आष्टी प्रतिनिधी
पोलीस केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करत नाहीत, तर गरजूंना मदतीचा आधार देतात, हे पुन्हा एकदा अंभोरा पोलीस ठाण्याच्या तत्पर कारवाईतून दिसून आले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथून आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे मजुरीसाठी आलेल्या एका मजुराचा मोबाईल बुधवारी दुपारी अचानक चोरीला गेला. मोबाईल हरवल्यामुळे त्यांची मोठी अडचण निर्माण झाली. कारण तो मोबाईलच त्यांच्या कुटुंबाशी संपर्क ठेवण्याचे प्रमुख साधन होते.
घटनेनंतर संबंधित व्यक्तीने तात्काळ अंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार नोंदवली. पोलीस ठाणे गाठेले आणि सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित तपास सुरू केला.
तांत्रिक माहिती व खात्रीशीर तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत चोरीला गेलेला मोबाईल शोधून काढत तो संबंधित मजुराकडे सुपूर्द केला.
समाधानाने व्यक्त केले आभार
मोबाईल परत मिळाल्यानंतर मजुराच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. त्यांनी हात जोडून पोलिसांचे आभार मानले.
“नागरिकांचे समाधान हेच आमच्या कामाचे खरे यश आहे. अंभोरा पोलीस ठाणे नागरिकांच्या सेवेसाठी सदैव सज्ज आहे,” असे मत एपीआय मंगेश साळवे यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments