प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव
निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद येथील तरुण शेतकरी संजय रंगनाथ आवारे (वय ३८) यांचा मका पिकास पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
मंगळवार दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास, शिरवाडे वाकद शिवारातील गट क्रमांक १२४ मधील स्वतःच्या शेतात संजय आवारे हे मका पिकास पाणी भरत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का बसला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, निफाड येथे हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.साहेबराव गावले यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी रविंद्र परसराम आवारे यांनी दिलेल्या खबरीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून गु.र.न.६२/२०२५ अन्वये भा.न्या. संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, पो.हवा.संदीप शिंदे व औदुंबर मुरडनर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.औदुंबर मुरडनर पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment
0 Comments