Type Here to Get Search Results !

यवतमाळ - वाशीम लोकसभा अध्यक्षपदी चिंचोलकर यांची नियुक्ती




प्रवीण कुंटे उमरखेड प्रतिनिधि 

आगामी निवडणुकांच्या आणि संघटन बांधणीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ कमिटीने यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात मोठा फेरबदल केला असून रिपब्लिकन युवा सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना रिपब्लिकन सेनेच्या यवतमाळ - वाशीम लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली.

विदर्भ कमिटीच्या वतीने पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार, प्रदेश अध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे, युवा प्रदेशअध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ कार्यालय नागपूर येथे विदर्भ अध्यक्ष प्रफुल शेंडे यांच्या हस्ते, प्रभारी विदर्भ अध्यक्ष योगेंद्र चवरे, विदर्भ सचिव अमोल कुमार, राजेश मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनिल पाटील चिंचोलकर यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची यवतमाळ - वाशीम लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 

सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीने 'संघटन सृजन मोहीम' राबवली जात आहे. या मोहिमेचा मुख्य हेतू मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि पक्षाची ताकद वाढविणे हा आहे. त्याकरिता पक्ष्याशी एकनिष्ठ व सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना नेतृत्व देऊन आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी पक्षाचे सक्षम उमेदवार शोधणे आणि पक्षाची मतपेढी मजबूत करणे आहे. 

सुनिल पाटिल चिंचोलकर यांनी आपल्या निवडी बद्दल वरिष्ठ नेते, प्रदेश तथा विदर्भ कमिटी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विषयी आभार व्यक्त केले. पुढे बोलतांना यवतमाळ- वाशीम जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका संदर्भात कटिबद्ध योजना आखली जाणार असून, पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी 'रिपब्लिकन सेना संवाद दौरा' आयोजित केला जाणार असून त्याचबरोबर जास्तीत जास्त तरुणांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदस्य नोंदणी मोहीम राबविली जाणार असल्याचे कळते. स्थानिक नागरी समस्या, कामगारांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे हे पक्षाच्या अजेंड्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भ कमिटीने घेतलेल्या या निर्णयामुळे यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत व अभिनंदन केले जात आहे. यावेळी गौतम नवसागरे, शुद्धोधन दिवेकर, सतीश खिल्लारे, संदीप राऊत इत्यादी यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments