Type Here to Get Search Results !

समृद्धी लगतचे 45किलोमीटर शेतरस्ते संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातुन पुर्ण.



गजानन वाघमारे डोणगांव प्रतिनिधी:-

समृद्धी महामार्गामुळे दळणवळणाची नागरिकांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली असली तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचा मोठा प्रश्न होता. माजी आमदार संजय रायमुलकर यांनी गतकाळात केलेल्या अथक प्रयत्नांमुळे ४५ किलोमीटर लांबीचे शेत रस्ते आता पूर्ण झाले असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतांना दिसत आहे.

             हजारो कोटी रुपये खर्चून बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. महामार्गात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले. परंतु अतिशय महत्त्वाच्या असलेल्या समृद्धीचे काम होत असतांना दुसरीकडे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे जुने शेत रस्ते नेस्तनाबूत झाल्याने विविध कामांसाठी शेतात जाण्याकरिता शेतकऱ्यांना रस्तेच उरले नव्हते. त्यामुळे या प्रश्नासाठी शेतकरी संघर्ष समितीने विविध आंदोलने केली. आमदार संजय रायमुलकर यांनी विधानसभेत या प्रश्नावर अनेकदा आवाज उठवला. मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला. स्वतः रायमुलकर यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणही केले होते.

            समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेतरस्ते न उरल्यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी, पेरणी, पीक काढणे आदी कामांसाठी शेतात जाण्यास रस्तेच उरले नव्हते. इतर शेतकऱ्यांच्या शेतातून दुसरे शेतकरी गेले तर त्यातून अडचणी निर्माण होऊन वाद झाले. समृद्धी रस्त्याखाली अंडरपासचा मोठा प्रश्न होता. तो काही अंशी निकाली निघाला.

                   तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार प्रतापराव जाधव व संजय रायमुलकर यांनी क्षेत्ररस्त्यांचा प्रश्न लावून धरला होता. संबंधित खात्याचे मंत्री दादा भुसे यांचा समृद्धी महामार्ग पाहणी दौरा होता .त्या त्यादरम्यान रायमुलकर यांनी शेत रस्त्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना प्रत्यक्ष स्थिती दाखविली व शेतकऱ्यांसाठी ही बाब किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगितले. त्यानंतर दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून शेतरस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव मागविले व प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून आधी पारडा ते शहापूर ,अंधरुड पर्यंत दोन्ही बाजूचे २९ किलोमीटर शेतरस्ते पूर्ण झाले होते व नंतर अंध्रुड, बेलगाव, डोणगाव,शेलगाव देशमुख परिसरातील १६ किलोमीटर अंतराचे शेतरस्ते आता पूर्णत्वास गेले आहेत. क्षेत्र रस्त्यांचे खडीकरण करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. सतत चार वर्षे संजय रायमुलकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे व प्रसंगी संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे शेतरस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शेतकरी त्यांना धन्यवाद देत आहेत.


Post a Comment

0 Comments