सकाळी दहा वाजता शाळेत प्रार्थनेची घंटा झाली.शाळेच्या प्रांगणात खेळणारे,फिरणारे आम्ही घंटेचा आवाज ऐकून प्रार्थनेच्या ठिकाणी वर्गानुसार शिस्तीत उभे राहिलो.उंचीनुसार व वर्गानुसार रांगा बनवल्या.कारण गुरुजी हातात छडी अन शिट्टी घेऊन उभे होते मग गुरुजींनी सांगितल्यानुसार आपापल्या ठिकाणी उंचीनुसार उभे राहिलो.कालांतराने याचं ज्ञान सर्वांना हळू हळू येऊ लागलं.पोरां-पोरींना त्यांची उंची समजायला लागली.त्या हिशोबाने सर्वजण उभे सावधान-विश्राम या ऑर्डर प्रमाणे हातपायाची हालचाल करून शिस्तीत उभे राहिलो राष्ट्रगीत,प्रार्थना आणि निती मूल्याचा पाठ झाला,सर्वजण रांगेत वर्गाकडे निघाले.वर्गात दोन बाय दोनच्या दगडी फरशीवर जाड्या-भरड्या कापडाच्या लांबट पट्ट्यावर बसलो. वर्गात बसणंही साधारण उंचीनुसारच ठरलेलं होतं,कारण फळ्यावरचं मागच्याला दिसायला हवं.पण हा नियम वर्गात फारसा वर्गात लागू पडत नव्हता कारण,हुशार पोरं पुढे बसायचे.गुरुजीच्या धाकामुळे खोडकर,खट्याळ पाठीमागे बसायचचे.तसा मी तेवढाही हुशार नाही अन एकदम "ढ"ही नाही. म्हणून साधारण तिसऱ्या-चौथ्या नंबर वर बसलो.मुलींचीही बैठक व्यवस्था त्याचप्रमाणे असायची.
वर्गात बसल्यावर आपापले दप्तर साधारण बैठीकीच्या डाव्या किंवा उजव्या बाजू ठेवायचो.कितीही शिस्तीत बसले तरी,वर्ग पहिला म्हणजे नुसती चावचाव आणि पक्षासारखी किलबिलाट असायचीच.कारण शाळेत दाखल होण्याअगोदर रांगड्या खेळाच्या वातावरणातून,निश्चित नियमाच्या चौकटीच्या खोलीत बसणं म्हणजे अवघड....! पण माय बाबांनं शाळेत धाडलं अन शिकून मोठं व्हायचं म्हणजे सहन करावं लागणारच.विद्यार्थी संख्या भरपूर असल्यामुळे गुरुजींनी वर्ग पाहिलीचे अ,ब,क अश्या तीन तुकड्या केल्या.गल्लीत सोबत-सोबत खेळणारे मित्र दुसऱ्या तुकडीत गेल्यामुळे थोडं कंटाळवाणं वाटायचं.पण काय करणार? गुरुजींनी बनवलेल्या वर्गांच्या तुकडीनुसार बसावच लागायचं.पाणी पिण्याची,माध्यान्ह भोजनाची अन मूत्र-विसर्जनाची सुट्टी झाली की,थोड्या वेळ का होईना पण आम्ही एकमेकांना भेटायचो.अन घंटा झाली कि अपा पल्या वर्गात येऊन बसायचो.
प्रार्थनेनंतर रांगेत वर्गात गेलो.बसल्यावर शांत बसणं कसं शक्य?याला चिमटा घे.त्याला बुक्का मार. त्याला धक्का दे.ही मही जागा ही तुही जागा असे जागेवरून भांडण.तेवढ्यात हजेरी,डस्टर अन खडू घेऊन गुरुजी वर्गात आले.गुरुजी वर्गात आल्यावर उभं राहावं लागतं.हे आम्हाला कसे ठाउक? म्हणून आम्ही सर्वजण बसलेलोच राहिलो.गुरुजी वर्गात आल्यावर उभं रहावे.हे माहित नव्हतं.पुढे गुरुजींनीच शिकवलं.गुरुजीं वर्गात आले.सर्वजण अगदी शांत बसले.बेशिस्त बसलेले आम्हां पोरां कडे गुरुजीचे लक्ष गेले.गुरुजींनी रांगेत सरळ बसा.हे वर्गातील रांगेत सरळ बसणं.प्रार्थणेसाठी रांगेत उभे राहणं.हेच जीवनातील सर्वात पहिली शिस्तीचे धडे बनले.आम्हाला शिस्तीत बसवून गुरुजी खुर्चीवर बसले.हजेरिचं पान उकललं.एक नंबर पासून सर्वांचं नाव वाचू लागले. नाव वाचलं की,ताडकन उभे राहायचं आणि सॅल्यूट केल्यासारखं उजवा हात कपाळापर्यंत न्यायचा. मोठ्या आवाजात" हजर सर" म्हणायचे. म्हणजे या दिवशी शाळेत हजर आहे. याचा जणू हा पुरावाच..! असं आम्हा सर्व मुलींचे व मुलांचे नाव वाचून सगळ्यांनी "हजर सर- हजर सर" म्हणून आपा पली हजेरी दर्शवली.शाळेत नाव आणि जि प च्या सरकारी शाळेतील हजेरीत नाव पडल्याचं शिक्कामोर्तब झालं.
गुरुजींनी जो वर्गात हजर आहे त्याच्या समोरील तारखेच्या रकान्यात इंग्रजीमध्ये "पी" म्हणजे प्रेझेंट लिहिलं आणि जो गैरहजर असेल त्याच्या समोर इंग्रजीतील"ए"लिहिलं म्हणजे अबसेन्ट याचा अर्थ गैरहजर असं लिहलं.गुरुजी खुर्चीवरून उठले.फळ्यावरील अगोदरचं लिखाण डस्टरनी पूर्ण मिटवलं. डाव्या बाजूला वर्ग पहिला.त्याखाली तुकडी क असं लिहिलं.तर उजव्या बाजूला पटावर, त्याखाली हजर व त्याच्याखाली गैरहजर असं लिहिलं.पटावर म्हणजे हजेरीप्रमाणे वर्गात एकूण किती विद्यार्थी तो आकडा.फारसा आठवत नाही परंतु साधारण ४० विद्यार्थ्यांची तुकडी होती.त्यापैकी पटावर 37 ते 38 हे हजर असायचे. व एक किंवा दोन असायचे.असे हजेरीवरून गुरुजींनी आकडे भरले.हाच काळा फळा आणि पांढरा खडू आमचे जीवन बदलायला, शिक्षित करायला सहाय्यभूत ठरला.त्याच्या जोडीला आमची काळी पाटी आणि पांढरी लेखन ही आमच्या जीवनाचं सार्थक करायला तथा अज्ञानपणाच्या अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी प्रकाशवाट ठरली.
शाळेत दाखल झाल्यावर पहिल्या दिवशी गुरुजींनी जीवनात शिस्तीचे धडे दिले.ते आयुष्यभर जीवनाचं सोनं करायला उपयोगी ठरलं.पहिल्या दिवशी पुस्तकातील ज्ञानाऐवजी जीवनातील शिस्त व नीतिमल्याचे ज्ञान दिले.वडीलधाऱ्यांचा आदर,सन्मान कसा करावा हे सांगितले.हसत खेळत शिक्षण पद्धती तून आम्हाला समजावं म्हणून गुरुजींनी प्रात्याक्षिक करून दाखवलं.त्यासाठी गुरुजी वर्गाबाहेर गेले. परत वर्गात आले.गुरुजींनी वर्गात प्रवेश केल्यावर,सगळ्यांनी उभे राहायचे.त्यानंतर प्रहारानुसार सगळ्यांनी एक सुरात अर्थात सकाळी शुभ सकाळ,शुभ दुपार व शेवटची सुट्टी म्हणजे साधारणतः चारच्या नंतर शुभ संध्याकाळ किंवा शुभ दुपारही म्हटले तरी हरकत नाही.असं दोन चार वेळेस करून दाखवलं. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्वजण उभे राहिले.एका सुरातील शुभ सकाळ सर,शुभ दुपार सर,असं हे शिस्तीच,आदराचं नीतिमूल्याचं ज्ञान व तो आम्हां चिमुकल्यांचा एक सुरातील आवाज अजूनही कानात गुणगुणत राहतो.आताही शाळेच्या रस्त्यावरून जातांना कितीतरी वर्षाअगोदरचा आठवणीतील आवाज एकूण क्षणभर थांबावंसं वाटतं व परत ऐकावासा वाटतो.
असे हे गुरुजींनी हजेरीतील वाचलेलं नाव व म्हटलेलं"हजर सर" हो सर,यस सर हे आयुष्यात खूप काही शिकून जातं.समाजात वावरताना,आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा मान कसा राखायचा.मोठे बहीण -भाऊ,गावातील गल्लीतील काका,मामा यांचा आदर कसा ठेवावा याचे ज्ञान मिळते.एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर तिथे कसं वागायचं.स्वतः नोकरीला लागल्यावर आपले वरिष्ठ अधिकारी तथा सहकारी मित्र यांच्यासोबत कसं वागावं.अश्या या अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून गुरुजीकडून बहुमूल्य असं हे शिस्तीचं व संस्कारशील ज्ञान व मार्गदर्शन पुस्तकातील ज्ञानाबरोबर मिळते व त्यातून"माणूस" म्हणून घडायला मदत होते व जीवनविकास होतो.
समस्त गुरुजनांना प्रणाम...!
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments