रावेर ता.प्रतिनिधी:-भिमराव कोचुरे
धामोडी येथे जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय आणि दुरवस्थेत असल्याने नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळी या रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. धामोडी येथून खिर्डी येथे जाणारी प्रवासी रिक्षा खोल खड्ड्यात गेल्याने तोल जाऊन उलटली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र काही प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत.घटनेची माहिती मिळताच आसपासचे नागरिक घटनास्थळी धावले आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. अपघातग्रस्त रिक्षा उभी करण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर तीव्र टीका होत आहे.
या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असून, ठिकठिकाणी खोल खड्डे, खचलेली डांबरी पृष्ठभाग व वाहून गेलेली माती यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व प्रवासी यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अपघाताचा धोका कायम जाणवत असतो. ग्रामस्थ आजच्या घटनेनंतर एकमुखाने शासन व प्रशासनाकडे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कामाचे फक्त आश्वासन दिले जात असून प्रत्यक्षात कोणतेही काम होत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
जर लवकरच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको, धरणे आंदोलन व इतर तीव्र भूमिका घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment
0 Comments