दवंडी वार्तापत्र महागांव तालुका प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव:महाराष्ट्र पशुधन संपन्न राज्य म्हणून सर्वपरिचित असून राज्यात डांगी, देवणी, खिल्लार, लाल कंधारी, गवळाऊ, कोंकण कपिला, कठाणी अशा वैशिष्ट्यपूर्ण गोधन जाती आढळतात. देशी पशुधन संवर्धंनाच्या दिशेने केंद्र शासनाचे “शून्य अवर्णीत पशुधन” अभियानंतर्गत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात राष्ट्रीय प्रकल्प कार्यान्वित आहे. या प्रकल्पांतर्गत अभ्यासण्यात आलेल्या पश्चिम विदर्भातील उमरडा गोवंशाला नुकतेच अधिकृत जात म्हणून राजमान्यता मिळाली आहे. पशुधन नोंदणी समिति, राष्ट्रीय पशु व अनुवांशिकी संसाधन ब्युरो, करनाल यांच्या राष्ट्रीय बैठकीत महाराष्ट्रातील उमरडा गोवंशाची अधिकृत जात म्हणून नोंद घेतली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात अधिकृत ८ गायींच्या जाती असून राज्याची पशुधन जैवविविधता अधिक संपन्न असल्याचे सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्रातील दुर्लक्षित आणि अवर्णित पशुधनाच्या नोंदीकरणाबाबत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर केंद्रीय प्रकल्पाच्या माध्यमातून संशोधनकार्यात आग्रही भूमिका बजावत असल्याचे मत विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी उमरडा गोवंशाचे प्रमुख संशोधक डॉ शैलेंद्र कुरळकर यांचेसह सह संशोधक डॉ प्रवीण बनकर, डॉ प्राजक्ता कुरळकर,डॉ ए के मिश्रा, डॉ एस पी दीक्षित, श्री सजल कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन केले.
डॉ कुरळकर यांनी आभार व्यक्त करताना राष्ट्रीय पशु व अनुवांशिकी संसाधन ब्युरो, करनाल चे निर्देशक डॉ एन एच मोहन, विद्यापीठाचे अधिष्ठाता व शिक्षण संचालक डॉ शिरीष उपाध्ये, संशोधन संचालक डॉ नितीन कुरकुरे आणि तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता डॉ चैतन्य पावशे आदींचे मार्गदर्शन यांसह महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे नमूद केले. पांढऱ्या रंगाचे, मजबूत माध्यम अंगकाठीचे, शेतीकामासाठी उपयुक्त व घरगुती स्तरावर दुधासाठी बहुगुणी आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेत तग धरण्याची विलक्षण क्षमता असलेले उमरडा गोवंश विदर्भातील संपन्न पशुधनाची साक्ष देणारे असल्याचे मत डॉ कुरळकर यांनी व्यक्त केले आहे.
उमरडा गोवंश पैदासक्षेत्र प्रामुख्याने पश्चिम विदर्भातील यवतमाळ व लगतच्या अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांच्या लगतच्या भागात विस्तारलेले असून स्थानिक बंजारा व इतर पशुपालकांकडून पारंपरिक पद्धतीने संगोपन केल्या जात आहे. ब्रिटिशकालीन दस्तावेजात नमूद असल्याप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील “उंबर्डा बाजार” या पशुधन बाजारपेठेवरून “उमरडा” हे नाव स्थानिक गोवंशाला प्राप्त झालेले असून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यावरून या गोवंशाला “दिग्रस” किंवा बंजारा समाजावरून “बंजारा गोवंश” म्हणून देखील संबोधले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा, आर्णी तालुके, वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर, कारंजा (लाड) हे तालुके आणि अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांडेश्वर या तालुक्यात मोठ्या संख्येने उमरडा गोवंश आढळून येते.त्यामुळे उमरडा बैलजोडीला शेतीकाम वाहतुकीसाठी बाजारपेठेत विशेष मागणी आहे.

Post a Comment
0 Comments