Type Here to Get Search Results !

जखिनवाडी येथे आधार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



डाक विभागाच्या “आधार आपल्या दारी” उपक्रमाला जनतेचा भरघोस प्रतिसाद

कराड प्रतिनिधी :

भारत सरकारच्या भारतीय डाक विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “आधार आपल्या दारी” या उपक्रमाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांना त्यांच्या गावातच आधार सेवा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न डाक विभागामार्फत करण्यात येत आहे.

कराड पूर्व उपविभागात डाक अधीक्षिका स्वाती दळवी व उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मागील शनिवारी कराड येथे विशेष आधार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर याच अभियानांतर्गत यंदाच्या शनिवारी सुपने, जखिनवाडी व कोयना वसाहत येथे देखील आधार शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

जखिनवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.नवीन आधार नोंदणी,आधार अपडेट,मोबाईल क्रमांक लिंक,पत्ता बदल,बायोमेट्रिक अपडेट आदी विविध सेवा नागरिकांना सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात आल्या.विशेषतःज्येष्ठ नागरिक,महिला व विद्यार्थ्यांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

जखिनवाडी येथील शिबिराचे उद्घाटन सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक विश्वास निकम,यांचे हस्ते व पोस्टमास्तर जयवंत शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी ग्रामस्थ,विविध संस्थांचे पदाधिकारी,डाक कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आधार ऑपरेटर म्हणून स्वप्निल कुंभार यांनी अत्यंत तत्परतेने काम पाहिले. नागरिकांच्या शंकांचे निरसन करत जलदगतीने सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक डाक कर्मचारी, ग्रामस्थ व स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात न जाता गावपातळीवरच आधार सुविधा उपलब्ध होत असल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी डाक विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले की,आपल्या नजीकच्या डाकघराशी संपर्क साधून आधार सेवांसह बचत योजना,विमा योजना,इंडिया पोस्ट पेमेंट बँक,स्पीड पोस्ट,पार्सल सेवा अशा विविध सेवांचा लाभ घ्यावा.

ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या सेवा त्यांच्या दारी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भारतीय डाक विभागाचा हा उपक्रम निश्चितच लोकाभिमुख ठरत असून भविष्यात अशा अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांनी दिली.

Tags

Post a Comment

0 Comments