ग्रामीण भागातील जीवन जगण्याची तऱ्हाच निराळी! अगदी साधेपणा मात्र जीवनामध्ये सर्वात जास्त आनंदी असतील तर खेड्यातील लोकंच.कारण तेथील निसर्गरम्य वातावरण,शुद्ध हवा शुद्ध आहार व त्याचबरोबर शुद्ध विचार सुद्धा.अजूनही टिकून आहेच कारण,आहारातून आचार-विचार रुजतात.त्या आहाराला मायेची उब असते.गेल्या दोन ते दशका अगोदर गावात प्रत्येक घरी मातीच्या चुली होत्या.आया-बहिणीच्या हातच्या जेवणाला गोड चव होती.कारण ते मातीच्या चुलीवर बनवल्या जायचं. काही अंशी अजूनही मातीच्या चुली आहेत.मात्र हल्ली खेड्यापाड्यातही विद्युत शेगड्या अन गॅस जाऊन पोहचले.
मातीची चूल बनवणे ही सुद्धा एक सुंदर कलाच आहे,कारण चुलीची रचना लक्षात घेता ती मातीच्या गोळ्यातून कोरून साकारलेली असतें.त्यावर घरातील सर्व प्रकारची स्वयंपाकाची भांडी बसायला हवी. असा योग्य समतोल साधलेला असतो.मातीपासून चूल बनवण्यासाठी आई व आईच्या मैत्रिणी सुंदर सुंदर कल्पना वापरायच्या.आई गावाच्या बाजूला असलेल्या नदीच्या काठावरून कोपऱ्यातील छान काळी माती टोपल्या-टोपल्याने घेऊन यायची. घराच्या अंगणासमोर टाकून ठेवायची.त्यात काही मातीचे ढेकळं असल्यास दगडाच्या तुकड्याने कुटून-कुटून बारीक करायची. त्यावर हलकंसं पाणी मारून ठेवायची.त्या मातीचा खूप छान सुगंध यायचा.त्या भिजलेल्या मातीला कुंभारासारखं छान तुडवायची.त्यामुळे माती एकजीव व्हायची.छान चिकट-चिकट झाल्यावर पोळ्या बनवायच्या पिठाप्रमाणे छान मळून घ्यायची.शक्य झाल्यास मातीचे गोळे बनवून घरात ज्या ठिकाणी चूल बनवायची त्याठिकाणी टोपल्याने घेऊन यायची.तेथे आयताकृती ओटा बनवायची.साधारण दीड बाय अडीच किंवा तीन फुटाचा लांबी रुंदी असलेला या मातीच्या ओट्याची उंची सुरुवातीला एक फुटाची असायची.या आयताकृती मातीच्या ओट्याला पूर्ण एकजीव करून घ्यायची.आईकडे मोजायला इंच पट्टी, फुटपट्टी कसली? तिचे माप म्हणजे सराटा,चमचा किंवा पातेले,भगूने असायचे.या मातीचा आयताकृती ओटा पाणी मारून-मारून छान मुरवायची.साधारण दोन ते चार दिवस त्यातील ओलसरपणा कमी व्हायचा.मात्र काही अंशी अजून ओलसर करून ठेवायची पूर्णतः चिखल नाही परंतु हल्लीच्या केकप्रमाणे त्यातील मातीचा मेळ घालून ठेवायची,जेणेकरून त्यात एखादी धारदार वस्तू घूसवल्यास ती घुसेल.त्या मातीच्या लगद्याला कोरता येईल.या पद्धतीने तो भिजलेल्या मातीचा लगदा चुलीसाठी तयार असायचा.
मातीची चूल बनवण्याची कला सर्वच महिलांना अवगत नसायची.म्हणून एकमेकींच्या सहकार्याने महिला चुली बनवत असत.आई मात्र मातीची चूल बनवण्यात निपून होती.आईच्या मैत्रिणी आईला चूल बनवायला बोलवत असत.आई मैत्रिणींना छान आकर्षक चूल बनवून द्यायची.अजूनही गावाकडे हा एक गुण विशेष आहे.एकमेकांच्या मदतीला धावून जातांना कसलाच कमीपणा नसतो किंवा अहंकार नसतो.अगदी मनापासून एकमेकांच्या मदतीला धावून जातात.तर अश्या पद्धतीने चुलीसाठी भिजवून ठेवलेल्या मातीचा आयताकृती ओटा हा पाच ते सहा दिवसानंतर चूल बनवण्यास लायक व्हायचा.चूल बनवण्यासाठी आईचे साहित्य कोणते असायचे. तर ते म्हणजे वावरात वाढलेलं तन काढण्याचं खूरपं,सराटा,चमचा,छोटी वाटी वगैरे.हे सर्व साहित्य घेऊन चूल बनवायला बसायची.हे साहित्य वापरूनच आई त्या मातीच्या लगद्याची चूल बनवताना तंतोतंत माप घ्यायची.त्या आयाताकृती ओट्याची ओबडधोबड व अनावश्यक माती खूरुप्याच्या साह्याने खरडून घ्यायची व चारी बाजू एखाद्या भिंतीप्रमाणे गुळगुळीत करायची.त्याचे दोन भाग केल्यास,एक मुख्य चूल व अर्धा भाग उह्यासाठी ठेवायची.त्या मातीच्या ओट्यातून चुलीचा व उल्ह्याचा आकार रेखाटण्यासाठी,आई तुरखाडीची जाड काडी वापरायची.आई तुरखाडीच्या काडीने अगोदर ज्या ठिकाणी चुल बनवायची त्या ओलसर मातीवर आखून घ्यायची.खुरपं किंवा अनुकूचिदार वस्तूने चुलीच्या आखलेल्या भागातील माती काढून टाकायची.त्याला चुलीचा आकार येईपर्यंत इतर बारीक वस्तूने आतील अनावश्यक माती काढून सुबक आकार येईल अशी रचना करायची.आतील भागातील माती काढल्यावर पूर्ण हात जाईल अशी आत पोकळी तयार व्हायची.आतील भाग अजून आकर्षक करण्यासाठी सराटा,चमचे,वाटी हे वापरायची.अर्ध्या भागात चुलीचा आकार पूर्ण झाल्यावर उजवीकडील भागात उल्हं करण्यासाठी जो चुलीचा भाग कॊरून जी माती काढलेली असायची.त्याच आतील भागातून बोगदा कोरल्यासारखं अर्ध्या ते पाऊन फुट इतके कोरल्यावर पृष्ठभागावरील बाजूला गोलाकार माप घेऊन, तेवढा भाग खुरप्याने किंवा सराट्याने कॊरून घ्यायची.म्हणजे वरील बाजूने गोलाकार व मोठ्या चुलीतून तिरकस भुयारासारखे कोरून उल्हं बनायचं.ते आतल्या आत कोरलेलं असायचं. मात्र चुलीच्या वरील बाजूने दिसायचं.वरील बाजूस मातीचे तीन गोळे ठेवून गॅसच्या शेगडी प्रमाणे बनवलेले असायचे.जेणेकरून त्यावर छोट्या आकाराचार भगून किंवा पातेलं बसू शकेल.या उल्ह्याला आतून अग्नी, विस्तव कसा पोहोचेल? तर चुलल पेटवलेल्या काड्याचा जो अग्नी,विस्तव असतो तो त्या भुयासारासारखा कोरलेल्या छिद्रातून सरळ पोहचायचा.या चुल्ह्याचा वापर विशेषत: भाजीला फोडणी मारली असता,भाजी मंद आचेवर शिजवण्यासाठी,पातेल्यात तांदूळ शिजायला घातल्यास छान मंद आचेवर भात शिजवण्या साठी त्याचप्रमाणे मुख्य चुलीवर आई भाकरी बनवत असल्यास बनवलेली भाजी पुन्हा गरम करायला.तव्यावरचा ठेचा गरम करायला.दूध भाकर खायची असल्यास दूध गरम करायला.या उह्याचा वापर व्हायचा.आईने गरमागरम भाकर बनवली की,ऊल्ह्यावर दूध,ठेचा,चटणी गरम शिजायचे.आईने बनवलेली गरम-गरम भाकर अन ठेचा,चटणी, दूध,भाजीवर ताव मारायचो.
चुलीचा दर्शनी भाग किल्ल्याच्या महाद्वारासारखा दिसायचा. आतील बाजू गोल घुमटाकार दिसायची.वरील भागावर पातेलं, भगूने,तवा बसावा म्हणून तशी रचना केलेली असायची.एखादं पातेलं छोटं असल्यास,मध्ये एक लोखंडाची पट्टी ठेवल्या जायची.जेणेकरून ते पातेलं लवंडणार नाही.चुल शक्यतो घरातील"एल" आकारातील भागात असायची. किंवा नसल्यासही एक भाग तिचा भिंतीला असायचाच.आई त्याभिंतीला किंवा चुलीच्या वर भिंतीला एक गोखलं बनवायची. गावाकडे त्याला देवळी पण म्हणतात.त्यामध्ये माचीस ठेवल्या जायची.जेणेकरून चूल पेटवतांना लवकर सापडायला हवी. त्याचप्रमाणे अजून जागा शिल्लक असल्यास सांडस,पळी चमचा, सराटा, विळा,फुंकणी ठेवायला कोपरा बनवायची.अर्थात स्वयंपाक बनवण्यास आवश्यक वस्तू या सर्व एका ठिकाणी ठेवण्यासाठी तशी व्यवस्था केलेली असायची. जेणेकरून त्या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या जायच्या.वेळेवर सापडायच्या.खरच!किती बुद्धी कौशल्याचा वापर करून गावाकडील आया मातीच्या चुली छान सुंदर बनवायच्या ना! जरी अडाणी, अशिक्षित असल्या तरी एखाद्या शिकलेल्या इंजिनीयरला लाजवेल अशी सुंदर कलाकृती,डिझाईन व सर्व आकर्षक असे साचेबद्ध बनवल्या जायचे.बाजारात साच्याने बनवलेल्या चुल्ही विकायला आल्या.मात्र त्या तकलादू स्वरूपाच्या असायच्या.तसंच जी कलाकृती व सुबक रचना असायला हवी.ती आढळून येत नव्हती.
माती पासून बनवलेल्या चुलीमध्ये आईची मेहनत, कला व माया होती,म्हणून चुलीवरच्या जेवणाला मधुर चव होती.हल्ली, बघा ना! किती विरोधाभास दिसून येतोय.मानवाने गॅस चा शोध लावला.भयंकर वेगवेगळ्या प्रकारची प्रगती केली.एक क्षणात लाइटरने बटन दाबले की गॅस पेटतो.मात्र गॅसवर बनवलेल्या पदार्थाला फारशी चव नसते.याची प्रत्येकाला जाणीव झाली.हे सत्य कळायला लागले.परंतु मायेची उब असलेल्या चुलीवरच्या जेवणासाठी माणूस आसूसलेला असतो. म्हणून शहराच्या रस्त्यावर हल्ली खूप मोठ-मोठे हॉटेल,ढाबे,खानावळीवर कपाळ भर कुंकू लावलेलं,नाकात नथ,चोळी,लुगडं नेसलेली आणि अन डोक्यावर पदर घेतलेल्या आजीचे मातीच्या चुलीवर स्वयंपाक करतांना बॅनर्स लावलेले दिसून येत आहेमला.आकर्षणासाठी हॉटेल मालक येथे अस्सल मराठमोळ चुलीवरचं जेवन मिळेल, चुलीवरचे मटण मिळेल म्हणून जाहिरात व पोस्टर लावत आहे.हेच मायेचं, चवदार, स्वादिष्ट चुलीवरचे जेवण जेवण्यासाठी आज खानावळीवर, हॉटेलवर,ढाब्यांवर गर्दी होताना दिसून येत आहे. जरी फॅशन म्हणून गेला तरी मात्र मायेचं मधुर चवीचे महत्त्व कळलं म्हणूनच ना!कारण शेवटी तुम्ही कितीही प्रगती करा. कितीही वेगळ्या पद्धतीचे चायनीज,परदेशी जेवण करा त्यात तुम्हाला समाधान मिळणार नाही.मात्र मायेची उब गोड,सुमधुर चवी मातीच्या चुलीवरच्या जेवणातच असते. याची पुन्हा ओळख पटली. हाच तर खरा मायेच्या प्रेमाचा ओलावा असतो.अन गावाकडच्या मातीच्या चुलीची शक्ती असते.
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ ता जि बुलडाणा
Post a Comment
0 Comments