प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव.
गरजवंतांना दिवाळीनिमित्त चांगले कपडे मिळावे म्हणून लासलगाव शहरात साकारण्यात आलेल्या माणुसकीच्या भिंतीच्या माध्यमातून गरजवंतांना कपड्यांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर राहिलेल्या कपड्यावर प्रक्रिया करत त्याच्या सतरंज्या बनवून व लोकसहभागातून जमा झालेल्या वर्गणीतून नवीन ब्लॅंकेट ची खरेदी करत ऊसतोड कामगारांच्या तांड्यावर जाऊन थंडीच्या दिवसात उबदार कपडे वाटपाचे अनोखे कार्य शहरातील परमपूज्य भगरीबाबा आधार फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.
गरजवंतांना दिवाळीत चांगले कपडे घेणे शक्य होत नाही, दीपावलीनिमित्त अनेक नागरिकांकडून घरातील चांगले कपडे बाजूला काढले जातात, याच कपड्यांचा वापर गरजूंना करता येईल आणि त्यांची दीपावली चांगले कपडे घालून गोड व्हावी या हेतूने परमपूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशन यांच्यावतीने लासलगाव शहरात माणुसकीची भिंत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आली होती. या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने जवळपास २० हजार पेक्षा जास्त गरजवंतांना ४ लाखापेक्षा अधिक चांगल्या कपड्यांचे वाटप करण्यात आले.
वाटप केलेल्या कपड्यानंतरही जे कपडे शिल्लक राहिले त्या कपड्याचे बारीक तुकडे करत त्यावर प्रक्रिया करून त्याच्या सतरंज्या तयार करण्यात आल्या तसेच या फाउंडेशन च्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केल्याने मोठ्या संख्येने ब्लॅंकेट खरेदी करून त्याचे गुरुवारी वेळापूर येथील ऊसतोड कामगारांनी प्रत्यक्षात जाऊन वाटप करण्यात आले. यावेळी भगरी बाबा आधार फाउंडेशनचे सदस्य व विविध सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात केली जाते अशा तालुक्यात ऊसतोड कामगार तसेच द्राक्ष बागेसाठी अनेक मजूर शेतावर येऊन उतरतात त्या गोरगरीब मजुरांना थंडीमध्ये या सतरंज्यांचे तसेच ब्लॅंकेटचे वाटप त्यांच्या तांड्यावर जाऊन मंडळाच्या वतीने करण्यात आल्यामुळे एक प्रकारे आगामी थंडीची चाहूल कमी करण्याचा हा मंडळाचा प्रयत्न निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Post a Comment
0 Comments