Type Here to Get Search Results !

अतनूर परिसरातील गावात "ॲग्रीस्टक " योजनेअंतर्गत विशेष मोहीम

 



 *बालासाहेब शिंदे अतनूर प्रतिनिधी* 

महाराष्ट्र शासन जमाबंदी आयुक्तालय आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्तपणे १५ डिसेंबर २०२४ पासून संपूर्ण राज्यभरात " ॲग्रीस्टक " गाव नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.ॲग्रीस्टक गाव नोंदणी अभियानाचा फायदा हा महाराष्ट्रातील बळीराजा म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे. या अभियानाद्वारे बळीराजाची समग्र ओळख म्हणजेच फार्मर रजिस्ट्री तयार करून प्रत्येक शेतकऱ्याला एक फार्मर आयडी दिली जाणार आहे. त्याद्वारे शेतकरी हा अनेक सरकारी योजना व शेतीशी निगडित असलेल्या इतर सेवांचा सहज लाभ घेऊ शकतो. जळकोट तालुक्यातील अतनूर डोंगराळ व दुर्गम, अतिदुर्गम भागातील परिसरातील २८ गाव, वाडी, तांडा, वस्तीवर याची सुरुवात दि.१६ डिसेंबर रोजी मौजे चिंचोली येथे ॲग्रीस्टक योजने अंतर्गत विशेष मोहीमेला सुरुवात झाली.

महाराष्ट्र शासनामार्फत सुरु असलेल्या ॲग्रीस्टक योजनेमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या ७/१२ ला आधारकार्डशी जोडून फार्मर आयडी देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी वेळेत व यशस्वीरित्या पूर्ण व्हावी या साठी विशेष मोहीम घेऊन शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तथा अध्यक्ष तालुका ॲग्रीस्टक समिती तथा उपविभागीय अधिकारी उदगीर व जळकोटचे तहसिलदार राजेश लांडगे सचिव तालुका ॲग्रीस्टक समिती तथा तहसीलदार जळकोट यांच्या मार्गदर्शनातून विशेष मोहिमेचे आयोजन मौजे चिंचोली ता. जळकोट येथे करण्यात आले. या वेळी चिंचोलीचे ग्राम महसूल अधिकारी अतिक शेख व कृषी सहाय्यक संदीप पाटील, कुणबी कृषी बचत गटाचे अध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, आरोग्यदूत, कृषीदुत व कृषीमित्र कार्यकर्ते बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी शेतकऱ्यांचे ७/१२ हॆ आधारकार्डशी जोडण्याचे काम केले. या वेळेस मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. सदर योजनेचा शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. त्यामध्ये कृषी हवामान सल्ला, हवामानाची आकडेवारी, मृदा आरोग्याची माहिती, कीड व रोग प्रादुर्भाव चे अंदाज, पिकनुसार विहित किसान क्रेडिट कर्ज, हंगामी पिकांचा माहिती संच, भूसंदर्भीकृत भूभाग असणारे गाव, नकाशे याची माहिती संच, शेतकऱ्याचा व त्याच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच, व इतर कृषी विभागाची सलग्न असलेल्या अनेक शासकीय योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना मिळण्यास मदत होईल. तसेच शेतकरी माहिती संचामुळे एक वेळ नोंदणी केल्यावर विविध कल्याणकारी योजनेचा लाभ आणि अनुदान वितरणात सुलभता व शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले, विविध संस्थेकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नवीन्यपूर्ण कार्यक्रमाचा विस्तार व प्रचारात सफलता प्राप्त होईल. पिकासाठी कर्ज मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फो स्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करून दिले जातील. कृषी क्षेत्रात ॲग्रीस्टकच्या वापराने शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या विविध योजनेचा जलद व परिणामकारक रीत्या लाभ घेण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत मिळेल.

ॲग्रीस्टक गाव नोंदणी अभियानात शेतकऱ्याला आपल्या नावाची नोंद करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे खालील प्रमाणे ठरवून देण्यात आलेली आहे. शेतजमीन सर्वे नंबर, खाते पुस्तिका, सातबारा, आठ अ, आधार नोंदणीकृत फोन नंबर, व आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी गावाचे तलाठी अतीक शेख, अथवा संदीप पाटील कृषी सहाय्यकाशी व कृषीमित्र कार्यकर्ते तथा कुणबी कृषी बचतगट अध्यक्ष बी.जी.शिदे अतनूरकर, कृषीमित्र सहाय्यक कार्यकर्ते बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments