Type Here to Get Search Results !

वरणगाव सिव्हील सोसायटीतर्फे संगीतमय दिवाळी पाडव्याचे आयोजन



तालुका प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर  

भुसावळ : दिवाळी सणाच्या उत्सवात वरणगाव शहर व परिसरातील नागरिकांना या वर्षी प्रथमच वरणगांव शहरात संगीतमय पाडव्याचा आनंद घेता येणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक,पर्यावरण,आरोग्य ,विद्यार्थी पालक कार्यशाळा  अशा विविध सामाजिक विषयांवर कार्य करणारी ‘वरणगांव सिव्हील सोसायटी’ या संस्थेने दिवाळी पाडव्यानिमित्त या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन २२ ऑक्टोबर २०२५, बुधवार रोजी   सकाळी ५ .३० वाजता  गांधी विद्यालय, वरणगांव येथे केलेले आहे. पारंपारिक सण  उत्सवाबरोबरच आपल्या संस्कृती, मराठी भूपाळी, भक्तिगीते, भावगीते , संस्कार गीते,पारंपारिक व शास्त्रीय लोकसंगीत  यांचीही जपणूक व्हावी व हा अनमोल वारसा, ठेवा,संस्कार शिदोरी  पुढील पिढीला  मिळावी हा या आयोजना मागचा हेतू असल्याचे सिव्हील सोसायटीचे अध्यक्ष डॉ.राहुल भोईटे ( भोईटे हॉस्पिटल,वरणगांव) यांनी  सांगितले. पारंपारिक सणासोबतच सांस्कृतिक रंगत आणणा-या कार्यक्रमाने  रसिकांना संगीतमय सुरीला कार्यक्रम अनुभवण्यासाठी सिव्हील सोसायटीकडून प्रयत्न केला जात आहे. सदर कार्यक्रम हा मोफत असून भजन, भावगीत, भूपाळी, लोकगीते अशा विविध सुश्राव्य  लोकसंगीताचे सादरीकरण  करण्यात येणार आहे. मुंबई ,पुणे, नागपूर अशा मोठ्या ठिकाणी नित्यनियमाने दरवर्षी असे कार्यक्रम नागरिकांना अनुभवायला  मिळतात. आपल्या परिसरातील कलावंतांना वाव मिळावा व नागरीकानाही  आपल्या परिसरातच  कार्यक्रमाचा लाभ मिळावा हा हेतू आयोजनामागचा आहे.  दिवाळी पाडव्याची पहाट  भक्तिमय व संगीतमय बनवून मराठी संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी रसिकांनी या संगीतमय सोहळ्याला उपस्थिती द्यावी, असे आवाहन वरणगांव सिव्हील सोसायटीकडून करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments