दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव शहरातील प्रभाग क्रमांक ११ आणि प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सार्वजनिक हातपंप बंद असल्यामुळे नागरिकांना गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही प्रभागांतील हे बंद हातपंप अनेक महिन्यांपासून दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा संबंधित विभागाकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे महिला व रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांची तातडीने दुरुस्तीची मागणी
पाण्याच्या या तीव्र समस्येमुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे महापालिका व नगरपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बंद असलेले सर्व हातपंप लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment
0 Comments