मुंबई महापालिकेची निवडणूक गुरुवार, १५ जानेवारी रोजी पार पडली. तर आज शुक्रवारी १६ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातील राजकीय पक्षांच्या संख्याबळाचे चित्र शुक्रवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. मुंबई महापालिकेने मतमोजणीसाठीची तयारी आधीच पूर्ण केली असून २३ ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे. यावेळी मतमोजणी उशीरा सुरू होणार आहे. या मतमोजणीकडेही सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीसाठी 'पाडू' यंत्रणा प्रथमच वापरण्यात येणार असून या यंत्रणेविषयी राजकीय पक्षांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीतही गोंधळ होण्याची शक्यता आहे. मंबई महापालिकेत कोणाची सत्ता येणार याचे चित्र आज स्पष्ट होणार
मुंबई महापालिकेची निवडणूक गुरुवार, १५ जानेवारी रोजी पार पडली. तर शुक्रवारी १६ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातील राजकीय पक्षांच्या संख्याबळाचे चित्र शुक्रवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२७प्रभागांसाठी एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवार, १६ जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाअंतर्गत अभिरक्षा कक्ष (स्ट्राँगरुम) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस खात्याकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे. या २३ ठिकाणीमतमोजणी पार पडणार आहे. मुंबई महापालिकेकडे एकून २० हजार कंट्रोल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिट आहेत. ही यंत्रे विक्रोळी आणि कांदिवली येथील गोदामांमध्ये ठेवण्यात येणार आहेत.
मतमोजणीला उशीर का ?
दरवेळी निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होते. मात्र यावेळी मतमोजणी १० वाजता होणार आहे. मतदानानंतर सलग दुसऱ्या दिवशी मतमोजणी होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर सगळी यंत्रे जमा करण्यास शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच सकाळी ही यंत्रे मतमोजणी केंद्रावर पोहोचण्यासाठी वेळ लागेल, हे गृहित धरून मतमोजणी उशीरा सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
१४ टेबल आणि एका वेळी दोन प्रभागांची मोजणी...
मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक प्रभागासाठी १४ टेबल असतील. एका वेळी दोन प्रभागांची मतमोजणी सुरू करण्यात येईल. ती पूर्ण झाली की पुढील दोन प्रभागांची मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण निकाल येण्यास आठ ते दहा तास लागण्याची शक्यता निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
काय आहे 'पाडू' यंत्रणा ?
मतमोजणीत तांत्रिक अडथळे येऊ नये म्हणून यंदा विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेंगलुरू या कंपनीची मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. या मतदान यंत्रांद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक आहे. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनही मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल तर याच कंपनीने विकसित केलेल्या पाडू (प्रिंटींग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट) यंत्राचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १४० पाडू यंत्रे मुंबई महापालिकेला अतिरिक्त म्हणून प्राप्त झाली असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

Post a Comment
0 Comments