Type Here to Get Search Results !

स्मार्ट सिटीचा बुरखा फाटला !

 



मासुंदा तलावाच्या कोट्यवधींच्या सुशोभीकरणाची दयनीय अवस्था; काँग्रेसचा हल्लाबोल

प्रतिनिधि अरविंद कोठारी 

ठाणे ,कोट्यवधी रुपयांचा खर्च, स्मार्ट सिटीच्या नावाखाली झगमगता प्रकल्प... पण प्रत्यक्षात? मासुंदा तलावाच्या काठावर उघडपणे दिसतेय निष्काळजीपणा, फसव्या दर्जाचे काम आणि ठाणे महानगर पालिका  प्रशासनाच एक अवाक्षर काढत नाही. येथील लावलेल्या रेलिंग, काचेचा पदपथ, एल इ डी लाईट व्यवस्थांची दुरावस्था  झाली असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस पक्षाने केला आहे.

ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावावर काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आलं. स्टील रेलिंग, एलईडी लाइटिंग, काचेचे पदपथ, बैठक व्यवस्था अशा 'हाय-फाय' सोयीचा गाजावाजा झाला. पण आता, या सर्व सुविधांची झालीय धुळधाण.

तुटलेली रेलिंग, फुटलेल्या काचा, उखडलेले पदपथ, मोडलेली बाकं  ही सगळी दृश्यं आज नागरिकांच्या सुरक्षिततेवर गदा आणत आहेत. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान डोळ्यांत झणझणीत खुपणारी वस्तुस्थिती उघडकीस आली.

काँग्रेसने स्वतःहून फुटलेल्या काचांजवळ सुरक्षा पट्ट्या लावत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला. पिंगळेंनी तत्काळ नगर अभियंत्यांशी संपर्क साधत या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या सर्वच कामांची चौकशी व्हावी, अशी मागणीही काँग्रेसने यावेळी लावून धरली आहे. या पाहणी वेळी शिष्टमंडळात सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, शहर उपाध्यक्ष बाबू यादव ,ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील,ब्लॉक कार्याध्यक्ष नूर्शिद शेख,युवक काँग्रेस चे लोकेश घोलप,अमोल गांगुर्डे, विलास महाडेश्वर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

भ्रष्टाचाराचा आरोप करत ‘स्मार्ट सिटी’ की ‘स्कॅम सिटी’? त्यावेळी भाजप नेत्यांनी दिल्लीपर्यंत धाव घेत सुशोभीकरणातील भ्रष्टाचाराचे बिंग फोडले होते. पण चौकशी कुठे गेली? निकाल काय लागला? हे नागरिकांना अजूनही माहित नाही. इतक्या लवकर जर ही दुरवस्था झाली असेल, तर हा थेट दर्जाहीन कामांचा, भ्रष्टाचाराचा पुरावा नाही का ? -राहुल पिंगळे (काँग्रेस प्रवक्ता)


Post a Comment

0 Comments