प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे
महागाव : तालुक्यातील बौद्ध बांधवांसाठी अभिमानाची बाब ठरणारी भव्य बौद्ध धम्म परिषद २१ व २२ फेब्रुवारी रोजी महागाव येथे आयोजित करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्धीय शिक्षण संस्था यांच्या पुढाकारातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा दोन दिवसीय प्रबोधन मेळावा पार पडणार आहे. ग्रामीण भागात धम्म, समता व बंधुता यांचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सकाळी पंचशील ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. विविध भदंतांच्या हस्ते धम्मदेशना व मार्गदर्शन करण्यात येणार असून समाजप्रबोधनावर भर दिला जाणार आहे. दुपारच्या सत्रात मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. सामाजिक प्रश्न, शिक्षण, संघटन आणि धम्माच्या आचरणावर मार्गदर्शन केले जाणार आहे. सायंकाळी बौद्ध व भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून परिसरातील नागरिकांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण कार्यक्रम होणार आहे. मोठ्या संख्येने बांधव सहभागी होण्याची शक्यता असून आयोजन समितीकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारचे कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक जागृतीची चळवळ ठरतात. युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्माचा संदेश आत्मसात करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महागाव परिसरात या परिषदेबाबत उत्सुकता व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment
0 Comments