Type Here to Get Search Results !

जि प मराठी शाळेतील गणवेशाच्या आठवणी



शाळेतील विद्यार्थ्यांना एकसमान दिसण्यासाठी आणि त्यांच्यात समानता दर्शवण्यासाठी गणवेश वापरला जातो. गणवेश म्हणजे ढोबळमनाने सांगायचं तर एकाच रंगाचेशर्ट व एकाच रंगाची पॅन्ट असा पोशाख. त्याचप्रमाणे मुलींसाठी त्याच रंगाचा शर्ट आणि स्कर्ट अथवा फ्रॉक असा हा पोशाख म्हणजेच मुला मुलींसाठी शालेय गणवेश. शाळेत दाखल होण्या अगोदर दिवाळी- दसऱ्याला घेतलेले कापडे तेही टेलरकाकाकडून शिवून घेतलेले असायचे.साधारण हाफ शर्ट आणि हाल्फ पॅन्ट मुलांसाठी आणि मुलींना पाच सहा वर्षांच्या वयापर्यंत झगा शिवायचे.हे रंगीत कपड्याचे असायचे.आम्हा पोरांपेक्षा पोरींचे थोडे वेगळे डिझाईन मध्ये असायचे.खांद्यावर कलाकुसरीतून फुग्याच्या बाह्या आणि मिऱ्या पाडलेले गोलाकार झगे त्यामुळे गोल-गोल फिरलं कि छान छान गोलाकार वर्तुळासारखं शोभून दिसायचं. अन पोरांचं काय तर हाल्फ चड्डी अन हाल्फ शर्ट बस झालं..!सहा वर्ष वयाचं झालो.अन माय-बाबांनी वर्ग पहिलीत प्रवेश घेऊन शाळेत शिकायला धाडलं.मग नशिबी आला शाळेचा शिस्तीचा गणवेश...!

 संपूर्ण महाराष्ट्रात जि प मराठी शाळेत पूर्वी मुलांसाठी पांढरा शर्ट अन खाकीची हाल्फ पँट आणि मुलींसाठी पांढरा शर्ट अन निळ्या रंगाचे फ्रॉक किंवा स्कर्ट असा गणवेश होता. सद्या महाराष्ट्र राज्य शासन नियमानुसार गणवेशाचा रंग बदलेला दिसून येतोय.आकाशी रंगाचे शर्ट अन गडद रंगाची पॅन्ट व मुलींचेही त्याच रंगाचे शर्ट व फ्रॉक वगैरे.कदाचित जिल्ह्यानुसार वेगवेगळा आहे.बदलत्या काळानुसार बदल हवाच. शाळा म्हणजे विद्येचे मंदिर व शिस्तीचे ठिकाण.सर्वाना दररोज गणवेशातच जायचे.आठवड्याभरातील सहा दिवसांपैकी सोमवार ते बुधवार गणवेश व गुरुवारी एक दिवस रंगीत आणले तर हरकत नव्हते परत शुक्रवार व शनिवार गणवेशातच शाळेत हजेरी लावावी लागे. सोमवार ते बुधवार एकच गणवेश तोही पांढरा त्यामुळे एका दिवसातच खराब होऊन जायचा. अन त्यात आमचं गावाकडील पोरांचं मधल्या सुट्टीतील खेळणं म्हणजे एकदम रांगडं...! लपंडाव,लगोरी,पकडा-पकडी, लांब उड्या,घोडीवरून उड्या,धबाकुट्टी त्यासह मौदानातील माती यामुळे सकाळी घातलेला शर्ट संध्याकाळपर्यंत धुळीने माखलेलाच म्हणून समजा. अहो! एवढंच काय,संध्याकाळपर्यंत शर्टाचा एखादा बटन तुटलेलं राहायचं.त्याचबरोबर हाल्फ पॅन्टचं तर विचारूच नका, कुठेतरी मातीवर बस.वाळूवर खेळ.नारळाच्या झाडाची एखादी तुटलेली फांदीभेटली त्यांच्या जाड भागावर बसून दोन-तीन मित्र खेचायचे.एखाद्या चोपड्या घरंगळणाऱ्या सिमेंटच्या पडक्या भिंतीवर घसरगुंडी सारखं खेळायचो त्यामुळे मागील बाजूने हाफ पँट पूर्ण वितळायच्या म्हणून साहजिकच त्या मागील बाजूने ढोपरावर फाटायच्या. मग त्याला ठिगळ लावावे लागायचे..!

 हाफ पँट च्या मागील बाजूच्या ठिगळाची गंमत अशी असायची की, जर त्याच रंगाचा खाकीचा कपडा भेटला तर ठीक नाहीतर, थोड्या गडद अथवा फिक्‍या रंगाचा कपड्याने ठिगळ लावले तर, ते महामंडळाच्या बसच्या पुढील हेडलाईट प्रमाणे मागील बाजूस उमटून पडायचे.शर्टइन केली तर अवघड व्हायचं. म्हणून शर्ट इन न करता ठिगळ लावलेली मागील बाजू झाकून टाकण्याचा प्रयत्न करायचो. परंतु त्यातही गुरुजींनी बघितले तर शर्ट इन नाही केली म्हणून मार बसायचा. खूपच पंचायत व्हायची. एका बाजूला गुरुजींचा मार आणि एका बाजूला गरीबीमुळं लज्जा रक्षणासाठी लावलेलं ठिगळ..!अशी ही अवस्था मात्र त्यातही आनंद मानून जगायचो.खाकि पॅन्टचं बटन खराब झालं तर,पँट खाली सरकू नये म्हणून, कमरेचा करदोडा त्यावर चढवायचो.त्याला एखादी तुरखाटीची काडी लावून पीळ मारून एका बाजूला लावून ठेवायचो.त्यामुळे कंबरेला पँटची पकड यायची.हाच कमरेचा करदोडा नाड्याच्या पॅन्टसारखं काम करायचा. अशा परिस्थितीतही मात्र कमरेची चड्डी खाली सरकू दिली नाही.लाज कायम राखली.हल्लीच्या फॅशन च्या नावाखाली गरिबीचं प्रदर्शन केलं नाही.ना कधी लाज वाटू दिली. पॅन्टचे दोन्ही बाजूचे खिशे फेपरमीठ, संत्री-मिठाच्या गोळ्याने चिकट-चिकट व्हायचे. जेवणातील भाजी तिखट झाली तर, घरात लाकडी फळीवरील साखरेच्या डब्यातील साखर चोरून खिशात टाकायचो.थोडी-थोडी खायचो.त्यावेळेस कसले पेढे? आणि कसला केक?गोड साखर हीच आमची केक,मिठाई कॅडबरी अन चॉकलेट...! खिशात हात घालून उलटा करूनसाखरेचा एक-एक दाना खायचो.अशा या खाकी हाल्फ पँटने शालेय जीवनात अभ्यासाबरोबर बरंच काही शिकवून गेली.

 पांढरा शर्ट जास्त खराब होऊ नये,म्हणून धुतल्यावर माय स्वच्छ पाण्यात दोन-चार थेंब निळ टाकायची.त्यात शर्ट बुडवून वाळू घालायची.त्यामुळे ते थोडंसं खुलून दिसायचं.मात्र एक ते दीड महिन्यात शर्टाला लावलेले मूळ बटन एक एक करून तुटून जायचे.मग घरातील एखाद्या जुन्या शर्टचे बटन काढून त्या चार-पाच बटनांपैकी लावत-लावत वर्षाअखेरपर्यंत ते बहुरंगांचं होऊन जायचं. सगळ्यात वरचं बटन लाल,मधील पिवळे,हिरवे व खालचे निळे काळे असा रंगबेरंगी रंगांच्या बटनाचं शर्ट व्हायचं. खेळतांना ओढताड मध्ये शर्टचा खिशा पूर्ण फाटलेला असायचा.किंवा पेनच्या कांडीतील शाईचा लाल किंवा निळा मोठा टिपका पडलेला असायचा.तो डिटेर्जेंट पावडर,साबण लावून धुव..!असे हट्टी डाग निघेच ना.मग काय करणार? तसाच वापरायचचो वर्षभर..!पोरीचं मात्र आमच्यापेक्षा खेळणं थोडं वेगळं होतं. मुळातच नाजूकपणा अन शांतस्वरूपाचे त्यांचे खेळ असल्यामुळे त्यांचे गणवेश थोडेफार बरे टिकून राहायचे. आमच्यासारखं त्यांचं रांगडं खेळणं नसायचं. बसल्याजागी चिंचोके,बारीक दगड वेचून एक-दोनम्हणून वर फेकून झेलणं, गारगोट्या,वह्यांवर पेनने रांगोळ्या काढणे,चित-पट,आपडी थापडी, साप-सिडी असे हे बसल्या जागचे खेळ असायचे. फार झालं तर आणि कधी कधी पकडा पकडी,दगडाच्या चकणा, त्यामुळे त्यांचे गणवेश आमच्यासारखे मातीने माखलेले अन रांगड्या खेळामुळे एवढे फाटलेले नसायचे.

 आमच्या या शाळेच्या गणवेशाचे दिवस पालटायचे.ते मात्र काही ठराविक दिवशीच..,!आणि ते म्हणजे राष्ट्रीय सण 26 जानेवारी अन 15 ऑगस्ट या रोजी.या दिवसाअगोदरच्या दिवशी फाटलेले शर्ट,पॅन्ट व्यवस्थित शिवून घ्यायचो.माय स्वच्छ धुऊन द्यायची.अहो! एवढेच काय,वर्षभर त्या गणवेशाला इस्त्री माहीत नव्हती त्यावर इस्त्री सुद्धा मारायचो.इस्तरीची ही गंमत अशी होती कि,धोबीदादांकडे इस्त्रीला टाकले तर,तो दोन-तीन रुपये घ्यायचा.आणि त्याच्याकडील गर्दीमुळे तोही धड करत नव्हता. फक्त घडी मारून वरून इस्त्री फिरवायचा.आम्ही लहान. त्यामुळे तो उल्लू बनवायचा.माझे काका शिवणकाम करायचे त्यामुळे त्यांच्याकडे लाकडी मुठाची लोखंडी इस्त्री होती.मग आम्ही भावंडे त्यात कोळसे टाकून इस्त्री करायचो. नाहीतर पितळीच्या लोट्या मध्ये गरम-गरम चुलीतला विस्तव टाकायचो.त्यावर खोक्याच्या पृष्ठाने हवा मारायचो.विस्तव लाल भडक व्हायचा. तस-तसा तो लोटा गरम व्हायचा. बुडापासून तर वरपर्यंत गरम व्हायचा म्हणून हातात सांडस(पकड) धरून त्याचं बूड शर्ट व पॅन्ट वर फिरवायचो.धोबीदादा सारख्या छान घड्या मारून इस्त्री करायचचो.पांढरा शर्ट अन खाकी पॅन्ट खुलून दिसायची. मग काय 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ला सकाळी-सकाळी लवकर उठून मस्त अंघोळ केली कि, माय डोक्याला खोबरेल तेल लावून द्यायची. मस्त फ्रेश होऊन शर्ट इन करून मटकत मटकत शाळेत जायचो.शाळेत लावलेल्या देशभक्तीपर गीताने मन प्रसन्न व्हायचे.

 असा हा आमचा जिल्हा परिषद मराठी शाळेचा गणवेश पांढरे शर्ट, खाकी पॅन्ट आणि मुलींचा निळा फ्रॉक अन स्कर्ट कायम स्मरणात राहील.कारण हा नुसता एक पेहराव नव्हता तर, आम्हाला शिस्तची शिकवणूक देण्याचा एक माध्यम होतं. गरीब- श्रीमंतीतील दरी मिटून,आम्ही सर्व आहोत यातून एकजुटीची भावना निर्माण होत होती.सर्व जाती धर्मातील मुलं शाळेत सोबत शिकायला असल्यामुळे सर्वांचा एक सारखाच गणवेश.त्यामुळे सामाजिक विषमतेची भावना कमी होऊन,"हम सब एक है" ही भावना रुजण्यास मदत झाली.जीवाभावांचे "वर्गमित्र" भेटले त्यांच्यासोबत प्रेमाची,विश्वासाची,मैत्रीची घट्ट नाळ जुळली.तीआयुष्यभरासाठी...!

श्री विनोद शेनफड जाधव 
मासरूळ जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments