दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
सन २००९ पासून अध्यात्म, समाजसेवा आणि धार्मिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. अनिताताई रावसाहेब ठाकरे यांनी निस्वार्थ सेवाभाव, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. श्री सद्गुरु सिद्धपूरी महाराज मठसंस्थांच्या अध्यक्षा म्हणून त्या विविध आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देत आहेत.
हरिपाठ, बालसंस्कार वर्गांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये संस्कारांची जोपासना करताना त्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करतात. महिलांमध्ये नामस्मरण, पारायण, सप्ताह आयोजन आणि सेवाभावाची प्रेरणा निर्माण करून त्यांना अध्यात्माची वाट दाखवण्याचे कार्यही त्या सातत्याने करीत आहेत.
गावकऱ्यांसाठी सत्संग, प्रबोधन, ध्यानधारणा, व्यसनमुक्ती आणि नीतिमूल्यांची शिकवण देत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. स्वतः वर्षभर वेदेश्वरी ग्रंथाचे नियमित पठण करून त्याचा अर्थ भाविकांना समजावून सांगण्याचे कार्यही त्या श्रद्धेने पार पाडतात.
माहूर गडावर दर्शनासाठी येणाऱ्या विविध दिंड्यांच्या भाविकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करून त्या अतिथी देवो भवः या संस्कृतीचा सुंदर वारसा जपत आहेत.
मठाच्या माध्यमातून वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान व आरोग्य शिबिरे, सामाजिक ऐक्य आणि जनजागृतीचे कार्यक्रम राबवून त्या समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहेत. गोसेवा, तसेच आषाढ, श्रावण, गोकुळाष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आणि दत्त जयंती यांसारख्या धार्मिक उत्सवांचे भक्तिभावाने आयोजन करून समाजात अध्यात्माची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य त्या करीत आहेत.
समाजसेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून समाजहितासाठी समर्पितपणे कार्य करणाऱ्या सौ. अनिताताई रावसाहेब ठाकरे यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments