‘स्वावलंबी नाशिक’ उपक्रमांतर्गत ७३५ दिव्यांगांची उपस्थिती; ४५९ दिव्यांग बांधव पुढील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे रेफर..
प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव ,
जिल्हा प्रशासनाच्या ‘स्वावलंबी नाशिक’ उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या UDID कार्ड मोहिम व प्राथमिक वैद्यकीय तपासणी शिबिरास निफाड तालुक्यात प्रचंड प्रतिसाद लाभला. वैनतेय महाविद्यालय, निफाड येथे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.शिबिराच्या प्रारंभी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर समाज कल्याण अधिकारी श्रीमती हर्षदा बडगुजर व गटविकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
पंचायत समिती निफाड यांच्या वतीने शिबिराचे अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग लाभार्थ्यांच्या UDID कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायतअधिकारी व कर्मचारी तसेच संगणक परिचालकांमार्फत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली होती. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणताही त्रास न होता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता आली.आरोग्य विभागाच्या माध्यमातून केस पेपर काढणे व प्राथमिक तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरात मानसोपचार तज्ज्ञ, कान-नाक-घसा, नेत्ररोग, अस्थिरोग, DIC तसेच बहुविकलांग विभागामार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
या शिबिरास एकूण ७३५ दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दर्शविली. त्यापैकी ५९५ जणांचे केस पेपर काढण्यात आले, तर ४५९ दिव्यांगांना पुढील तपासणी व उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे रेफर करण्यात आले आहे.शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पंचायत समितीच्या वतीने चहा, पाणी व नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमास समाज कल्याण अधिकारी श्रीमती हर्षदा बडगुजर, गटविकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप, सहायक गटविकास अधिकारी सुनिल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजित कोशिरे, कार्यालय अधीक्षक निवृत्ती बगड, विस्तार अधिकारी संजय पवार, प्रशांत बोरसे व राजेश थोरात, ग्रामपंचायत अधिकारी , ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, अंगणवाडी सुपरवायझर, कार्यकर्त्या, मदतनीस, आरोग्य सेवक, शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री हेमंत सोनार यांनी केले.यावेळी गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय, विंचूर येथे दुसरे शिबिर आयोजित करण्यात आले असून, दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Post a Comment
0 Comments