Type Here to Get Search Results !

कन्या सासरी गेली अन् पाळीव कुत्र्याने धरला उपवास

 



 नांदूरमध्यमेश्वर येथील भावनिक घटना; ताईच्या विरहात कुत्र्याने सोडले अन्न - पाणी

प्रतिनिधी / गणेश ठाकरे लासलगाव 

   नांदूरमध्यमेश्वर येथे माणूस आणि प्राणी यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचं भावनिक उदाहरण समोर आलं आहे. कु. सिद्धी शिंदे हिच्या विवाहानंतर ती सासरी गेल्यानंतर तिच्या लाडक्या पाळीव कुत्र्याने तब्बल दोन दिवस अन्न-पाण्याला स्पर्श केला नाही. तो सतत तिचीच वाट पाहत होता. सिद्धी माहेरी परतताच कुत्र्याने आनंदाने तिच्या अंगाखांद्यावर उड्या मारत प्रेम व्यक्त केले. विशेष म्हणजे, तिच्या हातून पोळी खाऊनच त्याने अन्न ग्रहण केले. या घटनेची परिसरात भावनिक चर्चाही रंगली असून, माणूस आणि प्राणी यांच्यातील निरागस प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

      नांदूरमध्यमेश्वर येथील गोपाळराव शिंदे यांची कन्या सिद्धी हिचा विवाह सावरगाव (ता. येवला) येथील शांताराम काकड यांचे चिरंजीव भगवान यांच्यासोबत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लग्नघरातील आनंद, गडबड आणि पाहुण्यांची लगबग सुरू असतानाच घरातील पाळीव कुत्र्याचं वर्तन मात्र अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारं ठरलं. सिद्धी हळदीच्या कार्यक्रमासाठी लॉन्सवर गेल्यानंतर त्या कुत्र्याने टाकलेली भाकरी खाल्ली नाही. 

    लग्नाच्या दिवशीही घरच्यांनी त्याच्यासाठी भाकरी व पाणी ठेवून सर्वजण विवाह सोहळ्यासाठी गेले; मात्र दिवसभर त्याने ना अन्नाला स्पर्श केला ना पाण्याचा थेंब प्यायला. सायंकाळी सिद्धी सासरी रवाना झाल्यानंतर कुटुंबीय घरी परतले, तरीही तो शांतपणे तिचीच वाट पाहत बसलेला होता. विशेष म्हणजे, विवाहानंतर तिसऱ्या दिवशी सिद्धी परत माहेरी आली, तेव्हा त्या कुत्र्याचा आनंद अक्षरशः ओसंडून वाहताना दिसला. तिला पाहताच तो तिच्या अंगाखांद्यावर उड्या मारू लागला. तिच्याभोवती फिरत शेपूट हलवत प्रेम व्यक्त करू लागला. अखेर सिद्धीने स्वतःच्या हाताने त्याला पोळी खाऊ घातल्यानंतरच त्याने अन्न ग्रहण केले. 'प्राणी बोलत नाहीत, पण त्यांचं प्रेम नि:शब्द असतं,' याची प्रचिती देणारी ही घटना पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. माणुसकी, माया आणि जिव्हाळा यांचं सुंदर दर्शन घडवणारा हा प्रसंग परिसरात भावनिक चर्चेचा विषय ठरत आहे.


Post a Comment

0 Comments