्य सोडण्याची भाषा केली नव्हती."

इतिहासाचे चुकीचे संदर्भ देऊन महाराजांच्या शौर्याचे आणि त्यांच्या ध्येयवादी नेतृत्वाचे अवमूल्यन केले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. "महाराज स्वयंभू होते आणि त्यांचे स्वराज्य हे रयतेचे राज्य होते, अशा पद्धतीचे विधाने करून चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला जात आहेअसे नरवाडे यांनी नमूद केले.

जाहीर निषेध

या घटनेनंतर सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला जात असून, बागेश्वर बाबांनी अशा प्रकारची विधाने टाळावीत, असा इशारा मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात आला आहे. बाळू पाटील नरवाडे यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध केला असून, ऐतिहासिक महापुरुषांबद्दल बोलताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे.


Post a Comment

0 Comments