Type Here to Get Search Results !

कथा सप्ताह - नवधा भक्तीतून मानवी विकासास चालना



हिंदूधर्मामध्ये परमेश्वरभक्तीचे नवधा माध्यम सांगितले आहेत.परमेश्वराची भक्ती व गुणगाण सांगणारे अनेक ग्रंथही आहेत.मानवी जीवनाच्या विकासासाठी उपदेशवर वेद,उपनिषदे आहेत काही पुराणांचाही समावेश आहे.उदाहरणार्थ भगवान शिवांची कथा सांगणारे शिवपुराण,भगवान विष्णूचे महात्म्य सांगणारे विष्णुपुराण,जगाला प्रेमाची शिकवण देणारे भगवान श्रीकृष्ण यांच्या बद्दल भागवतमहापुराण त्याचप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र प्रभू यांचा जीवनवृत्तांत सांगणारी रामायण कथा.अशा या कथा-सप्ताहाचे कलियुगामध्ये मानव कल्याणासाठी महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारतामध्ये आयोजन केले जाते.खेड्यातील असो अथवा शहरीभागातील नगरा-नगरातील अबालवृद्ध एकत्रित येतात.भक्ती भावाने कथा श्रवण करतात. दररोज हरीकीर्तन ऐकतात.अखंड नामस्मरण करतात,परमेश्वराच्या चरणांची सेवा करतात, देवाची पूजा करतात, परमेश्वराला वंदन अर्थात सुख समृद्धी साठी प्रार्थना करतात, दास्यत्व स्वीकारतात अर्थात परमेश्वराचा सेवक बनून सेवा करतात,सख्य अर्थात परमेश्वराला आपला सखा मानून त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात, आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे आत्मनिवेदन करतात अर्थात ,राग,लोभ,अहंकार, मद मत्सर हे सर्व परमेश्वरालासमर्पित करतात.एकमेकांच्या सहकार्यातून हा फक्त उत्सव साजरा करतात.यातून एकमेकांप्रती स्नेहभाव निर्माण होतो व आपसूकच या सर्व माध्यमातून नवधा भक्ती घडते. साप्ताहाच्या या सात दिवसात ईशकथा सांगणाऱ्या भक्ती-उत्सवाचा एक स्नेहमेळा भरल्यासारखे चित्र दिसून येते.

 ईशकथा सांगणाऱ्या या सप्ताहाची परंपरा हजारो वर्षांची आहे. पुराणानुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याने पापक्षालनासाठी भागवत कथा एका सप्ताहात श्रवण केल्याची व आयोजनाची ग्रंथामध्ये नोंद आहे.तेव्हापासून परमेश्वराचे गुणगौरव गाणाऱ्या या कथा सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यासाठी लोक यथाशक्तीप्रमाणे देणगी जमा करतात.यातून आपण कमावलेल्या पैशातून दानवृत्ती गुण दिसून येतो. या माध्यमातून आपण एक समाजशील प्राणी आहोत.समाज व परमेश्वर ऋणा तून मुक्त होण्याची संधी मिळते.ईशकथेसाठी सप्ताहाचे आयोजन झाल्यावर परमेश्वराचे गुणगौरव गाण्यासाठी जसे कि,शिवपुराण, विष्णुपुराण,श्रीमद भागवत कथा,रामायणकथाकार यांना आदराने बोलावल्या जाते.या सात दिवसांमध्ये कथावाचक वाचन करून मानव कल्याणार्थ उपदेश करतात.कथेदरम्यान परमेश्वराचे गुणगान संगीतमय वातावरणात पार पडण्यासाठी मृदुंगाचार्य, गायनाचार्य, तबलावादक, टाळवादक यांना आमंत्रित केल्या जाते. खेड्यापाड्यातून,गावोगावातून भक्तगण आपले घरदार सोडून या ईशकथा सप्ताहासाठी शेकडो किलोमीटरहून अगदी निस्वार्थ भावनेने सहभागी होतात.यातून त्यांचा संसारमोहातून त्यागवृतीचा गुण दिसून येतो.कथा वाचकांच्या तासंतास बैठकीबरबर तेही उभे राहून टाळ हाती घेऊन परमेश्वराचे नामस्मरण करतात यातून संयमाची ओळख होते.अन हो, विशेष म्हणजे मन हे ईश्वराच्या नामस्मरणात गुंतून राहिल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते व कुविचार डोक्यात न येता स्वाभाविकच आत्मिक विकास होण्यास मदत होते.

 ईशकता सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते.त्यामध्ये सकाळी अर्थात पाच ते सहा वाजता काकडा आरती असते.काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्याची केलेली पहाटची आरती होय. या आरतीवेळी देवाच्या मूर्तीला काकडयाने अर्थात एक प्रकारच्या ज्योतीने ओवाळला जाते.विविध भजने,आरती,स्तोत्र म्हटले जातात. जगद्गुरु संत तुकोबाराय,शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी ई.संतांनी काकड आरती रचली आहेत.प्रातःसमयी या काकडाआरतीतील सुमधुर,संगीतमय भक्तीगीते एकूण मन तृप्त होते व प्रसन्न वाटते.वैज्ञानिक दृष्टिकोनातून सकाळी लवकर उठणे आरोग्यास हितकारक आहे याची शिकवण मिळते.दैनंदिन कार्यक्रमातील दुसरी ईशभक्ती अर्थात रुपरेषा म्हणजे कथा वाचन. साधारण दोन तासाच्या विश्रांतीनंतर श्रोतेगण,वारकरी,वाचक, सेवेकरी,टाळकरी साधारण नऊ ते बारा वेळ अर्थात तास दीड तासांच्या अवकाशातून परत दोन ते पाच वाजेपर्यंत कथा श्रवण करतात व वाचक कथा वाचन करतात. हजारो ओव्यांच्या भल्या मोठा कथा कथासंग्रहातील परमेश्वराचे गुणगान गाणाऱ्या कथा या सात दिवसात संपवण्यासाठी साधारण दिवसभरातून पाच ते सहा तास कथा वाचक कथा सांगतात व श्रोतेगण ऐकतात यातून मनाची स्थिरता व संयमाची जाणीव होते. लगेच कथा वाचन समाप्तीनंतर पाच ते सहा दरम्यान हरिपाठ म्हटला जातो. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबाराय,संत नामदेव महाराज व इतर गुरुपरंपरेचे अभंग म्हटले जातात. तब्बल पास तिथे सहा तासांच्या साधनेनंतर शारीरिक थकवा घालवण्यासाठी दोन तासांचा अल्पविराम घेतल्या जातो. मात्र या वेळेतही वारकरी,श्रोतेगणातील महिला पुरुष,तरुण मंडळी गप्प बसत नाही तर सायंकाळी संत भोजनाची तयारी करतात.अर्थात टाळकरी मंडळी,सेवेकरी मंडळी, मृदुंगाचार्य,तबलावादक यांच्या भोजनाची व्यवस्था करून स्नेह भोजनाचे आयोजन करतात. त्या काळातही अखंड नामस्मरण करतात.इच्छुक व्यक्ती सकाळ व संध्याकाळचे यथाशक्ती प्रमाणे अन्नदान करतात. दैनंदिन कार्यक्रमातील अंतिम टप्पा म्हणजे हरिकीर्तन. साधारण आठ वाजेपासून तर दहा ते अकरा वाजेपर्यंत दररोज एकेक कीर्तनकार जगद्गुरु संत तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज,संत नामदेव महाराज इ. संतांच्या गाथेतील एक अभंग घेऊन त्यावर सुंदर निरूपण करतात. मानव कल्याण साठी उपदेश करतात.ईशकथा सप्ताहाच्या या सात दिवसांचा दैनंदिन कार्यक्रम अगदी अचूक वेळेवर भक्ती भवाने समस्त गावकरी,भाविक तरुण-तरुणी महिला पुरुष मनोभावे सहभागी होऊन प्रसन्नतेने पार पडतात.सातव्या दिवशी संपूर्ण गावभर अथवा शहरी भागातील नगरांतर्गत दिंडीचे आयोजन करतात. "ज्ञानोबा-तुकाराम" चा जयघोष करतात.

 इस कथा सप्ताहातील अंतिम टप्पा म्हणजे साधारण आठव्या दिवशी मुख्य कथावाचक सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत काल्याचे किर्तन करतात.यामध्ये साधारण भगवान श्रीकृष्णांच्या गोपाळ-काल्याचे महत्त्व समजून एकात्मतेचा संदेश देतात. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या महाप्रसादासाठी गावातील,नगरातील लोक यथाशक्ती प्रमाणे गहू,तांदूळ,डाळ,तेल व इतर किराणा जमा करतात.महिला मोकळ्या मैदानात चुलीवर पोळ्या बनवतात व पुरुष मंडळी भल्या मोठ्या मातीच्या चुली बनवून मोठमोठ्या पातेल्यामध्ये, भांड्यांमध्ये भोजनासाठी वरण-भात भाजीची अर्थात महाप्रसादाची तयारी करतात. महाप्रसादाच्या या कार्यक्रमांमध्ये चूल खोदण्यापासून, चुलीची मांडणी करण्यापासून ते पंगत व पंगतीनंतर उष्ट्या पत्रावळ्या उचलल्यानंतर मोठ-मोठी भांडी घाशीपर्यंत हे कार्य तरुण महिला पुरुष वृद्ध वडीलधारी मंडळी अगदी निस्वार्थ भावनेने मनात कुठलाही प्रकारचा अहंकार बाळगता केवळ परमेश्वराचे कार्य समजून करतात.

 अशाप्रकारे हा ईशकथा सप्ताह लोकांच्या यथाशक्ती वर्गणीतून निस्वार्थ भावनेच्या श्रमदानातून तथा परमेश्वराच्या नामस्मरणात संगीतमय व भक्तिमय वातावरणात पार पडतो.यादरम्यान कथावाचक,कीर्तनकार,श्रोतेगण,सेवेकरी यांच्यातील एकाग्रता संयम धैर्य शांतता याची जाणीव होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ईशभक्तीतून मनाची स्थिरता दृढ होते. मन इतरत्र न भटकता केवळ परमेश्वर भक्तीतलीन झाल्यामुळे आत्मिक व आध्यात्मिक विकास होतो.दैनंदिन धावपळीच्या जीवनातून मनाला आलेल्या मरगळीतून मनुष्य ताजातवाना होतो आणि सर्वात विशेष म्हणजे कित्येक दिवसापासून एकमेकांना न भेटलेले व्यक्ती या सप्ताहाच्या माध्यमातून एकत्रित येतात.या स्नेह मिलनातून व एकमेकांच्या सहकार्यातून मानव विकास होण्यास मदत होते.प्रत्येकाच्या मनात सहकार्यांची भावना रुजल्या जाते.अश्या या हजारो वर्षापासून चालत आलेल्या ईशकथा सप्ताहाच्या परंपरेतून समाजातील लोकांचे स्नेहमिलन घडते.या भक्तीत्सोवाच्या माध्यमातून अध्यात्मिक प्रगती होते व मानव विकास घडून येतो.

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ ता जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments