Type Here to Get Search Results !

गावाकडील हुरडा पार्टी



पार्टीला फक्त एखादं निमित्त हवं ! गावाकडे आम्हां खेडयातील पोरांची पार्टी असायची ती ही अगदी बिनखर्चिक..! आपण बघतो. हल्ली हायवेच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे फलक लावलेले दिसून येतात.त्यामध्ये जंगलची सफर, हुरडा पार्टी, चुलीवरचे जेवण वगैरे व त्यांचे प्रत्येकी पाचशे ते हजार हजार रुपये पर्यंत शुल्क आकरलेले दिसून येतात.लोकं एक फॅशन म्हणून शनिवार,रविवारी तिथं हजेरी लावतात. मात्र आम्ही खेड्यातील लोकं हे जीवन दररोज अनुभवतोय.निसर्गाच्या सानिध्यात,नदीच्या काठावर,शेताच्या बांधावर त्यामुळे या पार्ट्या म्हणजे काही फारसं नविन असे काही नाही.या नियोजित हुरड्यांच्या पार्ट्या आठवड्यातून एकदाच.मात्र खेड्यात तसं काही नव्हतं.पार्टीला सर्व वार सारखेच अन तेही मनाला पटेल तेव्हा करायचो.

 साधारण खरीप हंगामामध्ये गावाकडे मका,मिरची त्याचबरोबर कपाशीचे पीक घेतले जाते.या पिकाबरोबर रिकाम्या जागेत भुईमुंग,चवळी,तूर पेरल्या जाते.रब्बी हंगामामध्ये शाळु,ज्वारी, गहू,हरभरा या पिकांची पेरणी केली जाते.हंगामानुसार शेतातील पिकात दाणे भरणीची वेळ आली किंवा कोवळं-कोवळं असं धान्याचं पीक खाण्यास लायक झालं की,त्याला काड्यांवर भाजून खाण्याची मजा वेगळीच असायची.त्यावर मीठ,लिंबू,मिरची पावडर मसाला मारला की,त्याला अजूनच वेगळी चव यायची. ही शानदार हुरडा पार्टी व्हायची.साधारण खरीपातील मकाचे कणसं दाण्यात आले की,आम्ही पाच-सहा जण जमा होऊन मक्का हुरडा पार्टी करायचो.शाळू,बाजरी,गव्हाच्या ओंब्या,हिरवट,पिवळसर हरभऱ्याचे घाटे भाजून खाणे या प्रकारच्या सुद्धा हुरडा पार्टीचे नियोजन करायचो.हंगामानुसार या हुरडा पार्टीचा काळ वेगळा असायचा. साधारण खरीप हंगामात ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात तर रब्बी हंगामात साधारण डिसेंबर,जानेवारी महिन्यात पिकं तयार होऊन पिकातील दाणे मध्यम पूर्ण खाण्यास लायक व्हायचे.त्याला भाजून पार्टी करायचो.हुरडा पार्टीची मज्जा अन भाजण्याची पद्धत जवळपास साधारण सारखीच असायची.

 हुरड्यासाठी ज्वारी,मका,शाळू,भुईमुंगाच्या शेंगा अथवा हरभऱ्याचे झाडासहित घाटे आम्ही सर्वांना मनसोक्त पुरेल एवढे शेतातून कापून अथवा हरभरा असल्यास उपटून आणायचो. सर्व मित्रमंडळी मिळून गोठ्याच्या बाजूला पडक्या भिंतीजवळ जमा करुन ठेवलेल्या झाडाच्या काड्या मोकळ्या जागी जमा करायचो.थोड्या बारीक वाळलेल्या गवताच्या काड्या जमा करायचो.कारण त्या मोठया आकाराच्या काड्या लवकर पेट घेत नसत, बारीक वाळलेल्या गवताच्या काडयांना माचीसच्या काडीने पेटवायचो.त्यामुळे त्या लवकर पेट घेई.त्याला हळूहळू तोंडाने फुंकर घालायचो. त्यामुळे इतर काड्या लाकडांचे तुकडे पेटण्यास मदत व्हायची.काड्या व मध्यम आकाराच्या लाकडांनी पेटण्यास जोर धरल्यास त्यातून ज्वाला बाहेर पडायच्या.त्यातून विस्तव तयार व्हायचा.त्या विस्तवावर हुरड्यासाठी आणलेल्या वस्तू जसे की,मकाचा हुरडा असल्यास त्यावरील हिरवट पोपटी आवरण काढून कणसासह त्या ज्वलंत विस्तवावर म्हणजेच हारावर भाजायला टाकायचो.गावाकडे आम्ही त्याला हार म्हणायचो. काड्यांच्या विस्तवामुळे मकांच्या कणसातील नाजूक दाणे लगेच भाजायला सुरुवात व्हायची.ते एकाच बाजूने जास्त भाजल्या जाऊ नये म्हणून,आम्ही पोरं तथा वरिष्ठ मंडळी हातातील लांब काठीने त्यांना हलवायचे.कणसांची जागा पलटवायचे.जेणेकरून ते चहू बाजूने भाजल्या जाईल.दुधाळ,पिवळसर दाणे भाजून काळसर व्हायचे.विस्तवावर भाजलेलं कणीस हाताने किंवा मोठ्या काडीच्या साह्याने विस्तवातून ढकलून बाहेर काढायचो.भाजलेल्या कणसातील लेंडूराच्या आतील भागामध्ये काडी टोचून हातात धरायचो व त्यावर मीठ,लिंबू टाकून खायचो.दाणे हाताने निघाल्यास काढून खायचो नाहीतर डायरेक्ट माकडासारखे कणसाला दातांनी कुडतडून खायचो. भाजलेल्या कणसावर पिळलेलं लिंबू व मिठामुळे एक आगळी वेगळीच चव यायची.त्यामुळे ते कुरतडूनही खाल्लं तरी एक वेगळाच स्वाद यायचा.या स्वादाने मन तृप्त व्हायचं.जिभेला वेगळा स्वाद व अनुभव यायचा.आम्ही पोरं अगदी ढेकर येईपर्यंत एका मागून एक असे दोन-तीन मकाचे कणसं खाऊन घ्यायचो.

 खरीप हंगामातील मक्याच्या हुरड्या बरोबर रब्बीतील अर्थात हिवाळ्यातील हुरडा म्हणजे हरभरा,गहू, शाळू अर्थात कोवळ्या ज्वारीचे कणसं भाजून हुरडा पार्टी करायचो.त्यांना भाजण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच. गव्हाच्या ओंब्याच्या हुरड्या साठी ओंब्यां कोवळ्या कोवळ्या कापून आणाव्या लागे. त्या ओंब्या विस्तवावर टाकून त्यांना हातावर चोळावे लागे.दोन्ही हातावर चोळल्यामुळे वरील कचपट निघून जायचे व गव्हाचे कोवळे दाणे शिल्लक राहायचे.ते दाणे एका हातावर घेऊन बाजूला ठेवलेल्या मिठाच्या डब्याच्या झाकणातील मिठावर हलकसं एक बोट ठेवून जिभेवर ठेवायचो.मीठ व भाजलेले कोवळे गहू यांचा रस मिसळ होऊन एक वेगळीच चव यायची.अशी विस्तवातील एक-एक ओंबी काढून हातावर चोळून खायचो. मात्र,आई सगळ्यांसाठी भाजलेल्या ओंब्या जमा करून,बांबूच्या सुफामध्ये टाकून हाताने रगडून घ्यायची.त्यातील ओंब्यांचे कचपट काढून,सुपात जमा झालेला कचपट पाखडून घ्यायची व आम्हाला एक -एक वाटी भरून द्यायची व ती नंतर खायची. शेवटी आईची मायाच ती...! गव्हाबरोबर रब्बी हंगामातच शेतातील हरभऱ्याच्या झाडाची फुले गळून घाटे तयार झाले की,त्यातील मध्यम स्वरूपात तयार झालेले घाट्याचे झाड आम्ही मुळासकट उपटून आणायचो व पेटलेल्या विस्तवावर टाकायचो. झाडाचा पाला जळून जायचा व घाटेसुद्धा वेगवेगळे व्हायचे. थोड्यावेळाने विस्तव थोडा निवल्यानंतर पेटलेल्या भल्या मोठ्या भाजलेल्या हरभऱ्याच्या घाट्यानंभोवती आम्ही मित्र गोल रिंगण करून बसायचो.एकेक घाटा उचलून खायचो.खाताना हात पूर्ण काळेभोर व्हायचे.ओठांच्या अवतीभोवती सुद्धा घाट्यांच्या भाजलेल्या काळ्या रंगामुळे ओठ काळे व्हायचे. घाटे खातेवेळेस काळे झालेले हाताची बोटं कधी गालावर तर कधी कपाळावर उमटायचे. त्यामुळे विदूषकासारखा चेहरा दिसायचा. यावरून एकमेकांची टिंगल उडवायचो. मात्र त्यातही खूप मजा होती, कारण तो आनंद स्वाभाविक होता.उपजत होता.त्याला कुठलाही कृत्रिमपणा नव्हता.मनमोकळं, बिनधास्त जीवन जगायचो.या गव्हांच्या ओंब्या व हरभऱ्याच्या हुरडा पार्टीबरोबर हिवाळ्यातील ज्वारी भाजूनसुद्धा छान अशी हुरडा पार्टी आम्ही करायचो. ज्वारीच्या धांड्याचे वरील बाजूचे हिरवट,पोपटी कणीस विळ्याने कापून आणायचो. पेटलेल्या विस्तवावर हलकसं मंद आचेवर भाजायला ठेवायचो.कणिसाचा धांडा लांब असल्यास,हातात धरून विस्तवावर गोल-गोल फिरवायचो. त्यामुळे कणीस चहूबाजूने चांगले भाजायचे. भाजतांना छान, खमंग वास यायचा.भाजलेल्या कणसाला दोन्ही हातावर चोळून त्यातील कचपट, बारीक कचरा तोंडाने फुंकर मारून ज्वारीचे किंवा शाळुचे कोवळे दाणे खाताना खूप छान वाटायचे. वावरातला गावरान मेवा मन तृप्त करायचा.ती चव तो सुगंध अजूनही कायम स्मरणात आहे.

 गावाकडील हंगामानुसार या हुरडा पार्टीतील काही भुईमुगाच्या शेंगा,तुरीच्या शेंगा,उकडून खाण्याच्या सुद्धा आमच्या पार्ट्या असायच्या.चवळी,उडीद,मुग सुद्धा विस्तवावर भाजून खायचो,कारण गरिबीचा काळ होता.कसंतरी पोटाची आग विजवणे. हा उद्देश होता. मात्र त्याबरोबर त्यातील आनंद हा आगळावेगळा होता.जन्मदात्या आईबरोबर काळी आई उदरात पिकवलेल्या पीकाने आमची पोटाची आग विझवायचीच...! जरी या उपक्रमांना हल्ली हुरडा पार्टी, जंगलची सफर,शेत-सहल म्हणत असले, तरी मात्र आम्हां खेड्यातील लोकांसाठी हे सततच असलं तरी त्यातून दररोज नाविन्याची ओळख होत होती. प्रत्येक प्रसंगातून जगण्याची नवीन शिकवण व नवीन अनुभूती येत होती.निमित्त जरी हुरडा पार्टीचं असलं तरी, त्यातील स्नेहमीलन,मैत्रीचा सुखद अनुभव,गरिबीची जाणीव हे सर्व संमिश्र होतं.

 अशीही गावाकडील खरीप व रब्बीतील विशेषता हिवाळ्यातील हुरडा पार्टी खूप आनंददायी असायची. मित्रमंडळी व सवंगड्यासोबत हुरडापार्टीसाठी जमा केलेल्या वस्तूंपासून ते सर्व जाती-धर्मांच्या मित्रांसोबत एकत्रितपणे भगवान श्रकृष्ण परमात्मा यांच्या गोपाळकाल्याप्रमाणे हुरड्याचा घेतलेला सुखद अनुभव ही सहकार्य व एकात्मतेची भावना रुजवण्याचे माध्यम होतं. अशी ही हुरडा पार्टी आनंदाबरोबर एकात्मतेचे प्रतिक होते.गावाकडे अजूनही हे अनुभवायला मिळतं. चला तर, मित्रांनो! नोकरी, धंदा,व्यवसाय निमित्त तुम्ही कुठेही असा.वर्षातून एकदा गावाकडे जाऊन हुरडा पार्टीचा मनमुराद आनंद घ्या...!

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ ता जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments