Type Here to Get Search Results !

मानव कल्याणार्थ खेळला जाणारा नैतिक जुगार–पेरणी



आपल्या कानाला ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल की हा नैतिक जुगार आहे तरी काय?आणि हो ! हे तेवढंच सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे कारण माझा शेतकरी राजा आपल्या वैयक्तिक तथा कुटुंबाच्या गरजा बाजूला ठेवून पोटाला चिमटा देऊन गावठी सावकार, सोसायट्या तथा बँकाकडून हजारो रुपयाचं पेरणीसाठी कर्ज घेतो.बी-बियाणे शेतीत ओततो व त्याचं पुढे काय होईल हे माहित नाहीतरी पेरणी करतो. म्हणूनच"पेरणी हा मानव कल्याणार्थ खेळला जाणारा नैतिक जुगार आहे,"असे म्हणणे अतिशयोक्ती वाटले तरी त्यामागे मोठे वास्तव दडलेले आहे. शेतकरी बी जमिनीत टाकताना त्याला खात्री नसते की पाऊस वेळेवर पडेल,पीक रोगराईपासून वाचेल किंवा बाजारात योग्य भाव मिळेल.तरीही तो आशा,धैर्य आणि परिश्रम यांच्या बळावर पेरणी करतो.

ढग दाटून आल्यावर शेतकरी राजा पहिल्या पावसाच्या आगमनप्रसंगी आनंदोस्तव साजरा करतात.काही शेतकरी वेड्या आशेपायी धूळपेरणीसुद्धा करतो.पेरणी करुन पावसाच्या आशेने आभाळकडे बघतो.यदा कदाचित पावसाने दांडी मारली तर,दुबार पेरणी करावी लागते.त्यात हजारो रुपयांचा चुराडा होतो.कारण त्याला हवामानाचा अंदाज येत नाही.हल्ली पावसाचे प्रमाणही काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती घडतांना दिसून येते.अश्या या वातावरणातील असमतोलाचा फटका मात्र शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो. कारण दुष्काळजन्य परिस्थितीत पिके सुकून जातात.पाण्याअभावी अक्षरश: जळून जातात तर ढगफूटी सारख्या अतिपावसामूळे नदी नाले तुडुंब भरून वाहतात व त्याचबरोबर शेतीतील काळी माती व पिकेही वाहून जातात. बघा ना ! अजून पिक हातात आलेले नसते तरी या संकटाचा सामना माझा शेतकरी राजा करतो. कष्टाचे,मेहनतीचे पैसे खर्च करुन नैतिककार्याच्या माध्यमातून हे उद्याच्या भविष्यासाठी पेरणी करतो.सांगा ! आहे की नाही? हा मानवकल्याणार्थ जगाच्या पोशिंद्याकडून खेळला जाणारा नैतिक जुगार..! 

भविष्यातील स्वप्न उराशी बाळगून पेरणी नावाचा हा जुगारतो शेतकरी दादा स्वतःच्या स्वार्थासाठी खेळत नसतो.स्वतःच्या कुटुंबाच्या गरजांबरोबरच संपूर्ण समाजाच्या अन्नसुरक्षेसाठी हा तो धोका स्वीकारतो.त्याच्या पेरलेल्या प्रत्येक दाण्यात लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाची आशा दडलेली असते.म्हणूनच हा जुगार मानवाच्या कल्याणासाठी खेळला जातो.एवढं वाघाचं काळीज फक्त त्या जगाच्या पोशिंद्याचच असतं.मित्रांनो !खिशातून चुकून पाच किंवा दहाचा शिक्का सार्वजनिक ठिकाणी पडला तर,व्यक्ती इकडे-तिकडे खाली-वर आजूबाजूला शोधतो आणि कितीतरी वेळ शोधूनही सापडला नाहीतर,मन अस्वस्थ करुन मनाला हूरहूर लावून बसतो.मात्र माझा हा शेतकरी राजा केवळ भल्या मोठ्या आभाळाच्या छताखाली उघड्या जमिनीनीवर लाखो रुपयांचं बी-बियाणं ओतून मोकळा होतो. कुठल्याही संरक्षणाविना...! उद्या त्याचं काय होइल हे निश्चित माहित नसतांही..!

     निसर्गाने साथ दिली तर शेत सोन्यासारखे बहरते.साथ सोडली तर कष्ट,वेळ आणि पैसा वाया जाण्याची भीती असते. आज हवामानाच्या असमतोलामूळे ही अनिश्चितता अधिक वाढली आहे.कधी अतिवृष्टी,कधी दुष्काळ,कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट यामुळे शेतकऱ्याचे नियोजन विस्कळीत होते.म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनो,काळ बदलत चालला आहे.आधुनिक शेतीचा अवलंब करा.हवामानाचा अंदाज,माती परीक्षण,सुधारित बियाणे,ठिबक सिंचन,पीकविमा आणि तंत्रज्ञानाचा वापर करा.शेतीविषयक ज्ञान देणारी पुस्तके, साप्ताहिक, मासिकांचे वाचन करा.कृषि प्रदर्शने, सेमिनार,चर्चासत्र यांना भेटी द्या.त्यामुळे शेतीविषयक ज्ञानप्राप्ती होऊन आधुनिक शेती केल्यास संभाव्य संकटे टळतील व संरक्षण मिळेल.असे हे उपाय या पेरणीच्या "जुगारातील" धोका कमी करतील.

      अश्याप्रकारे माझा शेतकरी राजा पावसाळ्यात नव्या आशेने पेरणी करतो."शेतकरी जुगार नशिबाशी खेळत नाही,तो भविष्याशी करार करतो.त्याच्या हातातील बीज हे फक्त धान्याचे नसते,तर संपूर्ण मानवजातीच्या उद्याच्या जीवनाचे बीज असते." म्हणूनच पेरणी ही नुसती शेतीची सुरुवात नसून,ते मानवकल्याणासाठी केलेले आशेचे ,विश्वासाचे आणि त्यागाचे पवित्र कार्य आहे.जय किसान...!

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ ता जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments