आपली भारतीय संस्कृती सर्व प्राणीमात्रांवरच नाही तर,वृक्ष- वेलींवरही प्रेम करायला शिकवते.वटपौर्णिमेला वडाची पूजा,पोळ्याला बैलाची पूजा तर, कोकिळाव्रताला कोकिळेची पूजा केली जाते.अर्थात पशु,पक्षी,वृक्ष-वेलींना परमेश्वराची रूपे मानून त्यांना पूजलं जातं.आपल्या या भारतीय संस्कृतीत नागाची सुद्धा पूजा केली जाते.भगवान शिव शंकर गळ्यात नाग धारण करतात. भगवान विष्णु शेषनागाच्या शय्येवर पहुडलेले दिसतात.गणपतीच्या कमरेला बंध म्हणून नाग आहे.पौराणिक कथेनुसार नाग ही कश्यप व कद्रू यांची पुत्र आहेत.पुराणाप्रमाणे अष्ट नाग प्रसिद्ध आहे.त्यापैकी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक,कर्कोटक, शंख,कुलिक (कालिया).असे हे अष्ट नाग होते.मात्र हे प्रजेला देऊन त्रास देऊ लागले होते म्हणून, ब्रह्माजीने त्यांना श्राप दिला की, तुमच्या सावत्र भावाकडून अर्थात गरुडा करून मारले जाणार व जनमेजयाचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल. नागाची मानव कृतज्ञपोटी म्हणा किंवा भीतीपोटी पूजा करतो. द्वापारयुगामध्ये यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा महाविषारी सर्प होता. त्याच्या फुत्काराने सर्व काही भस्मसात होत असे. तो त्याच्या विषाने पाणी विषारी करून प्राणिमात्रांनाही मारायचा म्हणून, भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाच्या मस्तकावर पाय ठेवून त्याच्यावर नृत्य केले. तो भगवान श्रीकृष्णांना शरण आला.अशा प्रकारे श्रीकृष्णाने लोकांचे रक्षण केले. तो दिवस होता श्रावणातील शुक्ल पंचमी अर्थात नागपंचमी. म्हणून तेव्हापासून लोक नागाची पूजा करू लागले. दूध, लाह्या अर्पण करतात व त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाचीही पूजा करतात.
गावाकडे अजूनही पारंपारिक पद्धतीने नागपंचमी साजरी केल्या जाते. नागपंचमी हा सण श्रावण महिना शुक्ल पंचमीला अर्थात श्रावण ऋतुत असल्यामुळे सभोवतालचे वातावरण अगदी प्रसन्न असते.रिमझिम पावसांच्या सरींमुळे वातावरण आल्हाददायक असते. क्षणात पाऊस तर क्षणात ऊन पडते. या दिवशी गावाकडे महिला व पुरुष मंडळी सकाळी लवकर उठून, मंदिरात जाऊन पूजा करतात.महादेवांना नागदेवता प्रिय असल्यामुळे महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. गावाकडे अजूनही घरासमोर गाईच्या शेणाने सडा-सारवण करून रांगोळ्या काढतात.ठिपक्यांच्या रांगोळ्यातून नागाची रांगोळी काढतात. पूर्वी घरांच्या भिंती कुडाच्याहोत्या.कुडाला मातीचा लेप लावून पांढऱ्या मातीने पोतारले जायचे. काही घरे मातीच्या भिंतीचे होते.अजूनही आहेत.त्या भिंतीतर साधारण अडीच बाय अडीच फूट पांढऱ्या किंवा काळ्या मातीने पोतारल्या जायच्या.ओलेपणातच हाताच्या तीन बोटाने चौरसाकृती बॉर्डर करून खालील बाजूस मोकळी जागा सोडून एक दरवाज्यासारखे चित्र काढायचे. त्या चौरसाकृती आतील भागात हाताच्या तीन बोटाने सापाच्या आकाराचे वरून खाली नागबोडी वळण घेऊन नाग काढले जायचे. वरील जाडसर व खालील बाजू निमुळती अशा शेपटीचा आकार द्यायचे. वरील बाजूला त्रिकोणी आकार करून, दोन रेषा मारायचे व त्रिकोणाच्या आतील बाजूमध्ये एक गोल बोट फिरवल्या जायचे.तो जणू सापाचा डोळा होता.असे पांच सापाचे चित्र काढले जायचे.दोन्ही प्रतिमात्मक सापाच्या मध्ये एक बोट नागमोडी वळणा सारखं फिरवून छोट्या नागाचे चित्र काढल्या जायचे. अर्थात ते नागाचं पिल्लू असं प्रतिकात्मक चित्र काढले जायचे.
मातीच्या भिंतीवरील हे नागाचे काढलेले चित्र अजून सुशोभित करण्यासाठी एका वाटीत पांढरी गणगोळी, एका वाटीत गुलाल, बुक्का,हळद,कुंकू भिजून ठेवायचे. जणू हे नैसर्गिक रंगच...! माय माचिसच्या पेटीतील काडीला कापूस गुंडाळायची.म्हणजे जणू हा रंगारीचा ब्रशच..! भिजून ठेवलेल्या वाटीतील गुलाल, बुक्का, हळदी, कुंकू, पांढरी गणगोळी काडी बुडवून भिंतीवरील काढलेल्या नागाचे चित्रांना रंगवायची. या वेगवेगळ्या रंगांनी नागांचे चित्र अजूनच छान शोभून दिसायचे. एखाद्या वारली पेंटिंग सारखे...!अगदी साध्या सोप्या पद्धतीने सर्व घरगुती वस्तूंचा वापर करून, मातीच्या भिंतीवरील हे नागदेवतेचे नागपंचमी निमित्त काढलेले चित्र अजूनही डोळ्यासमोरून जात नाही.खरंच साधेपणात खरं सौंदर्य असतं.अन लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यात खेड्याचा अनमोल वाटा आहे.त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गावाकडील नागदेवतेचं नागपंचमीनिमित्त मातीच्या भिंतीवर काढलेलं चित्र...!
नागदेवतेसमोर दूध,लाह्या,मुरमुरे याचा नैवेद्य अर्पण करतात. स्वयंपाकामध्ये नियमित आहारापेक्षा वेगळे म्हणून, मकेचे धपाटे किंवा बेसन पिठाचे धिरडे बनवतात. माझी माय सुद्धा चुलीवर छान मक्याचे धपाटे व बेसन पिठाचे धिरडे बनवायची. सोबत भाजी एवजी तोंडी लावायला पातळ शेंगदाण्याची किंवा तिळाची हिरवी चटणी बनवायची.छान सुंदर असे हे अस्सल गावठी पदार्थ खाऊन मन तृप्त व्हायचं. चुलीवरील छान धिरडे, धपाटे व चटणीचा स्वादिष्ट, रुचकर अन खमंग वास हा हल्लीच्या पिझ्झा,बर्गर,सँडविच पेक्षा हजारो पटीने झक्कास होता व अजूनही आहे. अन हो! तेही अगदी ताजे व स्वच्छ पदार्थापासून बनवलेले, आरोग्यास पोषक असे हे पदार्थ माय नागदेवतेसमोर नैवेद्य म्हणून ठेवायची.
शेतात वारूळ दिसले कि,महिला भगिनी पूजा करायच्या. शाळकरी मुली छान आंब्याच्या, निंब्याच्या झाडाला झोके बांधायच्या.छान-छान गाणे म्हणून आळी पाळीने झोका खेळायच्या.गावागावानुसार काही प्रथा वेगवेगळ्या असू शकतात. माझ्या गावात मात्र याहून थोडंसं वेगळे असं की, या दिवशी पत्ते खेळतात.रस्त्या रस्त्यावर,गल्ली गल्लोगल्ली पत्त्याचे डाव मांडतात. अहो एवढेच काय एरव्ही बाप-मुलगा,भाऊ -भाऊयांचा आदर ठेवणारेही आजूबाजूच्या डावा मध्ये खेळतांना दिसतात. अगदी बिनधास्त...!या दिवशी पोलीस यंत्रणेचाही धाक नसतो. का कुणास ठाऊक?कदाचित कित्येक वर्षापासूनची ही परंपरा असेल म्हणून कि काय?ही सूट असावी.मात्र हेही तेवढंच सत्य कि, हा एकच दिवस खेळून, दुसऱ्या दिवशी जो तो ज्याच्या-त्याच्या कामावर रुजू होतो. म्हणजेच फक्त एक दिवसच पत्त्यांचा खेळ असतो.मात्र कधीकधी या पत्त्यांच्या खेळापायी, गोरगरीब लोक पैशाच्या लोभापायी,हरल्यामुळे बरच काही गमावून बसतात.घरातील वस्तूही विकतात.अन तेही अगदी कमी किंमतीत..!अन अश्या वेळेस कमी किमतीत वस्तू घेणारे ही तयार असतातच. असो! तर हा नागपंचमीचा सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो.एवढेच काय परदेशातही जसे की ग्रीक,रोमन संस्कृतीमध्ये ही नागदेवतेची पूजा,नागनृत्य व नागा विषयी कलाकृती रेखाटलेल्या दिसून येतात.पुरातन कोरीव कामा सुंदर कला दिसून येतात. नागपंचमी हा सण साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी राहू शकते. पूजा नैवेद्य भौगोलिक परिस्थितीनुसार उपलब्ध साधन व शेतातील उत्पन्नानुसार वेगवेगळा असू शकतो मात्र सर्वत्र नागदेवतेविषयी मनात आस्था दिसून येते.
अशाप्रकारे आपली ही भारतीय संस्कृती पशु,पक्षी, प्राणीमात्रांवर,निसर्गावर प्रेम करायला शिकवते.त्यांना आपण ईशतुल्य समजून त्यांची पूजा करतो.त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशीही नागदेवतेची,त्यांच्या निवासाची अर्थात वारूळची पूजा करतो.सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा....!
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments