Type Here to Get Search Results !

महागांव तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर शेतकरी हवालदिल



प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे 

महागांव : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवामान खात्याच्या कोणत्याही ठोस इशाऱ्याविना अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आणि सोबत आलेल्या जोरदार वाऱ्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. गहू, हरभरा आणि उन्हाळी ज्वारी ही प्रमुख पिके आडवी पडून जमिनीवर लोळली असून ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या या संकटामुळे शेतकरी वर्गात तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये सायंकाळच्या सुमारास पावसाची सर कोसळली. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने गव्हाचे कणसासह पीक पूर्णपणे जमिनीवर पडले. आधीच काढणीला सुरुवात झालेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतात पाणी साचल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

हरभऱ्याच्या शेतांमध्ये ओलावा वाढल्याने शेंगा काळवंडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेंगांमध्ये बुरशी येण्याचा धोका निर्माण झाला असून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. उन्हाळी ज्वारीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाऱ्यामुळे पिकांची मोडतोड झाली आहे.

गहू आणि हरभरा ही दोन्ही पिके सध्या काढणीच्या अवस्थेत आहेत. मात्र जमिनीवर पडलेल्या पिकांची काढणी करताना मजुरी वाढणार आहे. शेतकऱ्यांना अतिरिक्त कामगार ठेवावे लागणार असून खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.

यंदा खत, बियाणे, औषधे आणि मजुरी यांचा खर्च आधीच वाढलेला असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे कोलमडून टाकले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिके उभी केली होती. मात्र या नैसर्गिक संकटामुळे त्यांच्यावर आर्थिक टंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे.

ग्रामीण भागात शेती हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन असल्याने अशा प्रकारच्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण अर्थचक्रावर परिणाम होतो. बाजारात येणाऱ्या उत्पादनावर परिणाम झाल्यास दरात चढउतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून शासनाकडून मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. कृषी विभागाने त्वरित शेतपातळीवर पाहणी करून वास्तविक नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शासनाने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत जाहीर करावी, पीकविमा योजनेंतर्गत दावे तातडीने मंजूर करावेत आणि कर्जफेडीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून पुढे येत आहे.

अवकाळी पावसाचा हा फटका केवळ पिकांपुरता मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांनाही धक्का देणारा आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना आधार देणे ही काळाची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहे

Post a Comment

0 Comments