Type Here to Get Search Results !

अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? २७ फेब्रुवारी ठरणार निर्णायक



प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे 

महागाव : नगरपंचायत महागाव येथील नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी २७ फेब्रुवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. अविश्वास प्रस्तावानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सत्तासमीकरण जवळपास स्पष्ट झाल्याची चर्चा असली तरी अंतिम निर्णय विशेष सभेतच होणार आहे.

निवडणूक प्रक्रियेअंतर्गत सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत मुख्याधिकारी कक्षात उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर उमरखेडचे उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. वैध उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर १५ मिनिटांची माघार मुदत दिली जाणार आहे. आवश्यक असल्यास मतदानाची प्रक्रिया पार पडेल. दुपारी १ वाजता नगरपंचायत सभागृहात विशेष सभेत निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, विविध राजकीय गटांतर्गत बैठका सुरू असून संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. भाजप गटबंधनाने आपले संख्याबळ भक्कम असल्याचा दावा केला आहे. उर्वरित कार्यकाळात शहरातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

दुसरीकडे, काँग्रेस गटाने अविश्वास प्रस्तावानंतर विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शविली आहे. लोकहिताच्या प्रश्नांवर रचनात्मक भूमिका घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला अपक्ष सदस्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती मात्र सध्याच्या समीकरणात त्यांचे महत्त्व काहीसे कमी झाल्याचे बोलले जात आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडीमुळे आगामी काळातील नगरपंचायतीच्या कामकाजाची दिशा ठरणार आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा यांसारख्या विषयांवर नव्या नेतृत्वाकडून ठोस निर्णयांची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

२७ फेब्रुवारीच्या विशेष सभेत अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. निवडीनंतर शहराच्या विकासाला गती मिळावी, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments