गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
३ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पार; एका दिवसात १०,७२४ टनांचे ऐतिहासिक उच्चांकी गाळप
पाटस: निराणी शुगर्स संचलित, भीमा सहकारी साखर कारखाना पाटस (ता. दौंड) याने चालू गळीत हंगामात उल्लेखनीय कामगिरी करत ३ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. कारखान्याने १७ डिसेंबरअखेर एकूण ३,२५,१०७.२२२ मेट्रिक टन गाळप पूर्ण केले असून, कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात १०,७२४.७९५ मेट्रिक टन गाळप करण्याचा ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे कारखान्याचा गळीत हंगाम अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू असून गाळपाचा आकडा दररोज वाढत आहे.या यशाबद्दल माहिती देताना कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांनी सांगितले की, कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता ३१०० रुपये प्रति टन याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद वर्ग, तोडणी-वाहतूक ठेकेदार, संचालक मंडळ, सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. निराणी शुगर्सच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे आणि सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच भीमा कारखान्याने हा मैलाचा दगड गाठला असून, आगामी काळातही गाळपाचा वेग असाच कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments