Type Here to Get Search Results !

महागांव तालुक्यातील मुडाणा गावात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; कारवाईसाठी ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा




दवंडी वार्तापत्र महागांव  प्रतिनिधी विवेक  नरवाडे 

महागांव (यवतमाळ): महागांव तालुक्यातील मुडाणा गावात बोगस बंगाली डॉक्टरांकडून अवैध वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कोणत्याही वैध वैद्यकीय पदवी किंवा शासनाच्या अधिकृत नोंदणीशिवाय हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ आणि तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासन कारवाई करण्यास अपयशी ठरल्यास २१ जुलै २०२६ पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

आकाश अशोक पानपट्टे आणि अर्जुन पंडित जाधव या स्थानिक नागरिकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी, महागाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुडाणा परिसरात अनेक बोगस बंगाली डॉक्टर कोणतीही अधिकृत पात्रता नसताना वैद्यकीय सेवा देत आहेत. या बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे आणि औषधांच्या गैरवापरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासगंभीर धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या:

१. महागाव तालुक्यातील सर्व संशयित बोगस डॉक्टरांची तातडीने चौकशी करण्यात यावी.

२. वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि नोंदणीची कडक पडताळणी करावी.

३. दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम व इतर संबंधित कायद्यांनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

४. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी.

५. चौकशी अहवाल सार्वजनिक करून पारदर्शकता ठेवावी.

या गंभीर विषयाची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली असून, आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments