Type Here to Get Search Results !

शेतकरी देवो भव



भारतीय संस्कृती महान आहे.आपल्या या संस्कृतीमध्ये अगदी छोट्या-छोट्या विषयावर मार्गदर्शक तत्वे व नीती मूल्यांची शिकवण आढळून येते. सर्व पशुपक्षी प्राणी मात्रांसह निसर्गावरही प्रेम करा अशी शिकवणूक आपणास ग्रंथातून मिळते. मुळातच आपला भारत देश संस्कारशील विचारांचा देश म्हणून गणला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये घरी येणाऱ्या पाहुण्यांना "अतिथी देवो भव" अर्थात पाऊणे हे देवासारखे मानले जातात. त्यांची सर्व काळजी घेतल्या जाते. आदर सन्मान केल्या जातो.जर एक-दोन दिवस राहून राहणारा पाहुणा जर आपल्या संस्कृतीमध्ये देवा समान मानून त्याची सेवा,आदर केल्या जात असेल तर,काळ्या आईची सेवा करणारा,गुरे ढोंरांचं पालन पोषण करणारा,निसर्गा काळजी घेणारा व समस्त जगाला पोसणारा "जगाचा पोशिंदा" हा आपल्यासाठी देवतुल्य नाही काय?आपल्या भारताची कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे. पूर्वी "उत्तम शेती,मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी"अशी म्हण होती मात्र हल्ली याच्या विपरीत चित्र बघायला मिळत आहे. उत्तम नोकरी मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी अशी गत झालीआहे.शेतकऱ्यांचे जीवन कष्टाचे हालाखीचे असतांनाही कुठल्याही प्रकारची दुःखाची व्यथा न मांडता सर्व हालाखीचे व दुःखमय जीवन स्वतः सहन करून सर्व जगाला पोसण्यासाठी धडपडत असतो.

 शेतकरी राजांचे जीवन म्हणजे चोवीस तासी घड्याळातील सेकंद काट्याप्रमाणे असते.सतत शेतात राबणं असतं.त्याच्या कामाची निश्चित अशी वेळ नसते.शेतीनिगडित काम व पूरक व्यवसायात अहोरात्र तो गुंतलेलाअसतो.सूर्योदयापूर्वी वावरात जाऊन, गुरांच्या गोठ्याची झाडलोट करतो.शेणपाणी मलमूत्र साफ करून त्यांना चारा पाणी खायाला घालतो.गाई-म्हशींचे दूध काढतो, दूध काढल्यानंतर ते गावात आणतो, डेअरीवर घेऊन जातो, हे त्याचे नित्याचे दैनंदिन कार्य असते.यात एकही दिवसाचा खाडा राहत नाही.शासकीय कर्मचारी व इतर उद्योग व्यावसायिक अथवा व्यापारी लोकांच्या दुकानासारखी त्याला सुट्टी नसते.त्याला आळस व चालढकल मुळीच चालत नाही, कारण त्याने नुसता एक दिवस जरी सुट्टीचा विचार केला तर,काय होईल?माहितीये. गोठ्यात घाण मलमूत्र पसरेल.मुक्या प्राण्यांना चारी-पाणी मिळणार नाही.ते भुकेने व्याकुळ होतील.जर गुरांचं दूध काढले नाही तर, समस्त गावातील लोकांना व हॉटेलमधील चहाप्रेमींना "कडक मिठी अद्रकवाली चाय" कशी मिळणार?"एकदाच प्याल तर पुन्हा याल" या सारख्या अमृततुल्य चहाचा आस्वाद घेता येईल काय? दुग्धनिर्मित पदार्थ जसे की,ताक, दही मिळेल काय?खिचडी सोबतची खमंग कढी कशी अनुभवणार?मठ्ठा कसा पिणार? अन हो! दह्यापासून बनवणारे खानावळतील व घरगुतीखाद्य पदार्थाच्या वस्तू, दहिवडा कसा खाणार. दही घुसळून बनवलेलं ताक व ताकातील लोणी व लोण्यांपासून गावरान तुपाचा अन बदामाचा शिरा कसा खाणार? श्रीखंड -पुरीचा आनंद कसा उपभोगणार. पनीर मसाला,पनीर तडका या हॉटेलातील खमंग मेनूचा आस्वाद कसा घेणार? बघितलं ना! माझ्या शेतकरी राजांच्या पशुपालनातून,त्यांच्या दुधापासून काय काय मिळते तर...! हे फक्त एक छोटंसं उदाहरण आहे.तसं बघितलं तर पावलो-पावली शेतकरी राजाने शेतीतून उत्पादित केलेल्या वस्तूवरच आपण जगतोय व आपल्या गरजा भागवतोय.

 मानवाच्या मूलभूत गरजेपैकी सर्वप्रथम गरज म्हणजे अन्न.ही अन्नाची गरज भागवणारा माझा शेतकरी राजा आहे.ती मानव प्राण्यांची मूलभूत गरज आहे. अन्नावाचून आपण जगू शकत नाही. एक वेळेस ह्या तर भौतिक वस्तू नसल्या तरी हरकत नाही, परंतु, जिवंत राहण्यासाठी अन्न हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अहो! तुमच्याकडे लाखो-करोडो रुपये असू द्या.हिरे,माणिक, मोती असू द्या.ते शिजवून तुम्ही खाऊ शकणार नाही अन पोटाची आग विजवू शकणार नाही.या संगणकीय व विज्ञान युगात कित्येक नवनवीन शोध लागत आहे.एवढेच काय ए आय सारख्या शोधातून तर ऐतिहासिक वास्तूत जिवंतपणा भरल्यासारखा दिसतोय.असे कितीही शोध संशोधन लागू द्या.त्याच्या भरवश्या तुम्ही जगाला गवसनी घालू शकता.आकाशात उडू शकता.मात्र अन्न निर्मिती प्रकिया ही शेतीतूनच होईल.ती तंत्रज्ञानाने कधीच उत्पादित होऊ शकणार नाही.अन्नाशिवाय ते शरीर चालू शकणार नाही,कारण पोटातच काही नसेल, ही शक्ती येईल कुठून?शरीरात शक्ती निर्माण करण्यासाठी अन्नाची तीव्र आवश्यकता असते आणि ते भागवण्याचे कार्य केवळ आणि केवळ शेतकरी राजाकडूनच शक्य आहे. तो शक्तीचे प्रतीक आहे.अर्थात शेतकरी राजा हा सर्व मानव प्राण्यांच्या अन्नाची गरजा भागवणारा व शक्ती प्रदान करणारा परमेश्वराचे दुसरे रूप आहे.

 आपल्या कितीतरी दैनंदिन गरजा या शेतकरी राजांच्या उत्पादित शेतमालापासूनच भागत असतात.जवळजवळ शतप्रतिशतच म्हणा ना! फक्त त्या प्रोसेसिंग होऊन आपल्यापर्यंत येतात.अर्थात,जसे नाटक किंवा पडद्यावरील नटांचे आपण वाहवाह, कौतुक करतो.परंतु पडद्यामागील कलाकारांचे काय?लेखक, नाटककार, वेशभूषा, रंगभूषा स्टेज उभारणारे यांचेही योगदान असते.मात्र ते दिसत नाही.नेमकं तोच हा माझा शेतकरी राजा.ब्रेड,पाव,पोळी चपाती दिसेल पण, गहू पिकवणारा माझा शेतकरी राजा दिसतो कुठे?भव्य कार्यक्रमात उंची वस्त्र घालून मिरवतील पण ज्या कपाशीपासून उच्च दर्जाचे वस्त्र बनवले जाते. तो कापूस पिकवणारा शेतकरी दिसतो कुठे?माझा शेतकरी राजाने पिकवलेली कपाशी,त्याची मशागत,पिकांची काळजी,वेचणी या प्रक्रियेतून व्यापाऱ्याच्या माध्यमातून कारखान्यांपर्यंत पोहचवणे.याच कपाशीतील रुच्या माध्यमातून तयार झालेले छान डिझाईन मधील कपडे आपणास घालावयास आवडतात.या सर्व प्रक्रियेमध्ये शेतकरी राजाची हा मूळ भूमिका आहे.हवा असते पण दिसत नाही.पण आपल्याला जिवंत ठेवते. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचेही नेमकं तसंच.ब्रम्ह देवप्रमाणे स्थान आहे.म्हणून शेतकरी राजा हा सुद्धा देवासामान आहे.

 सध्याच्या या आकर्षणाच्या दुनियेत शेती व्यवसाय हा तरुणांना निम्न दर्जाचा वाटतोय. शेतात काम करण्याची हल्ली कितीतरी तरुण-तरुणींना लाज वाटते.शोकांतिका अशी की,शेतातला माल खायला सर्वजण तयार असतात.मात्र शेतकरी जीवन त्यांना नको असतं.हल्ली तर शेतात राबणाऱ्या मुलांना विवाह संदर्भात अडचणी यायला लागल्या आहेत. स्वतः शेतात राजा,मालक म्हणून वावरणाऱ्या शेतकरी मुलापेक्षा शहरी भागातील एखाद्या दुकान,रेस्टॉरंट,बंगल्यासमोर तासंतास उभे राहून "सेक्युरिटी गार्ड" किंवा दुसऱ्याची चाकरी करणाऱ्या मुलांसोबत मुलीचे वडील मुलीचा विवाह लावून देताहेत पण,स्वाभिमानाने शेतात राबणाऱ्या,जगाला पोसणाऱ्या कष्टकरी शेतकरी मुलाला विवाहासाठी मुली देत नाही.का म्हणून? तो काळ्या मातीत राबतो. वावरातल्या चिखल मातीनं माखतो. उन्हा तान्हात काम करतो म्हणून की,केवळ सुटा- बुटात राहत नाही म्हणून....! कशाला हवेत ते सूट बूट की,जे घालून लाचाऱ्यासारखं जगावं लागतं.कशाला हवा फाफटपसारा.कशाला हवं ते बेगडी जीवन...!हे तेवढंच खरं की,"माणूस शोभून दिसतो तो घामाच्या धारांनी, मोत्याच्या धारांनी नव्हे" या पांढऱ्या शुभ्र कपड्यातील रंगा पेक्षा मातीत मळलेल्या कपड्याचा इमानदारीचा सुगंध चहुंकडे दरवळत असतो. याचाच खरा अभिमान असायला हवा.शेतकऱ्याला सोपवलेलं अत्यंत पवित्र कार्य म्हणजे,सगळ्यांच्या मुखी घास घालणं. हे कदाचित सर्व कार्यावरून अधिक श्रेष्ठ आहे.ते परमेश्वराचं कार्य आहे.परमेश्वराच्या कार्याइतकंच महान आहे.जसे हवा,पाणी हे निसर्गनिर्मित अर्थात ईशनिर्मित आहे. त्याचप्रमाणे शेतकरी राजाच्या मेहनतीतून,कष्टातून फळाला येणारं हे महान व अत्यंत पवित्र असं जगाला पोसण्याचं कार्य,जरी पांढरपेशा समाजाच्या किंवा शिक्षित पिढीच्या दृष्टीने दुय्यम दर्जाचे वाटत असले तरी,मात्र याच शेतकऱ्याने रात्रंदिवस काबाड कष्ट करून पिकवलेल्या अन्नधान्यांच्या भरवशावर भारतीय अर्थव्यवस्थाची चाके चालतात.कारण भारताची अर्थव्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे.

 भारतीय समाजव्यवस्थेतील शेतकरी राजा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.शिकून सवरून सुशिक्षित समाज मोठे मोठे उद्योगधंदे उभारतो.कारखाने चालवतो. तो केवळ माझ्या शेतकरी राजांच्या पिकवलेल्या शेतमालाच्या भरवश्यावर...! त्या शेतीव्यवसायावरच पशुधन व मानवीजनजीवन अवलंबून असते. जर शेती उद्योगाची किंवा अन्न उत्पादनाची चाके थांबली तर, समस्त जनजीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.कारण अन्नधान्य,भाजीपाला, दुग्ध-व्यवसाय व दुग्धजन्य पदार्थ,कपडा- लत्ता व इतर खाद्यपदार्थ जसे की,तेल-साखर यासारख्या अति जीवनावश्यक बाबींचा निर्माता,उत्पादनकर्ता हा केवळ शेतकरीच आहे. हे उत्पन्न सिमेंटच्या जंगलात, मोठ्या कंपन्यात, फॅक्टरी,शॉपिंग मॉल येथे काही केल्या उत्पादीत होणार नाही. म्हणून माझ्या ईशतुल्य शेतकरी राजाला "जगाचा-पोशिंदा", म्हटलं आहे. या जगाच्या पोशिंद्याच्या अंगी कोणते गुण दिसून तर त्याची माया आभाळासारखी आहे.मनात व्यापक दृष्टिकोन आहे आणि विशाल हृदय आहे. हे गुण ज्याच्या अंगी असतो तो म्हणजे देव.आपली सर्वसाधारण प्रार्थना त्यालाच असते आणि त्याला आपण आपले गाऱ्हाने सांगतो.त्यामुळे आपल्या मनाला शांती प्राप्त होते.त्याचप्रमाणे शेतकरी राजा हा मनात विशाल दृष्टिकोन ठेवून जगदव्यापी कार्य करतो.व आपल्या गरजा भागवतो.शेतकरी राजा जरी प्रत्यक्ष परमेश्वर नसला तरी मात्र अंगी आभाळभर माया असणारा या पृथ्वीतलावरील मानवरूपातील देवच आहे.

 समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता सदैव शेतात राबणारा शेतकरी हलाखीच्या परिस्थितीतही ताट मानेने जगतो. वास्तविक पाहता शेती करताना शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणतात ना,"जावे ज्यांच्या वंशा तेव्हा कळे"हे तेवढेच खरं आहे. ज्यांना शेतीविषयी काडीमात्र ज्ञान नाही.समस्या नेमकं कोणत्या याची माहिती नाही.ते शेतकरी जीवनाची वरवरची पाहणी करून मते मांडतात. स्टेजवरून मत व्यक्त करतात.भाषणे ठोकतात. मात्र संकटाचा सामना करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं.ते शेतकऱ्याचचं असतं.शेतकरी जेव्हा पोटाला चिमटा देऊन कष्टाच्या कमाईतील सर्व काही पेरणीच्या व लावणीच्या माध्यमातून सर्व काळ्या आईच्या पोटात ओततो.अगदी तेही अगदी विनाशर्त..! तो कधी आईकडून बॉण्ड पेपर लिहून घेतो का?नाही ना..! हजारो रुपये खर्च करून जेव्हा हे नैसर्गिक व अनै सर्गिक संकट येतात.तेव्हा मात्र त्याला हृदय विशाल करून सर्व संकटांना सामोरे जावे लागते व बाराही महिने शेतात राबावे लागते.

 शेतकरी राजांच्या नशिबी अनेक संकटे येतात. हल्ली बदलते हवामान व प्रदूषणयुक्त वातावरणामुळे बेमोसमी पाऊस,यामुळे नेमका पावसाळ्यात उन्हाळा की उन्हाळ्यात पावसाळा ही स्थिती झालेली दिसून येते.पावसाळ्यातही पाऊस कधी-कधी पंधरा ते वीस दिवस दांडी मारत असतो.उगवलेले कोवळे पिक पाण्यावाचून व तीव्र उष्णतेने सुकून जातात.काही नाजूक पिकं तर करपून जातात. दुबार-पेरणीची वेळ येते.या दुबारपेरणीपायी शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होते.तरीही शेतकरीराजा जिद्दीने व हिमतीने उठून उभा राहतो.कधी भरमसाठ पावसाच्या बरसण्याने अर्थात ओल्या दुष्काळाने तर कधी पाण्याच्या दांडी मारण्याने म्हणजेच कोरड्या दुष्काळात जीवाचा आटापिटा करून पिकाची लहान लेकरावाणी संगोपन करतो.शेतातील पिकांची मशागत करतो.पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी पिकांना खते पाणी घालतो. पैसे खर्च करतो. त्यातही व्यापारी,कृषी सेवा केंद्र अव्वाचे-सव्वा पैसे घेऊन लुबा डणूक करतात.त्याचप्रमाणे रोगट वातावरणातून पिकांवर किडे- अळ्यांचा प्रादुर्भाव होतो.किडे,अळ्या,किटक पिकांचे नुकसान करतात.त्यामुळे उत्पन्नात घट होते. ही नुकसान टाळण्यासाठी पिकावर फवारणी करावी लागते.शेतकरी राजा पिकांवर विषारी औषधांची फवारणी करतांना जीव धोक्यात घालून मेहनत करतो. एवढे करूनही पिकं हातात येता-येता अवकाळी पाऊस पडतो. तोंडी आलेला घास परत अवकाळी पाऊस हिसकावून घेतो. ही संकटे उघड्या डोळ्याने बघतो. शेतकरी राजा पूर्णपणे हतबल होऊन जातो.तरीही एवढ्या संकटांचा सामना करत ताठ उभा राहतोच केवळ जगण्यासाठी व इतरांना जगवण्यासाठी....! कारण त्याचं विशाल हृदय व परोपकाराची भावना, आलेल्या संकटाना दोन हात करण्याची,लढण्याची जिद्द ही त्याच्या अंगी असणाऱ्या परमेश्वरी अंशाचे उदाहरण आहे.

 अशाप्रकारे शेतकरी राजा विधात्याचे अर्थात इशरचित कार्य अगदी प्रामाणिकपणे, मेहनतीने पार पाडतो. मानव प्राण्यांबरोबर इतर प्राण्यांवर प्रेम करून त्यांच्यासाठीही दिवस रात्र झटतो. मानवाची मूलभूत अर्थात अन्नाची गरज भागवतो.जगण्यास शक्ती प्रदान करतो.शक्तीचे प्रतीक म्हणून मानव कल्याणाचे कार्य करतो.तो ईश्वरा समान आहे.म्हणून शेतकऱ्याचा आदर करा.त्याच्याकडून योग्य भावात माल खरेदी करा.शेतकरी केवळ स्वतःसाठी झटत नसतो तर इतरांना जगवण्यासाठी झटत असतो.तो समाज व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.तो हताश होता कामा नये.हतबल होता कामा नये.शेतकरी मोडून पडला तर,समस्त मानवी जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.म्हणून त्याला परत "उत्तम" दर्जा प्राप्त व्हावा.त्यासाठी त्याच्याप्रती ईश्वरासमान अर्थात"शेतकरी देवो भव"हा प्रेमभाव मनात रुजवा.या प्रेम भावनेतून त्याचा आदर,सन्मान करुया....! जय किसान...! 

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments