प्रतिनिधी: नामदेव सरोदे . नजिक चिंचोली. नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरीच्या उत्तरेस वसलेले नजिक चिंचोली हे गाव आजही विकासाच्या स्पर्धेत मागे पडले आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्त्याहत्तर वर्षे उलटून गेली तरी या गावाला अद्यापही पक्क्या रस्त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत.
गावातील प्राथमिक शाळा फक्त सातवीपर्यंतच असून, माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. खराब रस्त्यांमुळे अनेक गुणवंत विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडण्यास भाग पडतात. आरोग्य सुविधा, दळणवळणाचे साधन, तसेच आवश्यक जीवनोपयोगी वस्तूंची उपलब्धता या सर्वच बाबतीत हे गाव अत्यंत मागासलेले आहे.
स्थानिक रहिवासी नामदेव सरोदे यांनी व्यक्त केलेल्या भावनिक निवेदनात म्हटले आहे की, “आजपर्यंत अनेक आमदार-खासदार निवडून गेले, पण कुणाच्याही लक्षात आमचे गाव आले नाही. मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या या छोट्याशा विनंतीकडे लक्ष देऊन रस्ता मंजूर करावा, ही आमची एकच अपेक्षा आहे.”
ग्रामस्थांच्या या मागणीला शासनाने तातडीने प्रतिसाद देऊन नजिक चिंचोली गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी सर्वांचीच मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments