नगर प्रतिनीधी :
श्री सिताबाई काजळे कन्या छात्रालय व वसतीगृह, कामरगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली व स्मरण कार्यक्रम अत्यंत श्रद्धा, शांतता व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद, कर्मचारी व सर्व विद्यार्थिनींनी दोन मिनिटांचे मौन पाळत राष्ट्रपित्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या प्रसंगी गांधीजींच्या सत्य, अहिंसा, साधेपणा, स्वावलंबन, सामाजिक न्याय, स्वच्छता व राष्ट्रसेवा या मूल्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले अमूल्य योगदान तसेच त्यांच्या विचारांची आजच्या समाजात असलेली उपयुक्तता यावर उपस्थित वक्त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. विद्यार्थिनींनी गांधी विचार आत्मसात करून जीवनात त्यांचा अवलंब केल्यास सक्षम, जबाबदार व सुसंस्कृत नागरिक घडू शकतात, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. सत्य, अहिंसा, स्वच्छता व समाजसेवा याविषयी विचार मांडत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प विद्यार्थिनींनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रपित्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली असल्याचे मत छात्रालयाच्या अधीक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती झरेकर जनाबाई, सौ. आश्विनी मोडक व सौ. ताराबाई खोङदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती कानवडे फुलबा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव अशोक लाल शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी हुतात्मा दिन व बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत उपस्थित सर्वांनी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आवडते भजन “रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम” तसेच “वैष्णव जन तो तेणे कहिये” ही सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.
या कार्यक्रमास छात्रालयाच्या अधीक्षिका, शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग व सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, अनुशासित व श्रद्धापूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments