पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच
कन्नड, प्रतिनिधी : सचिन शेजवळ
कन्नड येथील कृषी विभागाच्या बिजगुणन केंद्र व फळरोपवाटिकेत कार्यरत असलेल्या महिला मजुरांवर झालेल्या अन्यायाविरोधात तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या चौथ्या दिवशी चार महिलांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारानंतर शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे आंदोलनाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे.
कृषी विभागाने कामगार महिलांचे हजेरी पत्रक लपवून इतर कर्मचाऱ्यांना कामावर घेतल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, या मागणीसाठी महिलांनी सोमवार, २३ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी सायंकाळीहौसाबाई जाधव,गेंदाबाई गंगवाल,कडूबाई नरवडेआणिपार्वताबाई बिरसोणेयांची प्रकृती खालावली. तहसीलदार सारिका भगत यांच्या निर्देशानुसार ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीडॉ. उल्फत परदेशी व डॉ. सिकंदर कुरेशीयांनी तपासणी केली असता महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. मात्र आंदोलक महिलांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. अखेर पोलीस बंदोबस्तात त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
या आंदोलनात बिजगुणन केंद्र व फळरोपवाटिकेत काम करणाऱ्या एकूण १२ महिला सहभागी असून, उच्च न्यायालयाने निर्धारित कामाचे दिवस पूर्ण होत असतील तर संबंधित महिलांना कामावर घ्यावे, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. हा आदेश २०१९ मध्ये असूनही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोप महिलांनी केला आहे.महिलांनी तालुका कृषी अधिकारी (फळरोपवाटिका)संताराम वाकडेयांच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला. मात्र उडवाउडवीची उत्तरे देत हजेरी पुस्तक सादर करण्यात आले नाही, असा आरोप आहे. तसेच अधीक्षक कृषी अधिकारीप्रकाश देशमुखआणि उपविभागीय कृषी अधिकारीसुभाष आघावयांच्याकडेही निवेदने देण्यात आली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असतानाही दोन वर्षांनंतरही हजेरी पुस्तक सादर करण्यात आलेले नाही. ज्या कर्मचाऱ्यांना हजेरी पुस्तकानुसार नोकरी देण्यात आली, त्यांचे हजेरी पत्रक दाखवण्यात येते; मात्र आमचे हजेरी पुस्तक जाणूनबुजून दडपले जात असल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी आंदोलक महिलांनी केली आहे. तहसीलदार सारिका भगत यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Post a Comment
0 Comments