सन 1964 साली दिग्दर्शित झालेला"सवाल माझा ऐका"या चित्रपटातील जगदीश खेबुडकर रचित व सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं,"तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं,अन सोळावं वरीस धोक्याचं"या गाण्याप्रमाणे नेमकं वयाच्या सोळाव्या वर्षी आम्ही दहाव्या वर्गात होतो.याच शालेय जीवनातील नेमकं वयाच्या सोळाव्या वर्षात असतांना असं म्हणावसं वाटतं,भविष्यातल्या यशाचं हे पहिलं वळण मोक्याचं,दहावीच्या वरीस अभ्यासाचं..!वर्ग नववी पास झालो.नववी पर्यंतच्या परीक्षा या शाळेतल्या शाळेत व्हायच्या. चाल-ढकल करत-करत हळूहळू काठावर पास,वर-पास या स्वरूपाने पुढील वर्गात सरकत जायचो.मात्र जेव्हा नववीचा वर्ग पास झालो आणि घरच्यांनी तगादा लावला.यंदा दहावीचे वर्ष आहे.अभ्यास कर.अण्णा म्हणायचे,पूर्वी दहावी,सातवी वरच काही जणांना नोकऱ्या लागल्या.आमच्या वेळेस दहावीला मॅट्रिक म्हणायचे.दहावीची परीक्षा बोर्डाची असते.ती चांगल्या मार्काने पास झालं कि, नोकरीला लागता येते.साहेब होता येते.बापरे बाप!एवढं महत्त्व असतं या दहावीला...!तेव्हा कळलं,कारण पृथ्वीतलावरचा देव खंबीरपणे पाठीशी उभा होता त्यामुळे असं कधी जाणवलच नाही.जबाबदारीचं ओझं नव्हतं.मात्र वाढत्या वयानुसार अर्थात दहावी बारावीनंतर वयाच्या अठराव्या वर्षापासून सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येतो.कारण पंधरा वर्षापर्यंत बापाने कधीच म्हटलं नाही.मात्र यावर्षी त्यांची तळमळ होती.हे दहावीचं वर्ष आहे.अभ्यासाचं वर्ष आहे.खूप अभ्यास कर यशस्वी हो.खरंच! एवढे वर्ष कळले नव्हतं.अण्णा हे पहिल्यांदा बोलले.आमच्या वेळेस वर्ग नववीपर्यंत पांढरं शर्ट आणि खाकीची हाल्फ चड्डी असा गणवेश होता.मात्र दहावीत पांढरा शर्ट आणि पांढरी फुलपँट असा शाळेचा गणवेश होता.तो गणवेश घातल्यावर खरंच वाटलं की,आपण आता दहाव्या वर्गात गेलो. मोठे झालो.
आमचं जीवन ग्रामीण स्तरावरचं.त्यामुळे वर्ग दहावीच्या वर्गासाठी कठीण विषय काय करायचं.असं फारसं मार्गदर्शन नव्हतं परंतु,काही सीनियर मुलांच्या मार्गदर्शनातून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इंग्रजी, गणित व भूमिती या विषयाचा ट्युशन,समर बॅचेस वगैरे लावाव्या लागतते.गावात त्यावेळेस क्लासेस हा प्रकारच नव्हता. गुरुजीच एवढं तळमळीने अन मन लावून शिकवायचे की,बाहेरचे ट्युशन लावायची गरज नव्हती. परंतु काही मित्रांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्याच्या ठिकाणी इंग्रजी व गणित विषयाचे ट्युशन लावण्याचे ठरवले. तेथे गेलो.एक दिवस शिकवणी वर्गात बसलो. मात्र तेथील शहरी जीवन बघून मी व आमचे सहकारी मित्र दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पळून आलो. कारण तेथे आमचा मेळ जमला नाही.उन्हाळ्याच्या सुट्ट्या थोडीफार मौज मजा करण्यात निघून गेल्या.मात्र दहावीचं वर्ष आहे. अभ्यासाकडे लक्ष दे.हे वाक्य ऐकून विनोदचा गंभीर व्हायचा.कारण येता-जाता घरून टोमणे बसायचे.यंदा दहावीचे वर्ष आहे.अभ्यासाकडे लक्ष दे.त्या पद्धतीने दहावीचं आव्हान स्विकारलं.उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जूनमध्ये शाळा उघडल्या.दहाव्या वर्गाला सुरुवात झाली.पांढरे शर्ट आणि पॅन्ट घालून,कुमार भारतींच्या शेवटच्या वर्षातील पुस्तक घेऊन शाळेत जायचो. पहिल्याच दिवशी गुरुजींनी वर्ग दहावीतील मुलांसाठी विशेष सूचना द्यायला सुरुवात केली. त्यांच्याही तोंडून पहिलंच वाक्य. हे तुमचं दहावीचं वर्ष आहे.अभ्यासाकडे लक्ष द्या. यावर्षी उनाडक्या करून चालणार नाही.यावर्षी बोर्डाची परीक्षा असते. पेपर दुसऱ्या शाळेवर तपासायला जातात.अतिशय बारकाईने पेपर तपासले जातात वगैरे.आम्ही सर्वजण अगदी शांततेने सर्व सूचना ऐकत होतो.वयाच्या सोळाव्या वर्षातील सर्व कुमार मंडळी व कुमारी अर्थात तारुण्याचा उंबरठ्यावरील आम्ही गंभीर झालो. वर्गातही अगदी शिस्तीत व शांततेत गेलो. जणू काही सर्वांनी दहावीच्या वर्षाचं मनावर घेतलं होतं.आपापसातही अभ्यासाच्याच चर्चा असायच्या.वर्ग दहावीच्या सर्व विषयांच्या तासिकासुद्धा अगदी वेळेवर व्यवस्थित व्हायच्या.मागील वर्षापर्यंत,मधल्या सुट्टीत आजूबाजूच्या शेतात चिंच,बोरे खायला गायब व्हायचो.विहिरीवर पोहायला जायचो. तसं यावर्षी अजिबात जात नव्हतं. सर्व उनाडपणावर बंधने आली होती. कारण इतरांबरोबर आमचंही मन आम्हाला सांगू लागलं होतं कि, यंदा दहावीचे वर्ष आहे. अभ्यासाचं वर्ष आहे.
जुलै, ऑगस्ट संपल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेची वेळ आली. सरांनी त्या संदर्भात सूचना दिल्या.यावर्षी पहिल्यासारखे नाही.पहिल्या सत्रातील मार्क वेगळे व द्वितीय सत्रातील मार्क वेगळे म्हणून आता केलेला अभ्यास हा दिवाळीनंतर सराव परीक्षेबरोबर बोर्डाच्या परीक्षेतही तेवढाच उपयोगाचा राहील.म्हणून दिवाळीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवा.अभ्यासाकडे लक्ष दिले. दिवाळीच्या सुट्ट्यातही गुरुजींनी दिलेल्या सूचनेनुसार अभ्यासाकडे लक्ष दिले कारण, वेळ वाया घालवू नका.वेळ परत-परत येत नाही. असे अनेकजण मार्गदर्शन करत होते. त्यांचंही अगदी बरोबर होतं.दिवाळीच्या सुट्ट्या नंतर परत द्वितीय सत्र सत्र सुरू झाले. डिसेंबरला प्रायोगवह्या त्याचबरोबर सराव परीक्षांचा काळ चालू झाला. कारण साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षेचे टाईम-टेबल येणार याविषयी गुरुजी सांगत असत.जानेवारीला आम्हा सर्व मुला-मुलींचे गुरुजींनी अचूक नावे,जन्मतारीखा व इतर माहिती इंग्रजी व मराठी मध्ये लिहून घेतली.कारण ती बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेवर कायमची छापून येणार होती.म्हणून गुरुजीसुद्धा विशेष काळजी घेत असत.जेणेकरून आईचे नाव, बाबांचे नाव,आडनाव,जन्मतारीख चुकायला नको.त्यानंतर शाळेतअंतर्गत बोर्डाच्या परीक्षा प्रमाणे एक नमुना म्हणून सराव परीक्षा घेतली.गांभीर्याने उत्तर लिहिली कारण त्यावरून आपल्या पुढील प्रगतीचा अंदाज येणार असतो.साधारण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सराव परीक्षा संपल्या.गुरुजींनी पेपर तपासले.अभ्यासानुसार सगळ्यांना मार्क मिळाले.जो विषय कच्चा असेल त्याचा जोमाने अभ्यास करायचा.असं मार्गदर्शन गुरुजींनी केलं.फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एक छोटाखाणी निरोप समारंभाचा कार्यक्रम केला.दहा दिवसानंतर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची आतुरता लागली होती. आमची बोर्डाची दहावीची परीक्षा गावापासून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर करडी,धाड येथे झाली.सगळ्यांनी मेहनत घेऊन परीक्षा दिली व सर्व मित्रमंडळी सगळ्या मार्कांनी पास झाले.आजरोजी त्या दहावीच्या भरवशावर कितीतरी मित्रमंडळी काही छोट्या-मोठ्या हूद्द्यावर आहेत.
मित्रांनो!खरंच त्या काळात शिक्षण घेताना संघर्ष करावा लागला.हल्ली सारखी तेव्हा शिकवणी वर्ग नव्हते.योग्य मार्गदर्शन नव्हते. मात्र गुरुजींचे आमच्यासाठी खूप परिश्रम असायचे. ते आमच्यासाठी खूप मनापासून मेहनत घेत असत.दहावीच्या वर्षात त्यांनी आमच्यासारख्या खेड्यापाड्यातील गोरगरीब मुलां-मुलींना सतत योग्य मार्गदर्शन केले.आमच्या गोरगरीब आई-वडिलांचे आमच्याविषयी असलेली स्वप्नांची आठवून करून देत..अभ्यासाबरोबर त्यांच्या तळमळ व मेहनतीचे महत्त्व पटवून सांगत.त्यामुळे त्यांच्या कबाड कष्टांचे,घामाने माखलेले चेहरे व शरीर आपल्या डोळ्यासमोर उभे राहायचे.त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी परत आम्ही जोमाने अभ्यास करायचो.प्रत्येक जण घरातील मंडळी त्याचबरोबर गुरुजी म्हणायचे की,हे दहावीचे वर्ष तुमचं अभ्यासाचं वर्षं आहे.त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी अभ्यास केला.गुरुजींच्या मार्गदर्शनाने व आई-वडिलांच्या आशीर्वादाने सर्वजण यशस्वी झालो.या दहावीच्या वर्षातील संघर्षाच्या आठवणी.कायम स्मरणात आहे व स्मरणात राहतील. समस्त गुरुजनवर्ग व वर्गमित्रांना समर्पित....!
विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments